fatteshikast movie review: शिवरायांचा तडाखेबंद पहिला सर्जिकल स्ट्राईक
By अजय परचुरे | Published: November 15, 2019 02:26 PM2019-11-15T14:26:42+5:302023-08-08T19:47:32+5:30
फर्जंद सिनेमाच्या यशानंतर फत्तेशिकस्त हा सिनेमा शिवरायांची महती सांगणारा एक अप्रतिम अनुभव आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांचं नुसतं नाव जरी घेतलं तरी प्रत्येकाला मग तो कोणत्या का वयाचा असोे एक स्फुरण चढतं. शिवाजी महाराजांनी स्वराज्यासाठी केलेली व्यूहरचना, त्यांची मुत्सद्देगिरी, अफाट शौर्य, त्यांच्या मर्द मराठा मावळ्यांनी त्वेषाने लढून स्वराज्यासाठी वाहिलेलं रक्त ह्या सर्व शौर्यकथा प्रत्येकाच्या तोंडावर तोंडपाठ असतात. शिवाजी महाराजांनी स्वराज्याचं तोरण बांधत असताना त्यांनी जगासमोर आणलेली गनिमी काव्याची पध्दत अख्ख्या जगासमोर एक आदर्श युध्दनितीचं मूर्तिमंत उदाहरण आहे. या गनिमी काव्याच्या जोरावर महाराजांनी अनेक कठीण लढाया अतिशय लिलया जिंकून दाखवल्या आहेत. त्यात त्यांची सर्वात गाजलेली गनिमी काव्याची पध्दत म्हणजे पुण्यातील शायिस्तेखानाच्या लाल महालात घुसुन खानाला नेस्तेनाबूत करणे हा इतिहासात गौरवण्यात आलेला गनिमा काव्याचा उत्तम नमुना होता. यावरच आधारित फत्तेशिकस्त हा सिनेमा दिग्पाल लांजेकरने रसिकांसमोर आणला आहे आणि बऱ्याच अंशी तो यशस्वी ठरला आहे.
दिग्पालचा फर्जंद हा सिनेमा गेल्यावर्षी प्रदर्शित झाला होता. शिवरायांच्या आणि त्यांच्या शूर मावळ्यांची एक कथा त्यात मांडण्यात आली होती. फत्तेशिकस्त हा फर्जंदचा पुढचा भाग आहे असं म्हणायाला हरकत नाही. स्वराज्याचं तोरण बांधत असताना महाराजांना (चिन्मय मांडलेकर) अनेक अडचणींना त्या काळात सामोरं जावं लागत होतं. महाराज पन्हाळगडावर आणि जिजाऊ (मृणाल कुलकर्णी) आणि इतर कुटुंबिय राजगढावर असताना पुणे आणि आसपासच्या परिसरात शायिस्तेखानाने धुडगुस घातला होता. आसपासच्या गावातील गरीब शेतकरी,रयतेतील नागरिकांची घरे जाळणे, त्यांना त्रास देणे असे प्रकार शायिस्तेखानाने सुरू केले होते. राजगढावर कब्जा प्राप्त करून शिवाजी महाराजांचे स्थान कमी करण्याचे कूट कारस्थान शायिस्तेखान आखत होता. त्याच्या या आव्हानाला उत्तर देण्यासाठी वेगळी योजना करण्याची गरज होती. कारण खानाचं सैन्य अफाट होतं. मात्र चतुर महाराजांनी आपल्या गनिमी काव्याच्या जोरावर थेट शत्रूच्या गोटात घुसून खानाला नामोहरम करण्याचा पराक्रम केला याची आख्यायिका म्हणजे फत्तेशिकस्त .फर्जंद सिनेमा उत्तम चालल्याने फत्तेशिकस्त हा त्याच्या पुढच्या भागाची खूप उत्सुकता होती. शिवकालीन काळ उभारणे, त्याचा योग्य तो अभ्यास करून त्यावर इतिहासतज्ञांची योग्य ती मतं आणि विचार घेऊन ते उभे करणे जोखमीचे असते. मात्र दिग्दर्शक दिग्पाल लांजेकरने फर्जंदप्रमाणे फत्तेशिकस्तमध्येही त्या घटना, उत्तम पात्रनिवड, उभा केलेला काळ, प्रत्येक व्यक्तिरेखेचा केलेला बारकाईने विचार हा या सिनेमातूनही दिसून येतो. फत्तेशिकस्तमध्ये खऱ्या किल्ल्यांवर जाऊन केलेल्या चित्रिकरणामुळेही खूप फरक पडला आहे. फक्त मावळे ,शिवाजी महाराज यांचाच नाही तर मुघलांचं राहणीमान, त्यांच्या व्यक्तिरेखा, त्यांचं बोलणं,वागणं याचाही या सिनेमात अतिशय उत्तम अभ्यास करण्यात आला आहे. यासाठी दिग्पाल लांजेकरला पैकीच्या पैकी गुण आहेत.
कलाकारांची अख्खीच्या अख्खी फौजच या सिनेमात आहे. चिन्मय मांडलेकर आणि मृणाल कुलकर्णी यांनी फर्जंदप्रमाणेच फत्तेशिकस्तमध्येही महाराजांच्या आणि जिजाऊंच्या भूमिकेत अप्रतिम कामं केली आहेत. हरिश दुधाडे (बर्हिजी नाईक) , अजय पूरकर ( तानाजी मालुसरे), अंकित मोहन (येसाजी कंक),विक्रम गायकवाड (चिमणाजी देशपांडे), मृण्मयी देशपांडे(केशर) ,आस्ताद काळे (कारतलब खान) ,रमेश परदेशी(अमरसिंग),तृप्ती तोरडमल (रायबाघन) यांनीही आपआपल्या भूमिका चोख रंगवल्या आहेत. शाहिस्तेखानाच्या भूमिकेतील अनुप सोनी आणि नामदार खानाच्या भूमिकेतील समीर धर्माधिकारी हे विशेष लक्षात राहतात.
शिवरायांच्या आणि त्यांच्या शूर मावळ्यांच्या ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार होण्यासाठी फत्तेशिकस्त हा सिनेमा एकदा तरी पाहायला हरकत नाही.