राजकारणाचा 'लक्षवेधी' वऱ्हाडी ठेचा…!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2016 01:36 PM2016-12-09T13:36:22+5:302023-08-08T19:47:32+5:30
अधिवेशनाच्या तोंडावर होणारी धमाल यात खुमासदार पद्धतीने रंगवण्यात आली आहे: Read More Bollywood News On Cnxmasti.com
नागपूर येथे ऐन थंडीच्या मोसमात भरणारे 'हिवाळी अधिवेशन' म्हणजे तशी उबदार गोष्ट; मात्र सर्वसामान्य जनता ही ऊब तशी लांबूनच अनुभवत असते. याच जनतेपर्यंत हा उबदारपणा थेट पोहोचवण्याचा खटाटोप 'नागपूर अधिवेशन - एक सहल' या चित्रपटाने केला आहे. अर्थातच, कथेची पार्श्वभूमी राजकीय असली तरी अधिवेशनाच्या तोंडावर होणारी धमाल यात खुमासदार पद्धतीने रंगवण्यात आली आहे. परिणामी, बेरक्या नजरेतून मांडलेली अधिवेशनाची ही गोष्ट म्हणजे राजकारणाचा चटपटीत रंग लावलेला 'लक्षवेधी' वऱ्हाडी ठेचा बनला आहे.
अधिवेशनात स्थानिक प्रश्नांना प्राधान्य देऊन त्यावर काही ठोस निर्णय होतात का, याभोवती या चित्रपटाची कथा फेर धरते. मग त्यात राजकीय क्षेत्रात सरळसरळ दिसून येणारे आणि अनेकदा न दिसणारे मुखवटे टराटरा फाडले जातात. अधिवेशनाने सर्वसामान्य जनतेच्या पारड्यात नक्की काय पडते, या निमित्ताने होणाऱ्या खर्चाचे काय; यावर फोकस टाकत अधिवेशनाच्या काळात स्थानिक पातळीवर वेगाने होणाऱ्या घडामोडी, फायलींचा निपटारा होण्यासाठी लावण्यात येणारी फिल्डिंग, मुद्द्याचे प्रश्न सोडून भलत्याच मार्गावर वळणाऱ्या नजरा, 'ऑरेंज सिटी' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नागपूर शहरातल्या सरकारी कार्यालयांमध्ये पसरलेला नारिंगीपणा, त्याची आंबटगोड चव हे सर्वकाही या चित्रपटाने चिमटे काढत मांडले आहे.
हिवाळी अधिवेशन तोंडावर आलेले असताना एका स्थानिक सरकारी कार्यालयात निर्माण होणारी अधिवेशनाची हवा काय काय रंग दाखवते, हे या गोष्टीत पाहायला मिळते. अधिवेशनाच्या अनुषंगाने सातपुते साहेबांच्या या कार्यालयावर एकूणच सरबराई करण्याची मोठी जबाबदारी आहे. या कार्यालयात काम करणाऱ्या सोळंकी या कारकुनाचे त्याच्या कारकिर्दीतले हे १५ वे अधिवेशन असल्याने तो बरेच काही कोळून प्यायलेला आहे. अशातच अंकुश या तरुणाची मुंबईहून इथे बदली झालेली आहे आणि त्याच्या नजरेतून अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर घडणारे नाट्य चित्रपटात गुंफले आहे. सातपुते, सोळंकी, अंकुश यांच्यासह मग यात स्थानिक कार्यकर्ता गजाभाऊ, विरोधी पक्षनेता प्रतापराव, एका संस्थेचा चालक मसाळे, युवा नेता अजू पाटील यांची भर घालत हा चित्रपट वेगळे काही मांडू पाहतो. पण विनोदासोबत व्यवस्थेचे जाळे आणि जाचात अडकलेले प्रश्नही तो पटलावर आणतो.
चित्रपटाची कथा तशी छोटी आहे; परंतु लेखनातून आणि मांडणीतून ती ज्या तऱ्हेने फुलवली आहे त्याला दाद द्यावी लागेल. अधिवेशनासारखा गंभीर विषय घ्यायचा, त्याला संवादांची चुरचुरीत फोडणी द्यायची आणि चुलीवरची ही 'रेसिपी' ऐन थंडीत पानात वाढायची; हा सगळा द्राविडी प्राणायाम कथा, पटकथा, संवादलेखक व दिग्दर्शक निलेश जळमकर यांनी केला आहे. लेखनापेक्षा कथेच्या सादरीकरणातून निर्माण होऊ शकणाऱ्या मजेचा अचूक अंदाज त्यांना असल्याने प्रत्येक व्यक्तिरेखेवर त्यांनी ठोस लक्ष पुरवले आहे. साहजिकच, यातल्या व्यक्तिरेखा महत्त्वाच्या ठरतात आणि हे महत्त्व जाणणारे कलावंत चित्रपटात असल्याने त्याची खुमारी अधिकच वाढली आहे. फक्त, यातल्या सातपुते या व्यक्तिरेखेला अनुनासिक स्वर का दिला गेला आहे, याचे कोडे सुटत नाही आणि तसे करण्यामागचा उद्देशही समजत नाही. कलावंतांच्या माध्यमातून चित्रपटात विनोदाचा सडा पडलेला असताना, हे अधिकचे ठिगळ लावण्याची आवशक्यता नव्हती. चित्रपटात व्यक्तिरेखांच्या तोंडी असलेली वैदर्भीय भाषा मात्र गोड वाटते आणि संवादांतून त्यातली मजाही वाढते.
मकरंद अनासपुरे (सोळंकी) आणि भारत गणेशपुरे (गजाभाऊ) या दोघांनी चित्रपटात त्यांच्या भात्यातले त्यांचे हुकमी बाण सुसाट सोडले आहेत. मोहन जोशी (सातपुते) आणि चेतन दळवी (मसाळे) यांनी त्यांच्या भूमिका इरसाल रंगवल्या आहेत. संकर्षण कऱ्हाडे (अंकुश), अजिंक्य देव (प्रतापराव), अमोल ताले (अजू पाटील), विनीत भोंडे (कार्यकर्ता), सतीश फडके (पालकमंत्री), दिपाली जगताप (शालू) आदींनी चित्रपटात आवश्यक ते रंग भरले आहेत. यात रितूची तुलनेने छोटी भूमिका साकारणारी स्नेहा चव्हाण नवीन चेहरा म्हणून लक्षात राहते. सध्या पडद्यावर नवीन मराठी चित्रपटांचा तसा दुष्काळ पडला असतानाच, अचूक मुहूर्त साधत अधिवेशनाच्या मोटारीत बसून एक मस्त सहल या चित्रपटाने घडवून आणली आहे.