cycle marathi movie review : नकळत शिकवण देणारी सायकल
By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2018 11:58 AM2018-05-03T11:58:35+5:302023-08-08T19:28:38+5:30
“सायकल” ही एक हलकीफुलकी कथा आहे ज्यामधून तुम्ही स्वतःचा शोध घेण्याचा प्रवास सुरू कराल. सायकल सिनेमा तुम्हाला भारताच्या स्वातंत्र्यपूर्व काळातील कोकणातील एका छोट्या गावात घेऊन जातो. या सिनेमात सायकल वर अतिशय प्रेम असलेल्या प्रमुख पात्राचे केशवचे हृद्यस्पर्शी चित्रण आहे.
प्रत्येकाच्या आयुष्यात एखादी तरी वस्तू खूप खास असते. त्या वस्तूशिवाय ते स्वतःच्या आयुष्याचा विचार देखील करू शकत नाही, ती वस्तू हरवली किंवा त्या वस्तूला काय झाले तर ते प्रचंड दुःखी होतात. अनेकवेळा आपल्या जवळच्या व्यक्तीपेक्षादेखील ते त्या वस्तूची अधिक काळजी घेतात. पण खरंच एखाद्या वस्तूला आपल्या आयुष्यात इतके महत्त्व देणे गरजेचे आहे का या विषयावर हलक्याफुलक्या भाषेत सायकल या चित्रपटात भाष्य करण्यात आले आहे. सायकल या चित्रपटाची कथा केशव आणि त्याच्या आजोबांनी त्याला भेट म्हणून दिलेल्या सायकलभोवती फिरते. केशवच्या आजोबांना एका इंग्रजाने एक सुंदर सायकल भेट म्हणून दिलेली असते. ही सायकल ते आपल्या मुलाला न देता आपला नातू केशव (हृषिकेश जोशी)ला देतात. केशवसोबत या सायकलचे अतूट नाते निर्माण झालेले असते. केशव सगळीकडे त्याच्या सयाकलवरूनच फिरत असतो. त्यामुळे पंचक्रोशीतील गावांमध्ये त्याची सायकल प्रसिद्ध असते. त्याच्या सायकलला कोणी हात लावलेले देखील त्याला आवडत नसते. एक दिवशी केशवच्या गावात एक चोरी होते. गजा (प्रियदर्शन जाधव) आणि मंग्या (भाऊ कदम) गावातील एका घरातून सोने घेऊन पळतात. पळताना त्यांना केशवच्या घरासमोर त्याची सायकल दिसते. आपल्याला गावाच्या बाहेर या सायकलमुळे लवकर जाता येईल असा विचार करून ते ही सायकल देखील चोरतात. सायकल चोरल्यानंतर केशवची अवस्था काय होते, केशवची सायकल पंचक्रोशीतील सगळीच लोकं ओळखत असल्याने ही सायकल चोरल्यानंतर मंग्या आणि गजा यांना लोकांच्या प्रश्नांना कशाप्रकारे उत्तरे द्यावी लागतात, केशवला त्याची सायकल मिळते की नाही ही उत्तरे हा चित्रपट पाहिल्यावर लोकांना मिळतील.
सायकल या चित्रपटात एक खूपच छान संदेश हलक्या फुलक्या पद्धतीने देण्यात आला आहे. सायकल या चित्रपटाची कथा ही अतिशय साधी, सोपी आहे. त्यामुळे सामान्य लोकांच्या मनाला ही कथा नक्कीच भिडते. पण हा चित्रपट खूपच संथ आहे. मध्यांतरापर्यंत तर केशवचे सायकलबद्दल असलेले प्रेम, सायकल हरवल्यावर त्याची झालेली अवस्था याशिवाय प्रेक्षकांना नवे असे काही पाहायला मिळत नाही. पण मध्यांतरानंतर अनेक गोष्टी घडतात. लोकांनी केशवची सायकल ओळखल्यावर त्यांना मंग्या आणि गजाने दिलेली उत्तरे, त्यातून लोकांनी त्यांना दिलेली वागणूक यामुळे प्रेक्षकांचे नक्कीच मनोरंजन होते. चित्रपटात प्रियदर्शन जाधव, भाऊ कदम, हृषिकेश जोशी यांनी सगळ्यांनी आपल्या भूमिकेला योग्य न्याय दिला आहे. चिमुकली मैथिली पटवर्धन देखील नक्कीच लक्षात राहाते. चित्रपटाचे पार्श्वसंगीत देखील चांगले आहे. पण चित्रपटाचा काळ हा एकोणिसाव्या शतकातला आहे हे दाखवण्यात दिग्दर्शक प्रकाश कुंटे अपयशी ठरले आहेत. १९५२ च्या काळात देखील आजसारख्या कप, बशा वापरल्या जात होत्या का असा प्रश्न चित्रपट पाहाताना नक्कीच पडतो. एक छोटाशा कथेद्वारे एक चांगला संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला असला तरी हा चित्रपट आपले मनोरंजन करण्यात यशस्वी ठरत नाही.