'नगरसेवक - एक नायक' : राजकारण विरुद्ध समाजकारण!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2017 02:26 PM2017-03-31T14:26:53+5:302023-08-08T19:16:16+5:30
सयाजी शिंदे, उपेंद्र लिमये, गणेश यादव, संजय खापरे, सुनील तावडे, विनय आपटे असे खरोखरचे तगडे कलावंत चित्रपटात आहेत म्हटल्यावर डोळ्यांसमोर जे चित्र उभे राहते; त्याला नगरसेवक - एक नायक हा चित्रपट अपवाद ठरलेला नाही.
सयाजी शिंदे, उपेंद्र लिमये, गणेश यादव, संजय खापरे, सुनील तावडे, विनय आपटे असे खरोखरचे तगडे कलावंत चित्रपटात आहेत म्हटल्यावर डोळ्यांसमोर जे चित्र उभे राहते; त्याला नगरसेवक - एक नायक हा चित्रपट अपवाद ठरलेला नाही. या कलावंतांची कामगिरी हा या चित्रपटाचा प्लस-पॉर्इंट आहे. त्या जोडीला पटकथा आणि तिची मांडणी यांचे सूरही जुळून आल्याने, विषयात फारसे नावीन्य नसूनही हा चित्रपट दखल घेण्यास भाग पाडतो.
राजकारण आणि समाजकारण यात झोके घेणाºया या चित्रपटात मनोरंजनासाठी लागणारे सगळे साहित्य हजर आहे. त्यामुळे ही रेसिपी करमणूकप्रधान झाली आहे. नाही म्हणायला, यात काही त्रुटी नक्कीच आहेत; परंतु ज्याप्रमाणे हिंदी चित्रपटांचा एकूणच औरा त्यातली कमतरता विसरायला लावतो, तशा पद्धतीची हाताळणी या चित्रपटात झालेली दिसते.
अन्यायाविरोधात लढणाºया मल्हार या तगड्या तरु णाची ही कथा आहे. त्याचा मित्र जग्या याच्यामार्फत मल्हारची स्थानिक राजकारण्यांशी ओळख होते. तिथल्या नेत्यांच्या नजरेत मल्हारचे समाजकारण भरते आणि हे प्यादे महत्त्वाचे असल्याची चर्चा राजकीय पटलावर होऊ लागते. याचीच परिणती त्याच्या हाती नगरसेवक पदाचे तिकीट पडण्यात होते आणि जनतेच्या भक्कम पाठिंब्यावर मल्हार नगरसेवक म्हणून निवडून येतो; मात्र त्याच्यामागे पक्षीय राजकारण वेगळेच रंग खेळत असते. काही कारस्थाने त्याच्या पाठीमागे सुरू होतात आणि यात स्थानिक नेत्यांचा मोठा हातभार असतो. या राजकीय सोंगट्यांच्या डावात मल्हारचे पुढे काय होते, याची उत्कंठा वाढवत हा नगरसेवक, एक नायक म्हणून उभा राहतो.
बिपीन धायगुडे व अभिजित कुलकर्णी यांची पटकथा आणि त्यांच्यासह योगेश मार्कंडे याने लिहिलेले संवाद जमून आले आहेत. दिग्दर्शक दीपक कदम यांनी या कथेला दिलेली ट्रीटमेंट धडाकेबाज आहे. स्टंटबाजीने चित्रपटाचा बराच भाग व्यापला असला, तरी हे स्टंट्स थरारक झाले आहेत. कथेत बºयाच व्यक्तिरेखा आहेत आणि त्यांची चांगली मोट दिग्दर्शकाने बांधली आहे. पूर्वार्धापेक्षा चित्रपटाचा उत्तरार्ध अधिक डॅशिंग झाला आहे; मात्र मनोरंजनाचा तडका वाढावा म्हणूनच केवळ यात आयटेम सॉंगची वर्णी लागल्याचे जाणवते. तसेच, विषयात नावीन्याचा असलेला अभाव ही या चित्रपटाची पडती बाजू म्हणावी लागेल; कारण अनेकदा पुढे काय होणार याचा बांधलेला अंदाज अजिबात चुकत नाही.
या चित्रपटातली मल्हार ही मध्यवर्ती व्यक्तिरेखा उपेंद्र लिमये याने टेचात रंगवली आहे. त्याच्या व्यक्तिमत्त्वाला साजेशी अशीच ही भूमिका आहे आणि त्यात उपेंद्रने दणका उडवून दिला आहे. चित्रपटातल्या राजकीय पटावरच्या व्यक्तिरेखांचा आलेख उंचावण्यात सयाजी शिंदे (भाऊ शेट्टी), गणेश यादव (दत्ता), संजय खापरे (निशिकांत), सुनील तावडे (आमदार काळे) आदि सीनिअर कलावंतांची फळी यशस्वी झाली आहे. विनय आपटे व सतीश तारे या गुणी नटांचे दर्शनही चित्रपटात होत राहते आणि त्यांच्या आठवणी ताज्या होतात. श्याम ठोंबरे याचा जग्यासुद्धा लक्ष वेधून घेतो. नेहा पेंडसेला यात फार काही करण्यास वाव मिळालेला नाही. बाकी सविता मालपेकर, विजय निकम, वर्षा दांदळे आदिंनी छोट्या-छोट्या भूमिकांमध्ये योग्य ते रंग भरले आहेत. एकूणच, स्टंट्सची आवड असणाºयांना आणि निव्वळ मनोरंजन म्हणून चित्रपट पाहणाºयांना हा नगरसेवक भुरळ पाडू शकेल.