Beyond The Clouds Movie Review: चैतन्य हरवलेली कथा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2018 09:12 AM2018-04-19T09:12:23+5:302023-08-08T19:28:38+5:30
कधी कधी कथेत आत्मा असतो, आपले हृदय पिळवून टाकण्याची क्षमता असते. पण काही कारणाने या कथेमधले चैतन्य हरवून बसते...ख्यातनाम ईराणी दिग्दर्शक माजिद मजीदी यांचा ‘बियॉन्ड द क्लाऊड्स’ या चित्रपटाची कथा काहीशी अशीच आहे.
कधी कधी कथेत आत्मा असतो, आपले हृदय पिळवून टाकण्याची क्षमता असते. पण काही कारणाने या कथेमधले चैतन्य हरवून बसते...ख्यातनाम ईराणी दिग्दर्शक माजिद मजीदी यांचा ‘बियॉन्ड द क्लाऊड्स’ या चित्रपटाची कथा काहीशी अशीच आहे. आमिर (ईशान खट्टर) आणि तारा (मालविका मोहनन) या दोन भावा-बहिणीची कथा या चित्रपटात साकारली आहे. गरिबी आणि लाचारीला कंटाळून आमिर चुकीच्या मार्गाला लागतो आणि काही गुंडाकरिता ड्रग्ज तस्करीचे काम करतो. इकडचा माल तिकडे पोहोचवणे, हेच आमिरचे काम असते. या कामात त्याचा बºयाच वाईट लोकांशी संबंध येतो. जीवावर बेतू शकणा-या धोकादायक जागी त्यााला जावे लागते. पण आजुबाजुच्या भ्रष्ट, गलिच्छ लोकांकडे, जगाकडे दुर्लक्ष करून आमिर केवळ आपल्या कामावर लक्ष केंद्रीत करतो. मात्र एकदिवस ड्रग्ज पोहोचवताना तो गोत्यात येतो. हातात माल असताना पोलिस आमिरच्या पाठीमागे पडतात. स्वत:चा जीव आणि माल दोन्ही वाचवण्यासाठी आमिर थेट ताराकडे पळून येतो. ताराकडे आपला माल लपवायला देऊन अर्शी (गौतम घोष) नावाच्या तिच्या सहकाºयाच्या मदतीने आमिर लपतो. नंतर तारा त्याला आपल्या नवीन घरी घेऊन जाते. भाऊ-बहिण ब-याच दिवसांपासून भेटलेले नसतात. कारण ताराच्या दारूड्या नवºयाचे घर सोडून आमिर खूप आधीच निघून गेलेला असतो. ताराने तिच्या क्रूर नवºयापासून आपले रक्षण केले नाही, अशी आमिरची तक्रार असते. पण तारा अगतिक आहे, हेही तो जाणून असतो. दुसºया दिवशी आमिरचा लपवलेला माल आणायला तारा परत जाते, तेव्हा अर्शी तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न करते. स्वत:ची अब्रू वाचवण्यासाठी तारा त्याच्यावर हल्ला करते. पुढे अर्शी रूग्णालयात तर तारा तुरुंगात पोहोचते. आमिरकडे ताराच्या जामिनासाठी पैसे नसतात. अर्शी च्या बयानाशिवाय तारा सुटू शकत नाही, असे आमिरला कळते आणि तो लगेच अर्शी कडे पोहोचतो. अर्शी बद्दल प्रचंड तिरस्कार, घृणा वाटत असूनही आमिर त्याच्या उपचाराचा जिम्मा आपल्या खांद्यावर घेतो. तिकडे तारा तुरुंगातील आयुष्याला सामोरे जाण्याच्या प्रयत्नात लागते. दुसरीकडे ताराच्या घरी राहत असताना आमिरला ताराच्या आयुष्यातील बरीचशी गुपितं कळायला लागतात. अर्शी ची देखभाल करताना आमिरची भेट अर्शीची आई आणि छोट्या मुलीशी होते. याच क्रमात आमिर व तारा आपल्या लाचारीशी कशी झुंज देतात, ही ‘बियॉन्ड द क्लाऊड्स’ची मुख्य कथा आहे.
संवेदनशीलता ही माजिद यांच्या चित्रपटांची खाशियत राहिली आहे. संघर्ष कुठलाही असो, त्या संघर्षाचे भावनिक दृष्टिकोनाचे चित्रण हे त्यांच्या चित्रपटांचे वैशिष्ट्य आहे. याही चित्रपटात माजिदींनी हेच दाखवण्याचा प्रयत्न केलायं.आमिर आणि ताराचा त्रागा, त्यांचा भावनिक प्रवास, इतके काही सहन करून त्यांच्यातील जिवंत असलेली माणुसकी, खरे-खोटे जाणण्याची क्षमता, इतरांसाठीचा त्याग हे सगळे माजिदी अगदी तपशिलाने दाखवतात. कठीण प्रसंगातही आमिर आणि ताराची आजुबाजुच्या लोकांसाठीची सहानुभूती, तुरुंगात एका मैत्रिणीच्या लहान मुलाशी ताराचे नाते, त्याला गाडी मिळवून देण्याचा किंवा चंद्र दाखवण्यासाठीचा तिचा अट्टाहास खूप काही सांगून जाते. आमिरही अर्शीचा संताप येऊनही त्याच्या कुटुंबाला आपल्या घरात आश्रय देतो, स्वत:च्या हृदयात त्यांना जागा देतो. माजिदींनी चित्रपटातील ही सगळी दृश्ये निखळ आनंद देऊन जातात. पण हे सारे हृदयस्पर्शी क्षण मिळून एक अखंड कथा गुंफण्यात माजिदी अपयशी ठरलेले दिसतात. त्यामुळे पुर्णार्थाने मनोरजंक असे या चित्रपटाचे वर्णन करता येणार नाही. साहजिकच याला अनेक कारणे आहेत. एक तर चित्रपटाच्या पटकथेला काहीही लॉजिक नाही. झोपडपट्टीची गरिबी आणि घाण दाखवण्याच्या नादात हा चित्रपट ‘स्लमडॉग मिलेनियर’च्या पद्धतीचा ‘प्रॉवर्टी पॉर्न’ अधिक वाटतो. भाषेची शैली, कथेची सामाजिक पार्श्वभूमी आणि संदर्भ बघता, या चित्रपटाचे दिग्दर्शन एका ‘आऊटसाईडर’ने केल्याचे क्षणोक्षणी जाणवते. एका लहानशा कथेला अनेक फाटे फोडलेले असल्यामुळे कथेतील एक अर्पूणत्व ठळकपणे जाणवते. त्यामुळेच काही काही टप्प्यावर चित्रपट पाहताना कंटाळाही येतो. एकंदर सांगायचे तर एक साधा आणि संवेदनशील चित्रपट असला तरी ‘मस्ट वॉच’, या श्रेणीतील हा चित्रपट नक्कीच नाही.