Jigra Movie Review: जिगरबाज बहिणीची डेअरिंगबाज कहाणी, आलिया भटचा 'जिगरा' कसा आहे वाचा
By संजय घावरे | Published: October 11, 2024 03:27 PM2024-10-11T15:27:50+5:302024-10-11T15:32:36+5:30
आलिया भट निर्मित आणि अभिनीत 'जिगरा' कसा आहे? वाचा रिव्ह्यू
भाऊ-बहिणीच्या नात्यावर आजवर फार कमी चित्रपट बनले आहेत. हा चित्रपटही याच नात्यावर आधारलेला आहे. दिग्दर्शक वसन बाला यांनी या चित्रपटात एका जिगरबाज बहिणीची डेअरिंगबाज कहाणी सांगण्याचा प्रयत्न केला आहे. आलियासह इतर कलाकारांनी अफलातून अभिनय केला असला तरी इतर गोष्टींची भट्टी नीट जमलेली नाही. कसा आहे 'जिगरा' वाचा.
कथानक : 'माझी राखी बांधली असल्याने तू माझ्या प्रोटेक्शनमध्ये आहेस', असं धाकटा भाऊ अंकुरला सांगणारी बहिण सत्याची ही स्टोरी आहे. बालपणापासून खंबीरपणे अंकुरला पाठीशी घालून त्याच्यावरील संकट स्वत:वर झेलणारी सत्या धाडसी आहे. आई-वडीलांविना तिच भावाला सांभाळते. दूरच्या नातेवाईकांच्या कंपनीत नोकरी करते. ते आपला मुलगा कबीरसोबत अंकुरला बिझनेस डील साईन करण्यासाठी परदेशी पाठवतात. तिथे कबीरकडे ड्रग्ज मिळतात आणि त्याच्यासोबत अंकुरलाही कैद होते. त्यानंतर भावाला सोडवण्यासाठी सत्या काय करते ते या चित्रपटात आहे.
लेखन-दिग्दर्शन : वनलाईन सुरेख असली तरी पटकथेतील कच्चे दुअे चित्रपटाला मारक ठरतात. चित्रपट सुरू झाल्यानंतर पुढे काय घडेल याची उत्सुकता निर्माण होते, पण गती खूप मंदावल्याने मध्यंतराचे वेध लागतात. मध्यंतरानंतर पुन्हा नव्या दमाने चित्रपट जोमात सुरू होतो, पण संथ गतीचा फटका बसतो. परदेशातील हायटेक तुरुंग फोडण्याचे प्लॅनिंग, त्यासाठी केली जाणारी तयारी आणि क्लायमॅक्समधील नाट्य खिळवून ठेवण्यात अपयशी ठरते. काही नाट्यमय वळणं उत्सुकता वाढवतात. चित्रपटातील गाणी सामान्य असली, तरी 'चक्कू छुरीयां तेज करा लो...' व 'यारी है इमान मेरा...' या जुन्या गाण्यांचा सुरेख वापर केला आहे. सिनेमॅटोग्राफी चांगली आहे. चित्रपट कुठेही भावूक करत नाही.
अभिनय :आलिया भट्टने पुन्हा एकदा आपल्या व्यक्तिरेखेला उचित न्याय देण्यासाठी जीव ओतला आहे. सत्याची व्यक्तिरेखा सजीव करताना ती कुठेही कमी पडलेली नाही. वेदांग रैनाने भावाच्या भूमिकेत आलियाला सुरेख साथ दिली आहे. मनोज पाहवा यांना मोठी व्यक्तिरेखा मिळाली असून, निवृत्त गँगस्टर भाटियाच्या रूपात त्यांनी धमाल केली आहे. राहुल रवींद्रनसह इतर कलाकारांनीही चांगलं काम केलं आहे.
सकारात्मक बाजू : अभिनय, संवाद, लोकेशन्स, दिग्दर्शन, सिनेमॅटोग्राफी
नकारात्मक बाजू : पटकथा, गती, संकलन
थोडक्यात काय तर भावा-बहिणीच्या मायेची उबदार गोष्ट पाहायची इच्छा असल्यास आणि बहिण आपल्या भावाला वाचवण्यासाठी काय करू शकते हे जाणून घ्यायचे असेल तर हा चित्रपट पाहायला हरकत नाही.