बालिश ‘बेफिक्रे’!!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2016 06:04 PM2016-10-17T18:04:27+5:302023-08-08T19:28:38+5:30

पॅरिसमध्ये रंगणारी लवस्टोरी या सिनेमात पाहायला मिळेल.

Childish 'Bichrere' !! | बालिश ‘बेफिक्रे’!!

बालिश ‘बेफिक्रे’!!

Release Date: December 09,2016Language: हिंदी
Cast: रणवीर सिंह, वाणी कपूर
Producer: आदित्य चोप्राDirector: आदित्य चोप्रा
Duration: 2 तासGenre:
लोकमत रेटिंग्स
style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: 12.8px;">
जान्हवी सामंत

रिलीजपूर्वी ‘बेफिक्रे’च्या अनेक चर्चा बॉलिवूडमध्ये रंगल्या. ‘उडे दिल बेफिके्र’हे गाणेही चांगलेच लोकप्रीय झाले. तब्बल नऊ वर्षांनंतर आदित्य चोपडा दिग्दर्शित चित्रपट पडद्यावर येतोयं, म्हटल्यावर ‘बेफिक्रे’बद्दलची उत्सुकता स्वाभाविकच होती. त्यातच चित्रपटातील ४० चुंबन दृश्ये शिवाय अभिनेता रणवीर सिंह व वाणी कपूर यांची हॉट केमिस्ट्री पाहण्यासही प्रेक्षक  उत्सूक होते.  त्यानुसार आज (९ डिसेंबर )शुक्रवारी हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. ९ डिसेंबर हा आदित्य चोप्रा आणि राणी मुखर्जी यांची मुलगी आदिरा हिचा पहिला वाढदिवस. नेमका हाच मुहूर्त साधून ‘बेफिक्रे’ प्रेक्षकांच्या भेटीस आला.

 बेफिक्रे’ म्हणजे धर्मा (रणवीर सिंह)आणि शायरा(वाणी कपूर) या दोन ‘बेफिक्रे’ युवांची कहानी. दिल्लीचा धर्मा एका नाईटक्लब रेस्टॉरंटमध्ये कॉमेडी शोच्या निमित्ताने पॅरिसमध्ये येतो. एखाद्या सर्वसामान्य भारतीय तरूणाप्रमाणेच धर्मा सुद्धा पॅरिस म्हणजे केवळ सुंदर ललना, हीच एक भावना घेऊन या शहरामध्ये येतो. याच पॅरिसमध्ये शायरा ही भारतीय पर्यटकांची गाईड असते. शायराचे भारतीय आई-वडील पॅरिसमध्ये रेस्टॉरंट चालवत असतात. पण शायरा ही पूर्णपणे स्वत:च्या अटींवर आयुष्य जगणारी मुलगी असते. शायरा आणि धर्मा ज्यादिवशी भेटतात. त्याच रात्री एकत्र येतात. शायराचा प्रेमावर विश्वास नसतो. पण तरिही दोघांमध्ये रोमान्स रंगतो आणि पुढे अनाकलनीय अशा वळणावर त्यांचे ब्रेकअपही होते. या ब्रेकअपनेच चित्रपटाला सुरुवात होते. अर्थात ब्रेकअपमुळे हे कपल जराही विचलित होत नाही. पुढे धर्मा आणि शायराने सोबत घालवलेल्या क्षणांच्या फ्लॅशबॅकसह चित्रपटाची कथा पुढे सरकते.

‘मला भारतीय पुरुष आवडत नाही’,असे शायरा म्हणते. यावर एक क्षणही न घालवता ‘मलाही आवडत नाहीत. भारतीय पुरुषांमधून मेथीचा वास येतो’, असे तिला भेटलेला भारतीय तरूण धर्मा म्हणतो. धर्माच्या या एका वाक्यावर शायरा भाळते. इतकेच नाही तर या एका वाक्यावर ती धर्मासोबत रात्र घालवण्यासही राजी होते. शायरा आणि धर्मा म्हणजे बेपर्वा आणि काहीसे असभ्य तरूण. प्रेमाबद्दलच्या त्यांच्या कल्पनाही तितक्याच बालिश. याच बालिशपणासोबत  पोलिसांना थप्पड मारणे, सार्वजनिक ठिकाणी प्रेमाचे प्रदर्शन करणे अशा पोरकट गोष्टी चित्रपटात येतात. मध्यंतरानंतर अचानक, आपल्यात प्रेम नसून एकमेकांप्रती केवळ वासना आहे, याचा धर्मा व शायरा यांना साक्षात्कार होतो आणि त्यानंतर दोघेही  प्रियकर-प्रेयसी बनण्याऐवजी एकमेकांचे मित्र बनण्याचा निर्णय घेतात. हा‘नॉन-रोमान्स’ रंगवण्यासाठी दिग्दर्शक आदित्य चोप्रा  यांनी‘सिटी आॅफ लव्ह’ अर्थात पॅरिसचा वापर केलेला आहे. अर्थात या चित्रपटाचे हिरो आणि हिरोईन पॅरिसमध्ये नसून कायम भारतात असल्याप्रमाणेच वागताना दिसतात. हिंदीच क्लबमध्ये जाण्यापासून हिंदी कॉमेडी नाईट्स एन्जॉय करण्यापर्यंत ते भारतातलेच वाटतात. केवळ वाट्टेल तेव्हा आणि वाट्टेल त्या सार्वजनिक  ठिकाणी त्यांचे किस हेच तेवढा पॅरिसचा फिल देतात. ‘बेफिक्रे’ जगण्याच्या नादात तिसरा कुणी मध्ये येईपर्यंतआपण एकमेकांच्या पे्रमात आहोत, हेही या जोडीच्या लक्षात येत नाही.  
 
