'Commando 2' film review : आणखी एक रटाळ सीक्वल!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2017 07:10 AM2017-02-06T07:10:25+5:302023-08-08T19:16:16+5:30
‘कमांडो २’ हा ‘कमांडो : अ वन मॅन आर्मी’ या चित्रपटाचा सिक्वेल असून यात काळा पैसा आणि भ्रष्टाचार विरोधातील कथानक ठरवण्यात आले आहे.
विद्युत जामवाल याचा ‘कमांडो2’ हा चित्रपट आज शुक्रवारी चित्रपटगृहांत प्रदर्शित झाला. ‘फोर्स’ आणि ‘कमांडो’ या चित्रपटांतील विद्युतच्या जबरदस्त अॅॅक्शनने लोकांची मने जिंकली होती. ‘कमांडो2’मध्येही विद्युत अशाच जबरदस्त अॅक्शनमध्ये दिसतोय. पण दुदैवाने ‘कमांडो’चा सीक्वल असलेला ‘कमांडो2’ पाहतांना निराशाच वाट्याला येते. सीक्वल हे निराशाजनकच असणार, हे कदाचित आताश: कॉमन झाले आहे. अलीकडे आलेल्या ‘फोर्स2’,‘कहानी2’ या सगळ्या सीक्वलनी प्रेक्षकांची निराशा केली. याऊपरही ‘कमांडो2’कडून प्रेक्षकांना बरीच अपेक्षा होती. कारण अॅक्शनपटांसाठी भारतीय सिनेमात नेहमीच एक हक्काची जागा राहत आलीय. पण हा अॅक्शनपट पुरती निराशा करतो. ‘कमांडो’मध्ये अतिशय आगळीवेगळी पटकथा गुंफली गेली होती. याच्या सीक्वलची पटकथा मात्र नुसताच गोंधळ वाढवते.
चित्रपटाची संपूर्ण कथा काळ्या पैशाभोवती फिरताना दिसते. मलेशियात ब्लॅक मनी लाँड्रिंग एजंट विकी चड्ढा याला अटक होते आणि या अटकेसोबत चित्रपटाची कथा पुढे सरकते. विकी हा भारत सरकारसाठी दुधारी तलवार असतो. कारण देशातील अनेक बड्या व लोकप्रीय धनाढ्यांनी विकीच्या माध्यमातून आपला काळा पैसा विदेशात जमा केलेला असतो.भारतीयांचा अब्जावधी काळा पैसा कसा व कुठे दडवण्यात आला, हे केवळ विकीलाच ठाऊक असते. त्यामुळे गृहमंत्री लीला चौधरी (शेफाली शहा) विकीला भारतात आणण्याची योजना आखते. कारण विकीने तोंड उघडलेच तर लीला चौधरीचा मुलगाही अडकणार असतो. यासाठी विकीला भारतात आणण्यासाठी एक गुप्त मिशन आखले जाते. यासाठी एक टीम (अदा शर्मा व आदिल हुसैन)मलेशियाला पाठवली जाते. या टीमचे नेतृत्व सोपवले जाते पोलिस इन्स्पेक्टर भख्तवार (फ्रेडी दारूवाला) याच्याकडे. पण विशेष दलाला या टीमवर विश्वास नसतो. कारण या टीममध्ये एन्काऊंटर स्पेशालिस्ट भावना रेड्डी (अदा शर्मा ) सारख्या भ्रष्ट अधिकाºयांचा समावेश असतो. त्यामुळे स्पेशल फोर्स कमांडो करण(विद्युत जामवाल) याची या टीममध्ये ऐनकेनप्रकारे वर्णी लावतात. प्रचंड प्रामाणिक असलेला कमांडो करण व भख्तवार यांचा संघर्ष साहजिकच चित्रपटात दिसतो. याचदरम्यान विकीची पत्नी मारिया(ईशा गुप्ता) करणची दिशाभूल करते आणि सगळी टीम वेगळ्याच जाळ्यात अडकते.
या सगळ्या कटकारस्थाविरूद्ध लढण्यापेक्षा कमांडो करण सगळा वेळ निगरानीत घालवतो. चित्रपटाचा हा भाग प्रचंड कंटाळवाणा वाटतो. त्यातच चित्रपटात मूर्खपणाचा कळस वाटतील अशी वळणावर वळण येतात. कुठलाही थ्रील नसलेले हे प्रसंग चित्रपट अधिकच कंटाळवाणा करतात. यातील कलाकारही केवळ कर्तव्य केल्यासारखे एक एक सीन्स करताना दिसतात. यातला हिरो काळ्या धनाचा शोध लावण्याची महत्त्वाकांक्षा बाळगत असतानाच, चित्रपटातील महत्त्वाचा सन्स्पेस उघड होतो. त्यामुळे चित्रपटाचा क्लायमॅक्समधला दमच निघून जातो आणि मग एक सुस्त, कुठलाही थरार नसलेला अॅक्शनपट मागे उरतो. अशा अॅक्शनपटाकडून निराशा अपेक्षितच म्हणावी लागेल.