Bucket List Movie Review : प्रेक्षकांची बकेट लिस्ट रिकामीच
By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2018 12:47 PM2018-05-24T12:47:12+5:302023-08-08T19:16:16+5:30
बकेट लिस्ट या चित्रपटात माधुरी दीक्षित पुण्यात राहाणाऱ्या एका स्त्रीची भूमिका साकारत आहे.
बकेट लिस्ट या चित्रपटाद्वारे बॉलीवूड मधील धकधक गर्ल माधुरी दीक्षित मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. त्यामुळे या चित्रपटाची गेल्या कित्येक दिवसांपासून सगळ्यांना उत्सुकता लागली आहे. पण माधुरीचे मराठमोळेपण चित्रपट पाहताना आपल्याला जाणवत नाही. तिच्या तुलनेत चित्रपटातील इतर कलाकारांनी बाजी मारली आहे. त्यामुळे हा चित्रपट माधुरीच्या चाहत्यांची नक्कीच निराशा करणार आहे.
मधुरा (माधुरी दीक्षित) ही एक गृहिणी असते. आपले घर आणि संसार याशिवाय तिचे आयुष्य नसते. चित्रपटाच्या सुरुवातीलाच मधुरावर हृदय प्रत्यारोपणची शस्त्रक्रिया झालेली आपल्याला पाहायला मिळते. तिला कोणाचे हृदय मिळाले आहे याची तिला उत्सुकता असते. त्यामुळे ती त्याचा शोध घेत सईच्या घरी पोहोचते. सईच्या मृत्यूने तिची आई (रेणुका शहाणे) वडील (मिलिंद फाटक) आणि भाऊ साहिल (सुमेध मुद्गलकर) पूर्णपणे ढासळलेले असतात. सई ही स्वच्छंद मनाची, आपले आयुष्य आपल्याप्रमाणे जगणारी मुलगी असते. तिच्या २१ व्या वाढदिवसाआधी तिला तिच्या आयुष्यात काय काय करायचे याची तिने बकेट लिस्ट बनवली असते. तिची ही बकेट लिस्ट मधुरा पूर्ण करायचे ठरवते. सईच्या या बकेट लिस्ट मध्ये काय काय असते आणि यामुळे मधुराच्या आयुष्याला एक प्रकारची कलाटणी कशी मिळते हे आपल्याला बकेट लिस्ट या चित्रपटात पाहायला मिळते.
संसारात गुंतलेली स्त्री कुटुंबाच्या व्यापात आपले स्वतःचे आयुष्य जगायचेच विसरून जाते. हे आयुष्य नव्याने जगण्याची एक उमेद देणारा हा बकेट लिस्ट आहे. बकेट लिस्टचा विषय वेगळा असला तरी तो विषय दिग्दर्शकाने तितकासा चांगल्याप्रकारे मांडलेला नाही. चित्रपटात अनेक उपकथा उगाचच टाकल्यासारख्या वाटतात. मधुरा आणि तिच्या नवऱ्यात सगळे काही आलबेल सुरू असताना अचानकपणे त्यांच्या नात्यात कटुता दाखवण्याची खरंच गरज होती का असा प्रश्न चित्रपट पाहाताना नक्कीच पडतो. तसेच मध्यंतरापर्यंत चित्रपटाला चांगली गती आहे पण मध्यंतरानंतर चित्रपट खूपच संथ वाटतो. माझ्या मना हे गाणे वगळता इतर कोणते गाणे ओठावर रुळत नाही.
अभिनय करताना संवादासोबत देहबोली, सहजता या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या असतात. हिंदी चित्रपटात काम करताना माधुरी जितकी सहजतेने वावरते, एखादी व्यक्तिरेखा सहजपणे साकारते, ते आपल्याला बकेट लिस्ट मध्ये पाहायला मिळत नाही. तिच्या तुलनेत वंदना गुप्ते, शुभा खोटे, सुमित राघवन हे अभिनयात उजवे ठरले आहेत असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. वंदना गुप्ते आणि शुभा खोटे यांनी तर अनेक दृश्यांमध्ये बाजी मारली आहे. शुभा खोटे यांनी एक अल्लड आजी मस्तच रंगवली आहे. रेणुका शहाणे यांच्या वाट्याला छोटी भूमिका आली असली तरी त्यांनी ती चांगल्याप्रकारे साकारली आहे. त्यांना संवाद कमी असले तरी त्यांनी डोळ्यातून अप्रतिम अभिनय केला आहे. सुमेध, रेशम टिपणीस यांनी देखील त्यांच्या वाट्याला आलेल्या भूमिका चांगल्या साकारल्या आहेत.
चित्रपटाच्या एडिटिंग मध्ये देखील चुका आहेत. एका दृश्यात वंदना गुप्ते एका माणसाशी मराठी मिश्रित हिंदीत बोलत असतात. ते दृश्य रंगात येत असताना अचानक वंदना गुप्ते आणि सुमित राघवन यांच्यात संवाद सुरू असलेले दुसरेच दृश्य आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे एकंदरीत माधुरीच्या आजवरच्या बॉलीवूड चित्रपटांचा विचार केला तर हा चित्रपट आपली निराशा करतो.