Dharmveer 2 Review : 'नाथा'घरच्या 'आनंदा'ची गोष्ट! प्रसाद ओकचा 'धर्मवीर २' कसा आहे? वाचा रिव्ह्यू
By संजय घावरे | Published: September 27, 2024 04:53 PM2024-09-27T16:53:09+5:302024-09-27T16:54:09+5:30
दिघे-शिंदे माहित नसलेल्या रसिकांना चित्रपट म्हणून 'धर्मवीर २' आवडू शकतो.
साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट सांगताना दिग्दर्शक प्रवीण तरडेने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्याचा आढावाही सादर केला आहे. 'धर्मवीर'मध्ये १०० टक्के आनंद दिघे होते, पण या भागात ४० टक्के दिघे आणि ६० टक्के शिंदे आहेत. दिघे-शिंदे माहित नसलेल्या रसिकांना चित्रपट म्हणून 'धर्मवीर २' आवडू शकतो.
कथानक : कोरोना काळात जमावाने पालघरमध्ये भगवी वस्त्रे धारण केलेल्या दोन साधूंच्या हत्येपासून चित्रपटाची सुरुवात होते. तत्कालीन नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे या घटनेने अस्वस्थ होतात. अशातच त्यांना आनंद दिघे यांचा साक्षात्कार होतो. दिघे शिंदेंना भगव्याचे महत्त्व पटवून देतात. त्यानंतर एका मागोमाग एक घटना घडतात आणि काँग्रेससोबतच्या आघाडीत शिवसेनेच्या नेत्यांची होणारी घुसमट समोर येते. त्यातून तयार झालेली बंडाची पार्श्वभूमी चित्रपटात पाहायला मिळते.
लेखन-दिग्दर्शन : पटकथा लिहिताना दिग्दर्शक प्रवीण तरडेने दिघेंच्या आयुष्यात घडलेल्या घटना आणि शिंदे यांनी केलेल्या कार्याची सांगड घातली आहे. 'धर्मवीर'च्या तुलनेत यातील संवाद कमी प्रभावी वाटतात. पालघरमधील साधूंवरील हल्ला आणि पूर्वी दिघेंचे साधूंना लाभलेले अभयदान, ऐन दिवाळीपूर्वी केलेल्या साखर साठेबाजीविरुद्ध दिघेंची कारवाई आणि कोरोनामध्ये आॅक्सिजनसाठी शिंदेंनी केलेली मदत, दिघेंनी सुरू केलेल्या सराव परीक्षांचा होणारा फायदा, बहिणींच्या रक्षणासाठी उचललेला हात, रुग्णालयात वावरणाऱ्या शिंदेमध्ये रुग्णांना दिसलेले 'आनंद'रूप, पक्षातील घुसमट आणि 'हू इज एकनाथ शिंदे?' असा विचारला गेलेल्या प्रश्नामुळे घडलेल्या रामायणाची पार्श्वभूमी यात आहे. शिवसेनेमध्ये बंडाची ठिणगी का पडली? याची उत्तरे देण्याचा हा प्रयत्न आहे. दिघेंचा काळ दाखवताना कला दिग्दर्शनात काळजी घेण्याची गरज होती. गीत-संगीत फारसे प्रभावी नाही.
अभिनय : प्रसाद ओकने पुन्हा एकदा आनंद दिघेंच्या भूमिकेत जीव ओतला आहे, पण काही दृश्यांमध्ये मेकअपमध्ये फरक जाणवतो. या चित्रपटात क्षितीश दातेची भूमिका मोठी असून, त्याने एकनाथ शिंदेंच्या व्यक्तिरेखेला योग्य न्याय दिला आहे. भरत गोगावलेंच्या भूमिकेत सुनील तावडेने अप्रतिम काम केले आहे. शहाजी बापूंच्या भूमिकेत आनंद इंगळेही शोभून दिसतो. अभिजीत खांडकेकरने साकारलेले दादा भुसेही छान झाले आहेत. पत्रकाराच्या भूमिकेतील मंगेश देसाई काहीतरी गूढ उकलेल असे वाटते, पण काही घडत नाही. इतर कलाकारांनी चांगली साथ दिली आहे.
सकारात्मक बाजू : पटकथा, दिग्दर्शन, अभिनय, वातावरण निर्मिती, संवाद, अॅक्शन, सिनेमॅटोग्राफी, प्रकाश योजना
नकारात्मक बाजू : गीत-संगीत, कला दिग्दर्शन, मेकअप
थोडक्यात काय तर हा चित्रपट दिघेंची पुण्याई पाठीशी असलेल्या शिंदेची इमेज ग्लोरिफाय करणारा असून, महाराष्ट्रात जे घडले ते का घडले हे सांगणारा असल्याने एकदा पाहायला हवा.