Dokyala shot movie review : निव्वळ टाईमपास असलेला 'डोक्याला शॉट'
By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2019 12:20 PM2019-02-28T12:20:18+5:302023-08-08T20:09:54+5:30
अभिजीत,चंदू, भज्जी आणि गणेश हे चार जिवलग मित्र. अभिजीतचं सुब्बुलक्ष्मी या दाक्षिणात्य मुलीवर प्रेम असतं. तिच्या वडिलांचा कसाबसा होकार मिळवून आता या दोघांचं लग्न होणार असतं.
अजय परचुरे
सध्या तरूणाईच्या भाषेत अनेकदा आपल्याला ऐकायला मिळतं की काय डोक्याला शॉट आहे रे हा .. पण हाच डोक्याला शॉट सिनेमाचा पूर्ण विषय असेल तर काय काय करामती होऊ शकतात हे समजतं डोक्याला शॉट सिनेमा पाहून. सिनेमाची कथा यथातथाच आहे, तुम्ही सिनेमाच्या नावाप्रमाणे फार डोकयाला शॉट लावायला गेलात तर फार काही बौध्दिक मिळणार नाही. मात्र तरीही हा सिनेमा आपल्याला पुरेपूर हसवतो. दिग्दर्शक शिवकुमार पार्थसारथी ह्यांचा प्रयत्न जरी बरा असला तरी त्यांनी थोडा तर्कपूर्ण डोक्याला शॉट दिला असता तर सिनेमा अजून बरा झाला असता. मात्र तरीही हा सिनेमा यातील फ्रेश कलाकारांच्या अभियनाने आपल्याला हसवतो.
अभिजीत,चंदू, भज्जी आणि गणेश हे चार जिवलग मित्र. अभिजीतचं सुब्बुलक्ष्मी या दाक्षिणात्य मुलीवर प्रेम असतं. तिच्या वडिलांचा कसाबसा होकार मिळवून आता या दोघांचं लग्न होणार असतं. लग्न दोन दिवसांवर आलं असताना हे चार मित्र क्रिकेट खेळायला जातात आणि भज्जीने मारलेला शॉट झेलण्यासाठी अभिजीत धावतो आणि झेल टिपता टिपता त्याचं डोकं एका दगडावर आपटतं आणि त्याला स्मृतीभ्रंश होतो. स्मृतीभ्रंश झाल्याने अभिजीत आपलं सुब्बुवर प्रेम आहे तिच्याशी आपलं दोन दिवसांनी लग्न आहे हे पण विसरतो. या परिस्थीत काय करायचं हा मोठा प्रश्न अभिजीतच्या मित्रांसमोर आ वासून उभा राहतो. स्मृती हरवलेला अभिजीत बरा होतो का ? सुब्बु आणि अभिजीतचं लग्न खरंच होतं का ? आणि हे सगळं व्यवस्थित पार पडण्यासाठी अभिजीतचे मित्र काय आयडियाची कल्पना लढवतात हे पाहण्यासाठी तुम्हांला सिनेमा थिएटरमध्ये जाऊन पाहावा लागेल. निखळ विनोदी सिनेमा असं या सिनेमाचं वर्णन करता येईल. पण तुम्ही तर्कावर याल तर सिनेमाच्या भाषेत म्हणायचं झालं तर थिएटरमध्ये जाताना डोकं बाजूलाच ठेवावं लागेल. मात्र एक धम्माल टाईमपास विनोदी सिनेमा म्हणून एकदा पाहायला काहीच डोक्याला शॉट नाहीये.
या सिनेमाला जर कोणी तारलं असेल तर यातील कलाकारांनी. सुव्रत जोशी (अभिजीत) ,गणेश पंडित (गणेश) , रोहित हळदीकर(भज्जी) आणि ओंकार गोवर्धन (चंदू) या चौघांचा धमाल अभिनय ही या सिनेमाची पक्की बाजू आहे. प्राजक्ता माळी (सुब्बुलक्ष्मी) हिनेही दाक्षिणात्य मुलगी चांगली रंगवलीय पण तिच्या वाट्याला मुळातच फार काम नाहीये. बाकी छोट्याश्या प्रसंगात डॉक्टर झालेला समीर चौघुलेही मजा आणतो. मुरांबाफेम वरूण नार्वेकर आणि दिग्दर्शक शिवकुमार पार्थसारथी यांनी लिहिलेले चुरचुरीत संवाद सिनेमात मजा आणतात . मात्र तरीही हा सिनेमा टाईमपासच ठरतो. शिवकुमार पार्थसारथी यांचा प्रयत्न जरी चांगला असला तरी या सिनेमाला ते अजून चांगली ट्रीटमेंट देऊ शकले असते. सिनेमाचा फर्स्ट हाफ अतिशय मनोरंजक झाला आहे. मात्र दुसऱ्या हाफमध्ये काही सीन ताणल्यासारखे झाले आहेत. मात्र तरीही यातील कलाकारांनी सिनेमाला कुठेही कंटाळवाणं केलं नाहीये त्यामुळे एक टेन्शन फ्री टाईमपास असा हा डोक्याला शॉट पाहायला काहीच हरकत नाही