Boyz 2 Marathi Movie Review : बॉईजने पुन्हा एकदा घातला दंगा
By प्राजक्ता चिटणीस | Published: October 5, 2018 02:31 PM2018-10-05T14:31:37+5:302023-08-08T19:28:38+5:30
बॉईज आता कॉलेजमध्ये असल्याने पहिल्यापेक्षा आता ही मुले अधिक धमाल मस्ती करणार यात काहीच शंका नाही.
- प्राजक्ता चिटणीस
बॉईज' हा चित्रपट चांगलाच गाजला होता. त्यामुळे प्रेक्षकांना 'बॉईज 2' चित्रपटाकडून खूप साऱ्या अपेक्षा आहेत. हे बॉईज आता कॉलेजमध्ये असल्याने पहिल्यापेक्षा आता ही मुले अधिक धमाल मस्ती करणार यात काहीच शंका नाही.
आजपर्यंत बॉलिवूडमध्ये अनेक अॅडल्ट कॉमेडी बनवण्यात आलेले आहे. 'मस्ती', 'क्या कूल है हम' यांसारखे अॅडल्ट कॉमेडी चित्रपट प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले आहेत. बॉईज 2 देखील याच प्रकारात मोडणारा चित्रपट आहे. ढुंग्या (पार्थ भालेराव), धैर्या (प्रतीक लाड) आणि कबीर ( सुमंत शिंदे) हे तिघे मित्र बारावीत असून त्यांचे नऱ्या (ओंकार भोजणे) या सिनिअर सोबत चांगलेच वाकडे आहे. त्याच्या सोबत सतत ढुंग्या आणि धैर्या यांची भांडणे होत असतात. या सगळ्यांपासून दूर राहण्यासाठी कबीर बारावीच्या वर्षात हॉस्टेलला न राहायचे ठरवतो. पण कॉलेजमध्ये नव्याने आलेल्या चित्रा (सायली पाटील)च्या तो प्रेमात पडतो आणि तिच्यासाठी तो होस्टेलला राहायला येतो. पण कबीर, ढुंग्या आणि धैर्या यांचे नऱ्या सोबतचे वाद सुरूच असतात. त्यात या सगळ्यांमध्ये एक पैज लागते. ही पैज पूर्ण करू न शकणाऱ्याला कॉलेज सोडून जावे लागेल असे ठरते. आता ही पैज काय आहे, या पैजेचा या मुलांच्या आयुष्यवर काय परिणाम होतो हे चित्रपट पाहिल्यानंतरच कळेल.
बॉईज 2 हा चित्रपट अॅडल्ट कॉमेडी असल्याने या चित्रपटाचे अनेक संवाद डबल मिनींग प्रकारातले आहे. हे संवाद आजची तरुण पिढी डोक्यावर घेणार यात काहीच शंका नाही. हा चित्रपट अॅडल्ट मूवी असला तरी हा चित्रपट अश्लिलतेकडे झुकणार नाही याची काळजी दिगदर्शकाने घेतली आहे. चित्रपटात सुमेध शिंदे, प्रतीक लाड आणि पार्थ भालेराव यांनी त्यांची भूमिका खूपच चांगल्या प्रकारे सादर केली आहे. चित्रपटात मारामारी, दोन गटातील खुन्नस या गोष्टी सतत येत असल्याने चित्रपटात तोच तोच पणा येतो. चित्रपटातील गाणी तितकीशी जमून आलेली नाहीत.
'बॉईज 2' हा चित्रपट मुलांना न रागवता त्यांच्या कलेने घेतले पाहिजे हा संदेश नकळतपणे देऊन जातो. तसेच शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये असलेले नाते चित्रपटात चांगल्या पद्धतीने दाखवले आहे. तसेच आजकाल इंटरनेटच्या माध्यमामुळे पॉर्नसाईट सहज उपलब्ध झाल्या आहेत. यामुळे मुले कशाप्रकारे चुकीच्या मार्गाकडे वळत आहेत यावर खूप चांगल्या प्रकारे प्रकाशझोत टाकण्यात आला आहे. पण चित्रपटाचा शेवट तितकासा जमून आलेला नाहीये. पॉर्न व्हिडिओ वायरल झाल्यानंतर एका मुलीच्या आयुष्यावर याचा परिणाम काय होतो हे दाखवण्यात चित्रपट अयशस्वी ठरतो.
यतीन कार्येकर, ओंकार भोजणे व अमित रियान यांनी भूमिकेला योग्य न्याय दिला आहे. गिरीश कुलकर्णी केवळ काहीच दृश्यात आहेत. पण त्यांची भूमिका लक्षात राहते. शर्वरी जमेनीसच्या भूमिकेला तितकासा वाव मिळालेला नाहीये. या चित्रपटाचे काही चित्रीकरण लेहमध्ये झाले आहे. तिथली सिनेमॅटोग्राफी चांगली झाली आहे. एकंदरीत या बॉईजना चित्रपटगृहात जाऊन भेटायला काहीच हरकत नाही.