Bhoomi movie review : संजय दत्तच्या फॅन्सची घोर निराशा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2017 09:33 AM2017-09-22T09:33:01+5:302023-08-08T19:47:32+5:30
एकतर्फी प्रेमात वेडा झालेला व्यक्ती काय काय करतो हे आजवर आपण ऐकलेच आहे. एकतर्फी प्रेमात वेडे झालेल्या एका मुलामुळे अतिशय हसऱ्या, आपल्या आयुष्या आपल्या पद्धतीने जगणाऱ्या एका मुलीचे आयुष्य कसे बदलते हे प्रेक्षकांना भूमी या चित्रपटात पाहायला मिळते.
भूमी या चित्रपटाद्वारे संजय दत्त कमबॅक करत असल्याने या चित्रपटाकडून प्रेक्षकांच्या खूप अपेक्षा आहेत. खलनायक चित्रपटातनंतर संजय दत्तची तुरुगांत रवानगी झाल्यानंतर त्याचे करियर संपले असे सगळ्यांना वाटत होते. पण वास्तव, मुन्नाभाई सिरीज या चित्रपटांद्वारे त्याने बॉलिवूडमध्ये आपले प्रस्थ पुन्हा निर्माण केले. आपली न्यायलयीन शिक्षा पूर्ण करुन आल्यानंतर आता संजय दत्त बॉलिवूडमध्ये रिएंट्री करणार याची सगळ्यांना खात्री आहे. त्यामुळे भूमी हा चित्रपट त्याच्यासाठी खूपच महत्त्वाचा आहे.
एकतर्फी प्रेमात वेडा झालेला व्यक्ती काय काय करतो हे आजवर आपण ऐकलेच आहे. एकतर्फी प्रेमात वेडे झालेल्या एका मुलामुळे अतिशय हसऱ्या, आपले आयुष्य आपल्या पद्धतीने जगणाऱ्या एका मुलीचे जगच कसे बदलते हे प्रेक्षकांना भूमी या चित्रपटात पाहायला मिळते.
भूमी (आदिती राव हैदरी) आपल्या वडिलांसोबत (संजय दत्त) अतिशय आनंदी जीवन जगत असते. तिचे वडील आणि तिचे एक वेगळे जग असते. तिच्या आयुष्यात नीरज (सिद्धांत गुप्ता) येतो आणि दोघे एकमेकांवर प्रचंड प्रेम करायला लागतात. तिचे वडील तिचे लग्न त्याच्या सोबत ठरवतात. आपल्या प्रियकरासोबत लग्न होणार म्हणून भूमी खूप खुश असते. पण भूमीच्या लग्नाची बातमी कळल्यानंतर तिच्या वर एकतर्फी प्रेम करणारा विशाल भूमीवर लग्न करण्यासाठी बळजबरी करायला लागतो. भूमी त्याला नकार देते. त्यावेळी विशालचा मित्र धौली (शरद केळकर) त्याला भडकवतो. विशाल, धौली आणि त्याचा आणखी एक मित्र मिळून भूमीचे अपहरण करतात आणि तिच्यावर बलात्कार करतात. भूमीचे दुसऱ्याच दिवशीच लग्न असते. ती कशीबशी घरी परतते आणि सगळी गोष्ट लग्नाच्या दिवशी तिचा प्रियकर नीरजला सांगते. नीरज तिला साथ न देता लग्न मोडतो. आपल्या मुलीवर बलात्कार झाला आहे हे ऐकल्यावर भूमीचे वडील आणि त्याचे मित्र (शेखर सुमन) पोलीस स्टेशनमध्ये जाऊन याबाबत तक्रार नोंदवतात. पण त्याचवेळी घरातून भूमीचे अपहरण झालेले असते. विशाल आणि त्याच्या मित्रांनी मिळून भूमीला पळवलेले असते. ते तिला मारायचा प्रयत्न देखील करतात. पण ती या हल्ल्यातून वाचते. भूमी आणि तिचे वडील हा लढा न्यायालयात लढण्याचे ठरवतात. पण भूमी चारित्र्यहिन असल्याचे न्यायालयात समोरच्या पक्षाकडून सिद्ध केले जाते. या सगळ्याचा बदला घेण्यासाठी भूमी आणि तिचे वडील मिळून काय काय करतात हे आपल्याला या चित्रपटात पाहायला मिळते.
एकतर्फी प्रेम हा चित्रपटाचा विषय चांगला होता. पण या चित्रपटाचा कथाविस्तार योग्य रितीने करण्यात आलेला नाहीये. तसेच दिग्दर्शकला कथा तितक्या प्रभावी पणे पडद्यावर मांडता आलेली नाही. मेरी कोम सारखा चित्रपट दिग्दर्शित केलेल्या उमंग कुमारने प्रेक्षकांची निराशा केली आहे.
चित्रपटाच्या सुरुवातीपासून वडील-मुलीचे नाते दाखवण्यासाठी अनेक भावनिक दृश्य चित्रपटात टाकण्यात आलेली आहेत. पण यातील कोणतीच दृश्य मनाला भिडत नाही. चित्रपटातील अनेक दृश्य खटकतात. धौली कोर्टाच्या रूममध्येच भूमीला धमकी देतो किंवा भूमीचे घरातून अपहरण होते. या गोष्टी मनाला पटतच नाही. हा चित्रपट पाहाताना गुंडाराज सुरू आहे का असेच वाटते. भूमी आणि त्याचे कुटुंब हे ताज महालपासून काहीच अंतरावर राहत असल्याचे चित्रपटात दाखवण्यात आलेले आहे. दिल्लीतील मुख्य भागात इतके सगळे होऊनही प्रशासन, मीडिया कसे काय शांत बसू शकते, हेच कळत नाही. त्यामुळे कथेच्या बाबतीत हा चित्रपट सपशेल अपयशी ठरतो. तसेच या चित्रपटातील एकही गाणे ओठावर रुळत नाही. यात सनी लिओनीचे आयटम साँग असूनही ते प्रेक्षकांना ताल धरायला लावत नाही.
संजय दत्त, आदिती हैदरी, शरद केळकर यांनी चांगला अभिनय केला आहे. तसेच शेखर सुमनच्या वाट्याला आलेल्या छोट्याशा भूमिकेलादेखील त्याने न्याय दिला आहे. पण कथेत असलेल्या त्रुटींमुळे चित्रपट आपले मनोरंजन करण्यात अयशस्वी ठरतो. संजय दत्त एक चांगला अभिनेता असूनही तोही चित्रपटाला वाचवू शकलेला नाही असेच हा चित्रपट पाहिल्यावर वाटते.