Angrezi Medium: प्रेम आणि भावनांचं 'मीडियम'

By सुवर्णा जैन | Published: March 13, 2020 03:18 PM2020-03-13T15:18:03+5:302023-08-08T20:09:54+5:30

रसिकांना खळखळून हसवणं आणि हसता हसता रसिकांच्या डोळ्यात टचकन पाणी आणण्याची किमया इरफानसारखा समर्थ अभिनेताच करु शकतो.

Angrezi Medium Movie Review-SRJ | Angrezi Medium: प्रेम आणि भावनांचं 'मीडियम'

Angrezi Medium: प्रेम आणि भावनांचं 'मीडियम'

Release Date: March 13,2020Language: हिंदी
Cast: इरफान खान, दीपक डोबरियाल, राधिका मदान, पंकज त्रिपाठी, किकू शारदा, करीना कपूर, डिंपल कपाडिया
Producer: दिनेश विजानDirector: होमी अदजानिया
Duration: 2 तासGenre:
लोकमत रेटिंग्स

सुवर्णा जैन 

अभिनेता इरफान खानच्या अभिनयावर रसिक फिदा आहेत. त्यामुळेच की काय कॅन्सरसारख्या रोगावर मात करुन रुपेरी पडद्यावर कमबॅक करणाऱ्या इरफानची साऱ्यांनाच प्रतीक्षा होती. कॅन्सरवर मात केल्यानंतर इरफाननं शुटिंगला सुरुवात केली तेव्हापासूनच त्याच्या कमबॅक सिनेमाची रसिकांमध्ये प्रचंड उत्सुकता होती. अखेर 'अंग्रेजी मीडियम' या चित्रपटातून इरफान खान रसिकांच्या भेटीला आलाय. इरफानच्या अभिनयात एक वेगळीच सहजता आहे. रसिकांना खळखळून हसवणं आणि हसता हसता रसिकांच्या डोळ्यात टचकन पाणी आणण्याची किमया इरफानसारखा समर्थ अभिनेताच करु शकतो. चेहऱ्यावरील हावभाव आणि रुपेरी पडद्यावरील त्याचा सहजसुंदर वावर रसिकांना मोहून टाकतो. इरफानच्या याच अभिनयाची झलक त्याच्या 'अंग्रेजी मीडियम' या सिनेमातही पाहायला मिळते.

 

'अंग्रेजी मीडियम' या सिनेमात बाप लेकीची कहानी पाहायला मिळते. चंपक बन्सल (इरफान खान)हा उदयपूरमध्ये आपल्या लेकीसह म्हणजेच तारिका उर्फ तारु (राधिका मदान) हिच्यासोबत राहतो. चंपकचं एक मिठाईचं दुकान आहे. गोपी (दीपक डोबरियाल) हा चंपकचा चुलत भाऊ आहे. दोन्ही भावांचं जराही पटत नाही. मात्र दोघांचा एकमेंकांवर तितकंच प्रेमही आहे. परदेशात शिक्षण घ्यावं अशी चंपकची लेक तरुची इच्छा असते. लंडनच्या ट्रूफर्ड युनिव्हर्सिटीकडून तिला ही संधीही मिळते. मात्र चंपकच्या एका चुकीमुळे तीची ही संधी हुकते. आपण दूर जाऊ नये यासाठी वडिलांनी जाणूनबुजून संधी जाऊ दिली असं तरुला वाटतं. त्यावेळी कुठल्याही परिस्थितीत तारुला परदेशात शिक्षणासाठी पाठवण्याचा चंग चंपक बांधतो.

यानंतर चंपक, गोपी तारुला लंडनला शिक्षणासाठी पाठवण्यासाठी खटाटोप करतात. बबलू (रणवीर शौरी) या मित्राच्या मदतीने चंपक, गोपी, तरु लंडनला पोहचतात. यानंतर सिनेमाच्या कथेत अनेक व्यक्तीरेखा येतात आणि कथा रंजक होऊ लागते. टोनी (पंकज त्रिपाठी), गज्जू (किकू शारदा), पोलीस अधिकारी नैना (करीना कपूर) आणि तिची आई मिसेस कोहली (डिंपल कपाडिया) यांच्या एंट्रीने सिनेमाची कथा कशी रंगते आणि तारुचं परदेशात शिकण्याचं स्वप्न पूर्ण होतं का या सगळ्या प्रश्नांची उत्तरं 'अंग्रेजी मीडियम' या सिनेमातून मिळतात.

