‘शिवाय’ : ‘टेन्स ड्रामा’चे रोमांचक पॅकेज
By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2016 01:03 PM2016-10-28T13:03:07+5:302023-08-08T19:28:38+5:30
अजय देवगण निर्मित आणि दिग्दर्शित बहुप्रतिक्षीत ‘शिवाय’ आज शुक्रवारी चित्रपटगृहात झळकला. हा ‘किडनॅप-रेक्सक्यू ड्रामा’ म्हणजे कॉमेडी, रोमान्स, थरारक अॅक्शन असे सगळे पॅकेज आहे आणि हे पॅकेज चित्रपटगृहात पाहणे एक रोमांचक अनुभव देणारे
अजय देवगण निर्मित आणि दिग्दर्शित बहुप्रतिक्षीत ‘शिवाय’ आज शुक्रवारी चित्रपटगृहात झळकला. हा ‘किडनॅप-रेक्सक्यू ड्रामा’ म्हणजे कॉमेडी, रोमान्स, थरारक अॅक्शन असे सगळे पॅकेज आहे आणि हे पॅकेज चित्रपटगृहात पाहणे एक रोमांचक अनुभव देणारे आहे.
खरे तर कुठल्याही बॉलिवूड चित्रपटात एक गोष्ट नेहमीच पाहायला मिळते. ती म्हणजे, चित्रपटातील कुटुुंबात खूप प्रेम, जिव्हाळा दिसला रे दिसला की, त्या कुटुंबाची थोड्याच वेळात ताटातूट ही ठरलेली असते. ‘शिवाय’ मध्येही हीच गोष्ट आहे. ही कथा आहे, एक मुलगी आणि तिच्या वडिलांची. एक गोंडस मुलगी आणि तिचा बाबा यांच्या प्रेमावर आधारित ही कथा पाहतांना अगदी सुरुवातीपासूनच त्यांची ताटातूट होईल, याचा अंदाज आपल्याला येतो आणि ती कशी आणि कधी होईल, याबद्दल मनात धाकधूक वाढत जाते. कथेत काहीतरी वाईट घडणार, याचा आभास आल्याने पहिल्या अर्ध्या तासात कौटुंबिक जिव्हाळ्याची दृश्ये पाहून काहीसा कंटाळा येतो. पण हा अर्धा तास संपताच चित्रपट अगदी सूसाट वेगाने धावायला लागतो.
शिवाय (अजय देवगण) हा एक गिर्यारोहकांचा इंस्ट्रक्टर असतो. एका टुरिस्ट ग्रूपसोबत आलेली बुल्गेरिअन मुलगी ओल्गा(एरिका कार) सोबत शिवायची नजरानजर होते आणि दोघांमध्ये पे्रम फुलते. याचदरम्यान ओल्गा गर्भवती होते. पण शिवाय आणि ओल्गा दोघांचाही आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोण भिन्न असतो. ओल्गाला हे मुलं नको असत. पण शिवायच्या आग्रहास्तव ती बाळाला जन्म देते. दोघांनाही मुलगी होते. या मुलीला शिवायकडे सोपवून ओल्गा त्याच्या आयुष्यातून निघून जाण्याचा निर्णय घेते. ओल्गा निघून गेल्यावर शिवाय मुलगी गौरा(एबीगेल एम्स) हिला जीवापाड जपतो. स्वत:प्रमाणेच तिच्यात पर्वत, गिर्यारोहण यांची आवड निर्माण करतो. काही वर्षांनंतर गौराला अचानक तिच्या आईची काही पत्रे सापडतात आणि यानंतर जणू तिचे भावविश्वच बदलतं. ती आईला भेटायच्या हट्टाने पेटून उठते. शिवायला हे नको असतं. पण तरिही गौराच्या हट्टाखातर तो तिला तिच्या आईला भेटवायला बुल्गेरियाला नेतो. पण आई आणि मुलगी भेटण्याआधीच चित्रपटाची कथा एक वेगळे वळण घेते. बुल्गेरियाच्या सुरुवातीच्याच दृश्यांमध्ये तिथे देह विक्रय आणि बाल वेश्यावृत्ती किती फोफावलीय, हे दिसते. शिवाय ज्या हॉटेलात थांबतो, त्याच हॉटेलच्या खोलीत एका लहान मुलाला एका माणसाच्या ताब्यात दिले जात असल्याचे तो बघतो आणि न राहवून त्याला वाचवण्यासाठी धावतो. पण याच घटनेमुळे शिवाय तेथील वेश्याविक्रय करणाºया माफियांचा राग ओढवून येतो. याचाच परिणाम म्हणजे गौराचे अपहरण होते. शिवाय पोलिसांकडे धाव घेतो. पण गौराचा ‘फिरंगी’ रंग बघून ती शिवायची मुलगी आहे, यावर पोलिसांचा विश्वासच बसत नाही आणि त्याची रवानगी पोलिस कोठडीत होते. नेमक्या याचवेळी बाल तस्करीमध्ये ७२ तासांत मुलांना देशाबाहेर नेऊन विकल्या जाते, हे शिवायच्या कानावर पडते आणि तो गौराला स्वत:च शोधण्याचा निर्णय घेतो. पोलिसांच्या ताब्यातून पळून तो स्वत:चा गौराला शोधायला बाहेर पडतो. याचदरम्यान भारतीय दूतावासात काम करणारी अनुष्का (सायेशा) अजयला भेटते. तिचे काही मित्र अजयला मदत करतात. पण तरिही गौराचा शोध घेताना शिवायला बºयाच अडचणी आणि संकटांचा सामना करावा लागतो. त्या कोणत्या हे पाहायला तुम्हाला चित्रपटच बघावा लागेल.
