शाहिद कपूरचा 'देवा' पाहून 'कबीर सिंग' विसराल, कसा आहे सिनेमा? वाचा रिव्ह्यू
By सुजित शिर्के | Updated: February 1, 2025 08:43 IST2025-01-31T18:16:00+5:302025-02-01T08:43:12+5:30
शाहिद कपूरचा बहुप्रतिक्षित 'देवा' सिनेमा रिलीज झाला आहे.

शाहिद कपूरचा 'देवा' पाहून 'कबीर सिंग' विसराल, कसा आहे सिनेमा? वाचा रिव्ह्यू
शाहिद कपूरचा बहुप्रतिक्षित 'देवा' सिनेमा रिलीज झाला आहे. रोशन अँड्र्युज यांनी सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. अॅक्शन, थ्रिलर आणि 'सस्पेन्स' ने खिळवून ठेवणारा असा हा सिनेमा आहे. शाहिदने याआधीही अॅक्शनपट केले असून हा त्या सगळ्यापेक्षा वेगळा, वरचढ जाणवतो. या सिनेमातून शाहिद वर्षभरानंतर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
कथानक : शाहिद कपूर या सिनेमात देव आंब्रे नावाच्या एका पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत पाहायला मिळतोय. एकंदरीत व्यवस्थेला न जुमानणारा पोलीस अधिकारी आपल्या मर्जीचा मालक, अशी स्वभाव वैशिष्ट्ये त्याची आहेत. या सिनेमात एका महत्वाच्या प्रकरणाचा छडा लावून येत असताना वाटेत त्याचा अपघात होतो आणि त्यामुळे त्याचा स्मृतीभ्रंश होतो. त्यानंतर खऱ्या अर्थाने कथानकाला सुरुवात होते. मग गुन्हेगारांचा पाठलाग करताना विस्मरणाचा आजार झालेल्या शाहिदला कोणत्या प्रकारचा सामना करावा लागतो याची रंजक आणि थराराक कहाणी म्हणजे 'देवा'.
लेखन-दिग्दर्शन : पटकथेबाबत सांगायचं तर मध्यंतरानंतर सिनेमाचा वेग कमी होत जातो. तसंच काही ठिकाणी आक्षेपार्ह दृश्यांची आवश्यकता नव्हती असं जाणवतं. तरीही सिनेमाचा शेवट दमदार बनवण्यात दिग्दर्शकाला यश आलं आहे. संवादांमध्येही बऱ्यापैकी वेगळेपण आहे. अगदी सिनेमातील पात्रांपासून ते अॅक्शन सीन्सपर्यंत सगळ्यामध्येच तुम्हाला दिग्दर्शकाचा एक खास टच बघायला मिळतो. काही त्रुटी सोडल्यास सिनेमा कंटाळवाणा वाटत नाही.
याशिवाय काही दृश्य आवश्यक नसतानाही सिनेमात दिसतात. त्यामुळे सिनेमाची लांबीही वाढते. क्लायमॅक्सला दिग्दर्शकाने पुन्हा देवाची घसरलेली गाडी रुळावर आणली. परंतु मध्यंतरानंतरचा कंटाळवाणा प्रवास आणखी रंजक कसा करता येईल, याकडे दिग्दर्शकाने लक्ष दिलं पाहिजे होतं.
अभिनय : शाहिद कपूरने साकारलेलं देव आंब्रे हे पात्र आणि सिनेमाचं कथानक आपल्या मनाला भिडल्याशिवाय राहत नाही. शाहिदची आजवरची सर्वात वेगळी आणि भन्नाट भूमिका आहे. स्मृतीभ्रंश झाल्यावर देव आंब्रेचं बदललेलं व्यक्तिमत्व शाहिदने उत्कृष्टपणे दाखवलंय. पूजा हेगडेनेही तिला मिळालेल्या स्क्रीन स्पेसमध्ये शाहिदला सुरेख साथ दिली आहे. पूजा सिनेमात एका महिला पत्रकाराच्या भूमिकेत पाहायला मिळतेय. याशिवाय मराठमोळा अभिनेता उपेंद्र लिमये छोट्याश्या भूमिकेत लक्षात राहतो. पावेल गुलाटी, प्रवेश राणा आणि कुब्रा सैत यांनी देखील आपल्या अभिनयाने भूमिकांना चार चाँद लावले आहेत. प्रत्येक कलाकाराने 'देवा'साठी विशेष मेहनत घेतल्याचं दिसतंय.
सकारात्मक बाजू : विषय, पटकथा, संवाद, दिग्दर्शन, अॅक्शन, अभिनय, सिनेमॅटोग्राफी.
नकारात्मक बाजू : चित्रपटाची लांबी,काही आक्षेपार्ह दृश्ये.
थोडक्यात काय तर मनोरंजनाच्या दृष्टीने हा अॅक्शनपट पाहण्याजोगा आहे.त्यामुळे जर तुम्ही शाहिद कपूरचे चाहते असाल तर 'देवा' सिनेमागृहात जाऊन एकदा नक्की पाहू शकता.