नव दाम्पत्यांसाठी बालसंगोपनाचा 'मूल'मंत्र, कसा आहे निपुण-वैदेहीचा 'एक दोन तीन चार' सिनेमा? वाचा Review
By संजय घावरे | Published: July 19, 2024 04:09 PM2024-07-19T16:09:46+5:302024-07-19T16:15:56+5:30
निपुण धर्माधिकारी-वैदेही परशुरामी यांचा 'एक दोन तीन चार' सिनेमा कसा आहे? वाचा review
'मुरांबा'सारखा वेगळ्या धाटणीचा चित्रपट बनवणाऱ्या दिग्दर्शक वरुण नार्वेकरने यावेळी एका जोडप्याची आणि त्यांना होणाऱ्या मुलांची कथा सादर केली आहे. गोष्ट तशी वेगळी असून, नवदाम्पत्यांना हसत-खेळत बालसंगोपनाचा 'मूल'मंत्र देण्याचा हा प्रयत्न असल्यासारखं वाटतं.
कथानक : समीर आणि सायली यांची ही गोष्ट आहे. कॅालेजमध्ये अगोदर मैत्री, मग प्रेम आणि नंतर प्रेमाचं रूपांतर लग्नात होतं. लग्नानंतर लगेचच सायली गरोदर होते. प्रेग्नन्सी टेस्ट केल्यावर समीरलाही याची खात्री पटते. दोघेही डॅाक्टरांकडे जातात आणि सोनोग्राफी केल्यावर जे समजतं ते आश्चर्यचकीत करणारं असतं. सायलीच्या पोटात एक नव्हे, दोन नव्हे, तीन नव्हे, तर चक्क चार गर्भ वाढत असतात. हे समजल्यावर दोघं कशा प्रकारे याचा सामना करतात ते चित्रपटात पाहायला मिळतं.
लेखन-दिग्दर्शन : चित्रपटाची वनलाईन सुरेख आहे. सुरुवातीला दिलेले काही धक्केही सुखद आहेत, पण संथ गतीचा फटका या सिनेमाला बसला आहे. सायली गरोदर झाल्यानंतर पुढल्या गोष्टी वेगात घडत नाहीत. काही सीन्समध्ये उगाच टाइमपास झाल्यासारखा वाटतो. गाण्यांमध्ये ज्या प्रकारे सुरेख संकलन करण्यात आलं, तसं इतर दृश्यांमध्येही अपेक्षित होतं. मिस मॅच जोडी जुळवण्यामागील लॅाजिक समजलं नाही. ऋषिकेश जोशी वडीलांच्या भूमिकेत शोभत नाही. 'गुगली...' गाणं चांगलं झालं आहे. आई-मुलीच्या विचारांची सांगडही चांगल्याप्रकारे घातली गेली आहे.
अभिनय :वैदेही परशुरामीने साकारलेल्या सायलीमध्ये वेगवेगळे रंग पाहायला मिळतात. वेगवेगळ्या छटा असलेलं हे कॅरेक्टर तिने सुरेख साकारलं आहे. निपुणने तिला चांगली साथ दिली असली तरी दोघांची केमिस्ट्री कुठेही जाणवत नाही. निपुणच्या संवादफेकीच्या वेगळ्या शैलीमुळे बऱ्याचदा हसू येतं. मृणाल कुलकर्णींचं कॅरेक्टर छोटं असलं तरी खूप महत्त्वाचं आहे. करण सोनावणेने रंगवलेला मित्रही छान झालाय. वडीलांच्या भूमिकेत ऋषिकेशकडून नेहमीपेक्षा वेगळ्या अभिनयशैलीची अपेक्षा होती. शैला काणेकर आणि सतिश आळेकरांनी आपल्या व्यक्तिरेखा नेटकेपणाने साकारल्या आहेत.
सकारात्मक बाजू : संवाद, अभिनय, दिग्दर्शन, गीत-संगीत, सिनेमॅटोग्राफी
नकारात्मक बाजू : पटकथा, कलाकारांची निवड, संथ गती, संकलन
थोडक्यात काय तर नवदाम्पत्याच्या मनातील मुलांबाबतचं कुतूहल आणि मुलांना सांभाळण्याची मानिसकता जाणून घेण्यासाठी पाहायला हरकत नाही.