Bioscopewala : एका वेगळ्या थाटणीचा 'बायोस्कोपवाला'
By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2018 11:05 AM2018-05-25T11:05:35+5:302023-08-08T19:47:32+5:30
रविंद्रनाथ टागोर यांच्या 'काबुलीवाला' या लघुकथेचे मॉर्डन व्हर्जन म्हणजे 'बायोस्कोपवाला' हा चित्रपट. कोलकातामध्ये घडणारी ही गोष्ट आहे.
माणूस आयुष्यात कितीही मोठा झाला तरी प्रत्येकाच्या मनाच्या कप्यात आपल्या बालपणाच्या आठवणी दडलेल्या असतात. काही कटू आठवणी असतात, तर काही गोड असतात... पण प्रत्येकाला त्या हव्याहव्याशा वाटतात. रविंद्रनाथ टागोर यांच्या 'काबुलीवाला' या लघुकथेचे मॉर्डन व्हर्जन म्हणजे 'बायोस्कोपवाला' हा चित्रपट. कोलकातामध्ये घडणारी ही गोष्ट आहे. मिनी बासू (गीतांजली थापा ) ही एक चित्रपटसृष्टीत कार्यरत असलेली फॅशन स्टायलिश असते तर तिचे वडील रोबी बासू (आदिल हुसैन) हे कोलकातामधील प्रसिद्ध फोटोग्राफर असतात. मिनीचे तिच्या वडिलांसोबतचे नातं फारसे काही चांगले नसते. रोबी बासू कोलकातावरून काबुलला जात असताना त्यांच्या विमानाचा अपघात होतो आणि त्यांचा त्यात मृत्यू होतो. वडिलांच्या मृत्यूनंतरच्या विधी पूर्ण करण्यासाठी मिनी परदेशातून कोलकात्याला येते. मिनीच्या लहानपणीपासून त्यांच्या घरी असलेला नोकर भोलाला (ब्रिजेंद्रा काला) घेऊन ती त्या विधी पूर्ण करते. याच दरम्यान भोला घरी रहमत खानला (डॅनी डेन्जोंगपा) घेऊन येतो. रहमत घरी आल्यावर तिला कळते की, त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल आहे आणि तिच्या वडिलांच्या प्रयत्नांमुळे तो तुरुंगातून लवकर बाहेर आला आहे. हे कळल्यावर ती चिडते आणि त्याला घराबाहेर काढायला सांगते. त्यावर भोला तिला त्याला फक्त एक रात्र घरात ठेवू देण्याची विनंती करतो.
मिनी त्याच रात्री आपल्या वडिलांच्या रुममध्ये काही गोष्टींचा शोध घेण्यासाठी जाते, तेव्हा तिच्या लक्षात येत हा रहमत दुसरा तिसरा कुणी नसून त्यांच्या बालपणीचा बायोस्कोपवाला आहे. ज्याच्यासोबत मिनीच्या बालपणीच्या खूप जवळच्या आठवणी असतात. एवढेच नाही तर एकदा या बायोस्कोपवाल्याने आपल्या जीवाची बाजी लावून मिनीला वाचवलेले असते. रहमतला आपल्या मुलीची झलक मिनीमध्ये दिसत असते, जिला तो अफगाणिस्तानमध्ये सोडून आलेला असतो. रहमतच्या रूपाने मिनीसमोर त्याच्या बालपणीचा पिटारा उघडा होतो. त्यामुळे उत्साहित झालेली मिनी रहमतच्या तुरुंगात जाण्यामागचे खरं कारण जाणून घेण्यासाठी कोलकातामध्ये अनेक लोकांची भेट घेते. या भेटीदरम्यान तिला बायोस्कोपवाल्याचे कुटुंबीय अफगाणिस्तानमध्ये असल्याचे कळते. त्यांना आणण्यासाठी ती अफगाणिस्तानला देखील जाते. काय आहे बायोस्कोपवाल्याचे खरं सत्य? तो खरंच निर्दोष आहे का? मिनीला त्याच्या कुटुंबीयांना अफगाणिस्तानमध्ये जाऊन शोधणं शक्य होते का? रहमत आणि त्याच्या कुटुंबीयांची भेटी घालून देण्यात मिनी यशस्वी होते का? या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला थिएटरमध्येच जाऊन मिळतील.
बेबी चित्रपटानंतर सिल्वर स्क्रिनवर आलेल्या डॅनी डेन्जोंगपाने साकारलेला बायोस्कोपवाला तुमच्या मनात कितीतरी वेळ रंगाळत राहतो. डॅनीने साकारलेल्या बायोस्कोपवाल्याला तोड नाही. नॅशनल अॅवॉर्ड विजेती गीतांजली थापा मिनीची व्यक्तिरेखा सुंदररितीने जगली आहे. आदिल हुसैन हे नेहमीप्रमाणे सिक्सर मारुन गेले आहेत. बिजेंद्र काला यांनी ही आपली भूमिका चोख निभावली आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून दिग्दर्शनात पदार्पण करणारा देब मधेकर कौतुकास पात्र आहे. चित्रपटाची सिनेमेटॉग्राफी तर अप्रतिम आहे. चित्रपटात एकच गाणं आहे, जे अनेकवेळा बॅकराऊंडला वाजते. अतिशम कमी वेळात प्रत्येक पात्राने आपली भूमिका दमदारपणे उभी केली आहे. जर तुम्हाला रोमान्स, थ्रिलर आणि अॅक्शन या जॉनरपेक्षा वेगळे काही बघायचे असेल तर तुम्ही बायोस्कोपवाला हा चित्रपट नक्कीच बघा.