AndhaDhun Movie Review: अनोखा,अद्भूत!!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2018 04:04 PM2018-10-04T16:04:52+5:302023-08-08T19:28:38+5:30
काही चित्रपटांना स्वत:चे सूर आणि लय असते; जे त्या चित्रपटाला एका अनोख्या उंचीवर घेऊन जातात. असे चित्रपट पाहताना आपण प्रेक्षक नसून चित्रपटाच्याच कथेचा एक भाग आहोत, असे पाहणा-याचे होते. ‘अंधाधून’ हा एक असाच चित्रपट आहे.
- जान्हवी सामंत
कथा आणि शैली हे कुठल्याही उत्तम चित्रपटाचे मूलभूत घटक म्हणता येतील. पण याशिवाय काही चित्रपटांना स्वत:चा सूर, लय,ताल असतो; तो त्या चित्रपटाला एका अनोख्या उंचीवर घेऊन जातो. असे चित्रपट पाहताना आपण प्रेक्षक नसून चित्रपटाच्याच कथेचा एक भाग आहोत, असे पाहणा-याचे होते. असा चित्रपट पाहणे एक अद्भूत आणि अंतर्बाह्य हेलावून टाकणारा अनुभव असतो. ‘अंधाधून’ हा एक असाच चित्रपट आहे.
आकाश (आयुष्यमान खुराणा) हा या कथेचा नायक. आकाश हा एक दृष्टिहिन संगीतकार असतो आणि एक अतियश क्लिष्ट कम्पोझिशन पूर्ण करण्याच्या महत्त्वाकांक्षेने झपाटलेला असतो. पुण्यात राहणा-या आणि आपल्या संगीताच्या दुनियेत रमलेल्या आकाशची एक दिवस अचानक सोफीशी(राधिका आपटे) गाठ पडते. सोफी ही पुण्यातील फ्रान्सिस्को नावाच्या रेस्टॉरंटच्या मालकाची मुलगी असते. सोफीच्या मदतीने आकाश फॉन्सिस्को हॉटेलात पियानो वाजवून व गाणे गाऊन ग्राहकांचे मनोरंजन करू लागतो आणि हे करता करता सोफीसोबत त्याची जवळीक वाढू लागते/ याचदरम्यान बॉलिवूडचा एकेकाळचा सुपरस्टार प्रमोद सिन्हासोबत (अनिल धवन) त्याची भेट होते. आकाशचे गाणे ऐकून प्रमोद इतका प्रभावित होतो की, आपल्या लग्नाच्या वाढदिवसाच्या पार्टीत त्याला गाण्याची गळ घातलो. ठरलेल्या वेळेनुसार, आकाश प्रमोदच्या घरी पोहोचतो. पण इथे पोहोचल्यावर त्याला काहीतरी वेगळेच जाणवते. इथून पुढे चित्रपट जशी कलाटणी घेतो, तसेच आकाशचे आयुष्यही कलाटणी घेते.
चित्रपटाची कथा इतकी वेडी-वाकडी, उलटी-सुलटी आणि वेगवान आहे की, नक्की काय घडते आणि कसे घडते, ते सांगणेही कठीण व्हावे. पण इतके नक्की की, प्रत्येक दृश्यासोबत हा चित्रपट एक अनपेक्षित धक्का देतो आणि या अनपेक्षित धक्क्यासोबत तितकेच मनोरंजनही करतो. खरे तर याची दोन मुख्य कारणे आहेत. एक म्हणजे, चित्रपटाचे संगीत. चित्रपटाच्या सुरूवातीलाच अमित त्रिवेदीच्या आवाजातील गाणी आणि चित्रपटाचे पार्श्वसंगीत इतकी अप्रतिम उंची गाठते की, चित्रपट संपेपर्यत आपला बाज कायम ठेवते. दुसरे कारण म्हणजे, या चित्रपटाचा ‘डार्क ह्युमर’, एकदम खळखळून हसवणा-या विनोदांची सवय असलेल्या हिंदी चित्रपटांमध्ये काहीसे गडद विनोद हा एक वेगळा प्रयोग वाटतो.
चित्रपटातील वेडीवाकडी, विचित्र वळणं सांभाळताना चित्रपटाचा ताल, सूर, लय आणि विनोदी शैली जराही धक्का लागणार नाही, हे शिवधनुष्य दिग्दर्शक श्रीराम राघवन यांनी अगदी लिलया पेलले आहे. चित्रपटातील सर्व कलाकारांचा अभिनयही अव्वल आहे. दृष्टिहिनाच्या व्यक्तिरेखेतील अतिरंजकपणाचाही तोल जाणार नाही, इतकी काळजी आयुष्यमानने घेतली आहे. तब्बूलाही दीर्घकाळानंतर इतक्या दमदार आणि विनोदी भूमिकेत पाहण्यात वेगळाच आनंद आहे. अनिल धवन, जकीर हुसैन, राधिका आपटे, अश्विनी कळसेकरने आपआपली भूमिका अतिशय निष्ठेने साकारली आहे. एकंदर काय तर अनेकार्थाने चित्रपट मनोरंजक आहे. अगदी डोळे बंद करून पाहायला जा.