Appa Ani Bappa review: बाप्पा आणि एका सामान्य माणसाची मजेशीर गोष्ट
By प्राजक्ता चिटणीस | Published: October 11, 2019 05:40 PM2019-10-11T17:40:42+5:302023-08-08T19:47:32+5:30
आपल्या अपयशाचे खापर देवावर फोडणाऱ्या एका माणासाची गोष्ट म्हणजे आप्पा आणि बाप्पा.
आयुष्यात आपण अनेकजण अनेक समस्यांना तोंड देत असतो. कधी कधी तर आपल्याला या सगळ्या गोष्टींचा प्रचंड कंटाळा येतो आणि आपण आपल्या परिस्थितीसाठी देवाला जबाबदार ठरवतो. आपल्या अपयशाचे खापर देवावर फोडणाऱ्या एका माणासाची गोष्ट म्हणजे आप्पा आणि बाप्पा.
गोविंद कुलकर्णी (भरत जाधव) त्याचे वडील रमाकांत कुलकर्णी (दिलीप प्रभावळकर), पत्नी मंदा (संपदा कुलकर्णी), मुलगी दिपाली (शिवानी रांगोळे) आणि मुलगा संचित (वृषभ नायक) यांच्यासोबत पुण्यातील एका अलिशान वाड्यात राहात असतात. गोविंदचे शिक्षण नसल्याने तो एका मिठाईच्या दुकानात काम करत असतो तर दुसरीकडे त्याच्या वडिलांनी चांगलाच पैसा कमावलेला असतो. गणेशोत्सवात आपण खूप साऱ्या लोकांना घरी जेवायला बोलवायचे, घर सजवायचे, यंदाचा गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा करायचा असे रमाकांत कुलकर्णी ठरवतात आणि त्यासाठी त्यांची एक जुनी एफडी त्यांच्या मुलाला देतात. ही एफडी वीस लाख रुपयांची असते. पण गोविंद बँकेत गेल्यानंतर तेथील कर्मचारी पैसे द्यायला टाळाटाळ करतात. या सगळ्याचा गोविंदला प्रचंड राग येतो आणि या सगळ्यासाठी तो गणपती बाप्पाला जबाबदार धरतो आणि जोपर्यंत 20 लाख रुपये मिळणार नाहीत तोपर्यंत गणेशाच्या मूर्तीचे विसर्जनच करणार नाही असे तो ठरवतो. गोविंदच्या या निर्णयानंतर पुढे काय होते... गणपती बाप्पा (सुबोध भावे) भूतलावर येऊन त्याची समजून काढण्याचा कशाप्रकारे प्रयत्न करतो हे आपल्याला आप्पा आणि बाप्पा या चित्रपटात पाहायला मिळते.
चित्रपटाची कथा ही जुनी असली तरी चित्रपटातून एक चांगला संदेश देण्यात आला आहे. हा चित्रपट पाहाताना आपल्याला ओह माय गॉड, चला मुस्सद्दी... ऑफिस ऑफिस या चित्रपटांची नक्कीच आठवण येते. पण या चित्रपटाची मांडणी चांगल्याप्रकारे केली आहे. चित्रपटाची लांबी थोडीशी जास्त असून हा चित्रपट थोडासा कमी करता आला असता असे चित्रपट पाहाताना नक्कीच जाणवते. मध्यांतरापर्यंत कलाकारांची ओळख करण्यातच वेळ घालवला आहे. पण मध्यांतरानंतर खऱ्या अर्थाने कथा सुरू होते. गणेशोत्सवाचे सेलिब्रेशन दाखवताना मुंबई आणि पुण्यातील मंडळाचे काही फुटेज दाखवण्यात आले आहेत. पण ते फुटेज वेगळे शूट करण्यात आले होते हे चित्रपट पाहाताना लगेचच जाणवते. तसेच चित्रपटातील एकही गाणं ओठावर रुळत नाही. या चित्रपटातील काही विनोदी दृश्यं खूपच चांगल्याप्रकारे जमून आली आहेत तर काही दृश्यांमध्ये उगाचच ओढून ताणून विनोद केल्यासारखे जाणवते. या चित्रपटाच्या जमेची बाजू म्हणजे कलाकारांचा अभिनय... चित्रपटात भरत जाधव, सुबोध भावे, दिलीप प्रभावळकर, संपदा कुलकर्णी यांनी आपल्या भूमिकांना योग्य न्याय दिला आहे. गणपती बाप्पाच्या भूमिकेत असलेला सुबोध नक्कीच भावतो.