मनोज वाजपेयीचा 'भैयाजी' मध्ये दिसतोय दबंग अवतार; कसा आहे सिनेमा वाचा Review
By संजय घावरे | Published: May 24, 2024 03:43 PM2024-05-24T15:43:43+5:302024-05-24T15:47:40+5:30
मनोज वाजपेयीचा हा 100 वा सिनेमा आहे. या चित्रपटात त्याचा पुन्हा 'गँग्ज आॅफ वासेपूर'सारखा दबंग अंदाज आहे.
अलीकडच्या काळातील बऱ्याच वेब सिरीज व चित्रपटांमध्ये मनोज बाजपेयीचा पोलिसी खाक्या पाहायला मिळाला, पण 'भैय्याजी' या चित्रपटात त्याचा पुन्हा 'गँग्ज आॅफ वासेपूर'सारखा दबंग अंदाज आहे. अपूर्व सिंह कार्की दिग्दर्शित या चित्रपटाची पटकथा सामान्य दर्जाची असली तरी मनोजने आपल्या कॅरेक्टरला योग्य न्याय दिला आहे.
कथानक : बिहारमधील वर्तमानातील रामचरण दुबे पूर्वी 'भैयाजी' म्हणून ओळखला जायचा. त्याचे गावकऱ्यांवर अनंत उपकार असतात. वडीलांच्या मृत्यूनंतर सर्वसामान्यांप्रमाणे जीवन जगणाऱ्या रामचरणचं लग्न होणार असतं. दिल्लीमध्ये शिकणारा धाकटा भाऊ वेदांत येणार असल्याने रामचरण फोनवरून त्याच्या संपर्कात असतो. अचानक वेदांत फोन घ्यायचं बंद करतो. मित्रांचा फोन लागत नाही. त्यामुळे रामचरण अस्वस्थ असतो. दुसऱ्या दिवशी दिल्लीतील कमलानगर पोलिस ठाण्यातून कॅाल येतो आणि रामचरण दिल्लीला पोहोचतो. तिथे पोहोचल्यावर त्याला एका भयाण वास्तवाला सामोरं जावं लागतं. त्यानंतर रामचरणचा पुन्हा भैया जी होतो.
लेखन-दिग्दर्शन : यात केवळ मनोजचा जलवा आहे. नावीन्याचा अभाव असलेल्या निराशाजनक पटकथेत काही वळणं उत्कंठा वाढवणारी आहेत. संवाद प्रभावी नाहीत. सिनेमाची गती संथ असून, स्लो मोशनमधील दृश्यांनी अधिक भार घातली आहे. एखादे पार्थिव शवागृहातून थेट जाळण्यासाठी नेणं, राजकीय पक्षाला डोनेशनसाठी पारदर्शक बॅाक्समधून पैसे पाठवणं, दोन कंटेनर्समधून पैसे नेल्यानंतर ते रेल्वेच्या डब्यांमध्ये शिफ्ट करणं, राखेचा कलश घेऊन रामचरणचं दिल्ली रेल्वे स्थानकाला जाणं, तिथे वेदांतचे मित्र जणू त्याची वाट पाहात असल्यासारखे भेटणं हे खूपच बालीश वाटतं. रामचरणने पुन्हा भैया जीचं रूप धारण केल्यानंतर तो खलनायकाला पळवून पळवून मारेल असं वाटतं, पण उलट त्यालाच जीव वाचवत पळावं लागतं. सिनेमॅटोग्राफी आणि पार्श्वसंगीत चांगलं आहे.
अभिनय : मनोज बाजपेयीचा दबंग अंदाज यात प्रेक्षकांना खुश करेल. विशेषत: उत्तर प्रदेश-बिहारकडील जनता या चित्रपटाशी अधिक कनेक्ट होईल. मनोजने साकारलेला भैया जी दमदार असला तरी सुमार पटकथेने घात केला आहे. झोया हुसेनचं कॅरेक्टर सुरुवातीला केवळ चहा-पाणी देण्यासाठी असल्यासारखं वाटतं, पण तसं नाही. तिने केलेले अॅक्शन सीन्स प्रभावी वाटतात. सुविंदर विक्कीने साकारलेला हरियाणवी चंद्रभान खतरनाक वाटतो. त्याच्या मुलाच्या भूमिकेत जतिन गोस्वामीनेही चांगलं काम केलं आहे. विपिन शर्मा, आचार्य अनंत, आकाश मखीजा, अमरेन्द्र शर्मा, अमृत सचान आदींनी चांगली साथ दिली आहे.
सकारात्मक बाजू : कलाकारांचा अभिनय, सिनेमॅटोग्राफी, पार्श्वसंगीत, अॅक्शन, वातावरण निर्मिती
नकारात्मक बाजू : पटकथा, दिग्दर्शन, सिनेमाची गती, संकलन
थोडक्यात काय तर मनोजचा पुन्हा तोच जुना अंदाज बघण्यासाठी हा चित्रपट पाहायला हरकत नाही.