Dil Junglee Movie Review : हलका-फुलका मनोरंजक चित्रपट!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2018 10:43 AM2018-03-09T10:43:37+5:302023-08-08T19:16:16+5:30
चित्रपटाच्या कथेचे वास्तवाशी काहीही देणेघेणे नाही पण तापसी आणि साकिब यांचा निष्पापपणा आणि विनोद खिळवून ठेवतो.
इतर कुठल्याही शैलीतील चित्रपटांपेक्षा रोमान्स कॉमेडी शैलीचा चित्रपट पाहणे आणि गळी उतरवणे सहज सोपे असते. याचे कारण म्हणजे, हिंदी चित्रपटांच्या प्रेम कथेचा शेवट नेहमी गोडचं होतो. त्यातच सोबत कॉमेडी असेल तर चित्रपटातील कुठलीही अवास्तव किंवा अतार्किक गोष्ट सहजपणे दुर्लक्षित करता येते. ‘दिल जंगली’ या चित्रपटाची कथाही याच वळणाची आहे.
सुमीत (साकिब सलीम) हा बॉलिवूडमध्ये स्टार बनण्याचे स्वप्न बघणारा एक जिम इन्स्ट्रक्टर असतो. कोरोली (तापसी पन्नू) ही एका मोठ्या घराण्यातील मुलगी असते. दिल्लीच्या एका कॉलेजात ती प्रोफेसर असते. बॉलिवूडमध्ये संधी मिळण्यासाठी धडपडणारा सुमीत कोरोलीच्या इंग्लिश क्लासमध्ये प्रवेश घेतो. कालांतराने त्यांची मैत्री होते आणि नंतर प्रेम. काही क्षुल्लक आणि खºया आयुष्यात मूर्खपणा वाटेल अशा कारणाने आई-वडिलांचा या प्रेमाला विरोध असतो. या विरोधामुळे सुमीत व कोरोली मित्रमंडळींसोबत घरून पळून जातात. पण वाटेत त्यांच्या गाडीला अपघात होतो आणि ही ट्रीप फ्लॉप होते. यामुळे वैतागलेला सुमीत कोरोलीचा अपमान करतो आणि इथेच दोघांचा ब्रेकअप होतो. मध्यांतरानंतर सुमीत व कोरोली पुन्हा भेटतात. पण यादरम्यान कोरोली एक यशस्वी बिझनेसवूमन झालेली असते आणि सुमीत हा एक नावाजलेला टेलिव्हीजन स्टार बनलेला असतो. सात वर्षांनंतर लंडनमध्ये भेटलेल्या सुमीत व कोरोली यांच्या नात्यात पुढे काय होते, हे पाहायला तुम्हाला चित्रपटचं बघावा लागेल.
बहुतांश रोमॅन्टिक कॉमेडीप्रमाणे ‘दिल जंगली’ हाही अगदी हलका-फुलका आणि मनोरंजक चित्रपट आहे. पण खरे श्रेय या चित्रपटाची पटकथा आणि कलाकारांना दिले पाहिजे. अभिलाष थापलियाल म्हणजेच सुमीतचा मित्र प्रशांत आणि सृष्टी श्रीवास्तव म्हणजे कोरोलीची मैत्रीण शुमी यांच्या अभिनयाने या चित्रपटाला आणखी खुशखुशीत केले आहे. तापसी आणि साकिब हे दोघे तर या चित्रपटाचा आत्मा आहेत. या दोघांच्या अभिनयाची प्रशंसा केलीच पाहिजे. दोघांनीही आपआपल्या भूमिकांना पूर्ण न्याय दिला आहे.
चित्रपटाच्या कथेचे वास्तवाशी काहीही देणेघेणे नाही पण तापसी आणि साकिब यांचा निष्पापपणा आणि विनोद खिळवून ठेवतो. शेवटचे २० मिनिटं चित्रपट काहीसे कंटाळवाणे वाटतात. पण तरिही हा चित्रपट मनोरंजन करतो.