एक सांगायचंय....UNSAID HARMONY Movie : एक सांगायचंय मला नव्हे तर किती सांगायचंय मला...
By प्राजक्ता चिटणीस | Published: November 15, 2018 06:00 PM2018-11-15T18:00:52+5:302023-08-08T20:35:32+5:30
एक सांगायचंय....UNSAID HARMONY Movie या चित्रपटात के के मेनन, राजेश्वरी सचदेव, अभिजीत आमकर, शाल्व किंजवडेकर, विभव राजाध्यक्ष, हर्षिता सोहल यांच्या मुख्य भूमिका आहेत.
मुलांना त्यांच्या आवडीप्रमाणे करियरची निवड करू द्या... कोणत्याही प्रकारचे दडपण त्यांच्यावर टाकू नका, पालक-मुले यांच्यात संवाद असणे गरजेचे आहे असे संदेश देणारे अनेक चित्रपट आजवर बॉलिवूडमध्ये आपण पाहिले आहेत. अशाच धर्तीवर असलेला एक सांगायचंय....UNSAID HARMONY हा चित्रपट आहे. पालक-मुले हे सध्या आपापल्या आयुष्यात व्यग्र असल्याने त्यांच्यात दुरावा निर्माण होत आहे. अनेक मुले नैराश्यात जाऊन आत्महत्या करत आहेत. हा ज्वलंत विषय या चित्रपटाद्वारे पुन्हा एकदा मांडण्यात आलेला आहे.
कबीर (अभिजीत आमकर), धुव्र (शाल्व किंजवडेकर), अंगद (विभव राजाध्यक्ष) आणि अनाहिता (हर्षिता सोहल) हे एकमेकांचे खूप चांगले फ्रेंड्स असतात. या दोघांच्या आयुष्यात अनेक गोष्टींमध्ये साम्य असते. हे चौघेही आपल्या पालकांपासून दूरावलेले असतात. त्यांच्यासोबत त्यांचा संवाद हरपलेला असल्याने हे चौघेच एकमेकांचे जग असतात. दंगा-मस्ती करणे, पार्ट्या करणे हे त्यांचे नित्याचे असते. पण एकदा एका रेव्ह पार्टीत पोलिस त्यांना पकडतात. अभिजीतचे वडील मल्हार रावराणे (के के मेनन) हेच पोलिस ऑफिसर असतात. आपल्या मुलाचे हे कृत्य कळल्यानंतर ते त्याच्यावर अनेक बंधनं टाकतात, त्यातून कबीर आणि त्याच्या वडिलांमधील दुरावा अधिक वाढतो. या सगळ्यातून त्यांच्या नात्याचे काय होते? कबीर या परिस्थितीवर मात करतो की हार पत्करतो? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला एक सांगायचंय...UNSAID HARMONY हा चित्रपट पाहिल्यावरच मिळतील.
एक सांगायचंय....UNSAID HARMONY या चित्रपटाच्या कथेत नावीण्य नसल्याने पुढे काय होणार याची कल्पना तुम्हाला चित्रपट पाहाताना येते. त्यामुळे पुढे काय याची उत्सुकता लागून राहात नाही. तसेच चित्रपट खूपच संथ असल्याने तो काही वेळा कंटाळवाणी वाटतो. चित्रपटात सतत लेक्चरबाजी असल्याने काही काळाने याचा उगब येतो. खरे तर चित्रपटाचा विषय हा खूपच लहान असल्याने तो कमी वेळात आटपता आला असता. मध्यांतरानंतर तर चित्रपट उगाचच ताणल्यासारखा वाटतो. पण चित्रपटाला खऱ्या अर्थाने तारले आहे ते कलाकारांच्या अभिनयाने. के के मेनन, राजेश्वरी सचदेव, अभिजीत आमकर, शाल्व किंजवडेकर, विभव राजाध्यक्ष, हर्षिता सोहल यांनी त्यांच्या भूमिका खूपच चांगल्याप्रकारे पार पाडल्या आहेत. आपल्या मुलाच्या आवडीनिवडी, त्याच्या करियरच्या पसंतीविषयी मुलाच्या मित्रांकडून कळल्यानंतर मल्हार रावराणेची झालेली अवस्था के के मेननने त्याच्या अभिनयातून खूपच चांगल्या प्रकारे मांडली आहे. आपल्या पत्नीसमोर या सगळ्या गोष्टी मांडताना के के ने केलेला अभिनय लाजवाब. चित्रपटातील गाणी देखील चांगली आहेत. प्रसंगनारूप ती ऐकायला चांगली वाटतात. लोकेशचा दिग्दर्शक म्हणून हा पहिला चित्रपट आहे. त्याने एक खूप चांगला प्रयत्न केला आहे असे म्हटले तर ते चुकीचे ठरणार नाही. कारण चित्रपटातील काही दृश्य खरंच खूपच चांगल्याप्रकारे जमून आली आहेत. पण काही दृश्यात उणिवा जाणवतात. मुलाच्या मृत्युनंतर वडिलांची झालेली अवस्था दाखवण्याच्या नादात त्या दृश्यात त्याची आई, बहीण या महत्त्वाच्या पात्रांचा दिग्दर्शकाने समावेशच केलेला नाहीये ही गोष्ट नक्कीच खटकते. चित्रपटात काही उणिवा असल्या तरी हा चित्रपट एक खूप चांगला संदेश पालकांना आणि मुलांना देऊन जातो.