Dream Girl Movie Review : अफलातून कॉमेडी आणि अभिनयाचा तडका म्हणजे 'ड्रिम गर्ल'
By गीतांजली | Published: September 13, 2019 02:42 PM2019-09-13T14:42:02+5:302023-08-08T20:09:54+5:30
आयुषमानच्या करिअरचा ग्राफ अधिकाधिक उंचावतच आहे. प्रत्येक भूमिकेत तो आपल्यासमोर नवं सरप्राईज पॅकेज घेऊन येत असतो.
गीतांजली आंब्रे
आयुषमान खुराणाच्या करिअरचा ग्राफ अधिकाधिक उंचावतच आहे. प्रत्येक भूमिकेत तो आपल्यासमोर नवं सरप्राईज पॅकेज घेऊन येत असतो. त्याचप्रमाणे त्याच्या ड्रिम गर्ल सिनेमाची घोषणा झाल्यानंतर या सिनेमाची उत्सुकता सगळ्यांनाच लागली होती. सिनेमाचा ट्रेलर आऊट झाल्यावर आयुषमान यात मुलीची भूमिका साकारणार हे तेव्हाच कळले होते. तेव्हापासून यात आयुषमान काही नवी जादू करणार हे पाहणं औत्सुकतेचे ठरणार होते.
मथुरा शहरात राहणारा करम(आयुषमान खुराणा) रामलीलामध्ये सीतेची भूमिका साकारत असतो. मात्र ही गोष्ट करमचे वडील दिलजीत (अनु कपूर) यांना आवडत नसते. दिलजीत यांचं एक छोटसे दुकान असते. एक दिवस अचानक करमला मुलींच्या कॉल सेंटरमध्ये नोकरी लागते आणि कथा 90 अंश सेलिअल्सने फिरते. नोकरीत अट फक्त एवढीच असते की करमने पूजा बनून लोकांशी फोनवर संवाद साधायचा. ही गोष्ट फक्त करमचा खास मित्र स्माईलीला (मनजोत सिंग) माहित असते. याच दरम्यान करमच्या आयुष्यात त्याचं प्रेम येतं माही (नुसरत भरुचा)च्या रुपाने. करमच्या आवाजाची जादू पोलीस राजपाल (विजय राज), माहीचा भाऊ महेंद्र(अभिषेक बनर्जी), किशोर टोटो( राज भंसाली), रोमा (निधी बिष्ट) एवढेच नाही तर करमचे वडील जगजीत सिंग सुद्धा यांच्यावर चालते. हे सगळेच पूजाच्या प्रेमात वेडेपीसे होतात. या सगळ्यांना पूजाशीच लग्न करायचे असते आणि इथचं सगळी गडबड होते.
लेखक राज शांडिल्य यांचा हा दिग्दर्शक म्हणून पहिला कॉमेडी सिनेमा यशस्वी झाला आहे. पूर्वाधात सिनेमाची कथा फारशी काही पुढे सरकत नाही. मात्र उत्तरार्ध सिनेमा पुन्हा आपली पकडं घेतो. आयुषमान आणि नुशरतचा लव्ह ट्रॅक डेव्हलप करण्यासाठी खूप घाई करण्यात आली आहे. अभिनयाबाबत बोलायचे झाले तर आयुषमानने पुन्हा एकदा करमच्या भूमिकेत आपली छाप सोडली आहे. शुभ मंगल सावधान, बरेली की बर्फी, बधाई हो, अंधाधुन, आर्टिकल 15 आणि आता ड्रिम गर्ल हे सिनेमा पाहता आयुषमान स्क्रिप्ट बघूनच सिनेमा निवडतो हे स्पष्ट होते. त्याच्या सिनेमाची कथाच हिरो असते आणि त्याला तो त्याच्या अभिनयाने चारचांद लावतो. पूजाचे कॅरेक्टर आयुषमानने अप्रतिमरित्या तिच्या बोलण्यातून आणि बॉडी लँग्वेजमधून मांडलं आहे जे तुम्हाला हसून हसून वेड लावते. नुसरतच्या भूमिकेला सिनेमात जास्त स्कोप नसला तरी तिच्या वाटेला आलेली भूमिका तिने यशस्वीरित्या साकारली आहे. आयुषमान आणि नुसरतची केमिस्ट्रीही छान जमली आहे. अन्नू कपूर यांनी साकारलेल्या जगजीत सिंगच्या भूमिकेलाही तोड नाही. पूजाच्या प्रेमात पडलेल्या अन्नू कपूर यांचं कॉमेडी टायमिंग तर अफालातून आहे. तर मनजोत सिंग आणि विजय राजसुद्धा प्रेक्षकांना हसवण्यात मागे नाहीत. अभिषेक बॅनर्जी, निधी बिष्ट, राज भंन्साळी यांनी देखील आपल्या भूमिका यशस्वीरित्या साकारल्या आहे. मीत ब्रदर्सचे 'राधे राधे' हे गाणं रिलीजच्या आधीच प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले आहे. गाण्याची कोरियोग्राफीसुद्धा पाहण्यासारखी आहे. एकूणच काय जर मनोरंजनाचा कम्प्लीट पॅकेज आहे ड्रिम गर्ल. त्यामुळे तुम्ही थिएटरमध्ये जाऊन नक्कीच हा सिनेमा पाहू शकता.