मध्यमवर्गीय मुलांचं परदेशात शिक्षणाचं स्वप्न हा विषय केंद्रस्थानी ठेवून अंग्रेजी मीडियम या सिनेमाची कथा मांडण्यात आलीय. भारतातही चांगल्या दर्जाचं शिक्षण मिळू शकतं, त्यासाठी परदेशातच जाण्याची गरज नाही हा विषय मांडण्याचा दिग्दर्शकाचा प्रयत्न असल्याचे दिसतं. परदेशातील शिक्षण वाईट नसून देशातील शिक्षणाद्वारे चांगलं करिअर बनू शकतं हे सांगण्याचा प्रयत्न सिनेमातून करण्यात आलाय. तरुण पीढीच्या आधुनिक मतांचा आदर करत भारतीय मूल्यं समजावण्याचा दिग्दर्शक प्रयत्न करतो. एक गंभीर संदेश हलक्याफुलक्या पद्धतीने मांडताना बाप-लेकीच्या नात्यातील हळूवारपणा, भावनिक पैलू सिनेमात दाखवण्यात आलेत. कथेच्या पातळीवर 'अंग्रेजी मीडियम' सिनेमाच्या कथेत काही दम वाटत नाही. अनेक सिनेमाची कथा भटकते. मात्र क्लायमॅक्स सिनेमाला काहीसा सावरतो. ज्यांनी इरफानचा 'हिंदी मीडियम' हा सिनेमा पाहिलाय, त्यांना 'अंग्रेजी मीडियम' हा सिनेमा फारसा भावणार नाही त्यामुळेच की चांगली कॉमेडी आणि दमदार अभिनय असूनही सिनेमा फारसा प्रभाव टाकत नाही.

 

इरफान खान बऱ्याच काळानंतर रुपेरी पडद्यावर परतला आहे. मात्र त्याचा अभिनय आधीसारखाच प्रभावी आणि दमदार आहे. आपल्या अभिनयाने इरफानने साकारलेला चंपक हसवतो, रडवतो, कधी भावनिक करतो तर कधी रसिकांचं तुफान मनोरंजनही करतो. दीपक डोबरियालनं इरफानचा भाऊ गोपी मोठ्या खुबीने साकारलाय. त्याचा कॉमिक डायमिंग रसिकांची विशेष दाद घेऊन जाते. इरफान आणि गोपी जेव्हा स्क्रीनवर एकत्र दिसतात त्यावेळी रसिकांचं तुफान मनोरंजन होतं. राधिका मदान हिने तरुच्या भूमिकेला पुरेपूर न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. विशेषतः इरफान खानसह रुपेरी पडद्यावरील बाप-लेकीची केमिस्ट्री खास वाटते. पंकज त्रिपाठी आणि किकू शारदा यांनीही त्यांच्या वाट्याला आलेल्या छोट्या छोट्या भूमिकेत आपल्या अभिनयाने चारचाँद लावलेत. करीना कपूर पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत असून तिने त्याला त्या पद्धतीने न्याय दिलाय. डिंपल कपाडियासुद्धा छोट्याशा भूमिकेतूनही रसिकांवर प्रभाव पाडण्यात यशस्वी होतात. इतर कलाकारांनीही छोट्या छोट्या भूमिकांना पुरेपूर न्याय दिलाय.

सिनेमाचं संगीत फार ग्रेट नसलं तरी ठीकठाक आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. दिग्दर्शक होमी अदजानिया सगळ्या कलाकारांकडून चांगला अभिनय करून घेण्यात यशस्वी ठरले आहेत. मात्र कथेतील त्रुटींमुळे सिनेमा तितका प्रभावशाली वाटत नाही. इरफान आणि दीपक डोबरियाल यांची कॉमेडी सिनेमाला काही अंशी वाचवते असं म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही. कमबॅक सिनेमातील इरफानचा दमदार अभिनय आणि मनोरंजन यामुळे सिनेमा एकदा तरी नक्की पाहण्यासारखा आहे. 
 

Web Title: Angrezi Medium Movie Review-SRJ

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.