खरे तर चित्रपटाची कथा अगदीच साधारण आहे. पण नेहमीच्या पारंपरिक पठडीतील बॉलिवूडपटांच्या तुलनेत ‘शिवाय’मध्ये निश्चिपणे काहीतरी वेगळे आहे आणि ते म्हणजे त्याचे सादरीकरण. खरे तर यातील अॅक्शनदृश्ये यापूर्वी कुठल्याही बॉलिवूडपटात आपण बघितलेले नाही, असे म्हणणे अतिशयोक्ती ठरेल. पण हिमालयातील अप्रतिम निसर्ग सौंदर्य, बुल्गेरियातील अनेक दृश्ये असाधारण अशीच आहेत. कॉमेडी, रोमान्स, गाणी अगदी जेमतेम ठेवून चित्रपटाचा पूर्ण फोकस एक ‘टेन्स ड्रामा’ बनवण्यावर आहे आणि यात अजयला ब-यापैकी यशही आले आहे. दिग्दर्शनाच्या कसोटीवर म्हणाल तर अजय अगदी खरा उतरला आहे. तांत्रिकदृष्ट्या ‘शिवाय’ कुठल्याही हॉलिवूडपटापेक्षा कमी नाही. अपरहणाच्या दृश्यात कारचा पाठलाग करतानाचे दृश्य तर अप्रतिम आहे. हिरो असलेले अनेक अॅक्शन सीन्स चित्रपटाचा ‘प्लस पॉईन्ट’ आहेत. पण हिरो असलेल्या या अॅक्शन सीन्सवर जितकी मेहनत घेतली गेलीय, तितकी मेहनत उर्वरित दृश्यांत घेतली गेलेली नाही, हेही तितकेच खरे आहे. सायेशा आणि तिच्या वडिलांवर चित्रीत दृश्ये, वीर दासची कॉमेडी दृश्ये अगदीच रटाळ वाटावी अशी आहेत. पटकथेच्या बाबतीतही मेहनत कमी पडलेली दिसते आहे. अगदीच मुलं नको असलेली आई, मुलीचे अपहरण झाल्यावर तिच्यावर प्रेम करू लागते, हे पचवणे कुठल्याही प्रेक्षकाला जड जाणारे आहे.
एरिका कारचा पहिला बॉलिवूड डेब्यू निश्चितपणे चांगला आहे. भाषेची अडचण असूनही पडद्यावरील ओल्गा या व्यक्तिरेखेला एरिकाने चांगला न्याय दिला आहे. तेवढाच सायेशा सहगल हिचा नवखेपणा खटकणारा आहे. अजयचे म्हणाल तर या चित्रपटात त्याच्यातील अभिनेत्यापेक्षा दिग्दर्शकचं अधिक प्रभावी दिसतो आहे. आई जवळ नसलेल्या मुलीला सांभाळणारा एक बाबा, त्याच्या भाव-भावना, बाल वेश्यावृत्ती, बाल तस्करी या विषयांवर ‘शिवाय’मधून जळजळीत भाष्य करण्यात आले आहे. खरे तर शेवटच्या अर्ध्या तासाशिवाय ‘शिवाय’ हा एक उत्कृष्ट चित्रपट झाला असता. चित्रपटातील अगदीच ‘जेमतेम’ संवादातही आणखी जीव ओतता आला असता. अर्थात तरिही हा ‘टेन्स ड्रामा’ वेगळा आहे. यातील बॉलिवूडमध्ये हॉलिवूड तोडीची काही अॅक्शन दृश्ये, बर्फाच्छादित हिमालयातील अॅक्शन स्टंट, गिर्यारोहण आणि हिमस्सखनापासून बचाव करतानाच्या काही दृश्यांचे अप्रतिम सादरीकरण शिवाय भावनांची उत्कटता यासाठी तरी हा चित्रपट चित्रपटगृहात जावून पाहता येईल.