एकीकडे धर्मासोबत रोमान्स करत असताना शायराला एक बँकर आवडू लागतो. त्याच्यासोबतच्या डेटींगसाठी धर्मा तिला मदतही करतो.  इतकेच नाही तर, हा बँकरच तुझा चांगला जोडीदार ठरू शकतो. तोच तुझ्यासाठी योग्य आहे, हे शायराला पटवून देण्यातही धर्मा यशस्वी होतो आणि आत्तापर्यंत हलका-फुलका खेळकर वाटणारा हा सिनेमा पुढे मेलोड्रामॅटिक होतो. शायरा बँकरसोबत लग्न करण्यास राजी झाल्यावर धर्माला तिच्यावरील प्रेमाची प्रचिती येते. तोपर्यंत तरी पॅरिसमध्ये भेटेल त्या मुलीसोबत रात्र घालवणे, एवढेच काय धर्मा करत असतो. याच टप्प्यावर धर्मा अचानक एका फ्रेंच महिलेशी लग्न करण्याचा निर्णय घेतो. एक हलकीफुलकी कथा यानंतर काहीशा बळजबरीने अनावश्यक दु:ख आणि नाट्यमय वळणावर आणली जाते आणि सरतेशेवटी लग्नमंडपातला वात्रट क्लायमॅक्स पाहायला मिळतो.

‘बेफिक्रे’ म्हणजे अतिशय पोरकट आणि बालिश चित्रपट, हेच चित्रपट पाहिल्यानंतर वाटते. विशेषत: विदेशींबद्दल, विदेशी बायकांबद्दल आणि समलैंगिक व्यक्तिंबद्दलचे यातील जोक्स म्हणजे पराकोटीचा बालिशपणा वाटतो. स्वत:च्या वागण्या-बोलण्याकडे जराही लक्ष न देता यातील हिरो-हिरोईन  केवळ एकमेकांसमोर स्वत:ला सिद्ध करण्यात आणि एकमेकांना जेलस फिल करण्यात धन्यता मानताना दिसतात. केवळ आणि केवळ रणवीर सिंह याच्यामुळे हा बालिश चित्रपट काहीसा सुसह्य होता. केवळ त्याच्याचमुळे धर्माचा वाह्यातपणा अश्लिलता वाटत नाही. रणवीरऐवजी अन्य कुण्या अभिनेत्याने धर्मा ही व्यक्तिरेखा रंगवली असती तर निश्चितपणे ती अश्लिलता वाटली असती, यात जराही शंका नाही. आपल्या ऊर्जेने रणवीर अख्खा चित्रपट व्यापून टाकतो. केवळ आणि केवळ रणवीरच्या ऊर्जेमुळेच हा थकलेला सिनेमा मनोरंजक वाटतो.

वाणी कपूरबद्दल तर कमी बोललेलेच बरे. कुठल्याही प्रसंगात तिचा अभिनय शायरा या व्यक्तिरेखेशी मेळ खात नाही. ती अशी का वागते? धर्मासारख्या तरूणात मैत्री करण्यासारखे तिला काय दिसते, याचा अखेरपर्यंत अंदाज येत नाही. खरे तर दिग्दर्शकाने स्वत:ही अर्थाच्या आणि तर्काच्या कसोटीवर चित्रपटाचा विचार केलेला दिसत नाही. कदाचित त्यामुळेच ‘प्रेम हे बंजी जम्पप्रमाणे असतं. फक्त उडी मारायची. सेफ लँन्डिंगची गॅरंटी नाही,’असा डायलॉग या चित्रपटाचा हिरो शेवटी मारतो. एकंदर काय तर ‘बेफिक्रे’ बघायचा असेल तर अशीच बंजी जम्प मारा. आवडेलच याची गॅरंटी नाही.

Web Title: Childish 'Bichrere' !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.