FILM REVIEW: बघतोस काय मुजरा कर - वर्तमान स्थितीवर महत्त्वाचे भाष्य…!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2017 03:46 PM2017-01-07T15:46:47+5:302023-08-08T19:16:16+5:30
सिनेमाचे काही शूट लंडनमध्येही करण्यात आले आहे.
समाजात अनेक प्रश्न असतात आणि त्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्नही केला जातो. मात्र काही प्रश्न सोडवताना दिशा चुकते किंवा जाणूनबुजून स्वार्थापोटी ती बदलली जाते. गडदुर्गांच्या संवर्धनाचा विषयही यात मोडतो. अनेकांना मात्र असा काही विषय आहे, याचे सोयरसुतकही नसते.
'बघतोस काय मुजरा कर' या चित्रपटाने हा प्रश्न धसास लावण्याचे काम केले आहे. व्यवस्थेच्या आणि समाजाच्या डोळ्यांत अंजन घालण्याचा या चित्रपटाचा थेट प्रयत्न असला, तरी त्याची मांडणी मात्र काही ठिकाणी विस्कळीत झाली आहे. पण वर्तमान स्थितीवर महत्त्वाचे भाष्य करण्याचा या चित्रपटाचा उद्देश मात्र स्तुत्य आहे.
साताऱ्यातल्या खरबुजेवाडीचे सरपंच नानासाहेब आणि त्यांचे मित्र पांडा व शिवा या तिघांची ही गोष्ट आहे. नानासाहेबांच्या अंगात छत्रपती शिवराय पूर्णतः भिनलेले आहेत. गडांचे संवर्धन, गावाचा विकास अशा योजना राबवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. हा मार्ग अधिक सुकर व्हावा म्हणून पांडा व शिवा त्यांना आमदारकीचे तिकीट मिळवून देण्याच्या मागे लागतात. मात्र याकरिता काहीतरी भरीव कामगिरी करून दाखवण्याची अपेक्षा त्या राजकीय पक्षाकडून त्यांच्या गळ्यात मारली जाते. मग त्यासाठी हे त्रिकूट एक अनोखी शक्कल लढवते. हे सर्व कार्य सुफळ संपूर्ण होण्यासाठी त्यांनी केलेली धडपड म्हणजे हा चित्रपट आहे.
इतिहासातून आपण घेतलेली शिकवण, राजकारणाची बदललेली दिशा, खोटे बुरख्यांमागचे खरे चेहरे असे काही मुद्दे हाती घेत कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन करणाऱ्या हेमंत ढोमे याने या चित्रपटातून प्रकाश टाकला आहे. छत्रपती शिवरायांच्या किल्ल्यांचे रक्षण, संवर्धन, तिथली स्वच्छता वगैरे सांभाळणे ही व्यवस्थेची जबाबदारी असली, तरी त्यात नागरिकांचाही मोठा वाटा अपेक्षित आहे. हा कळीचा मुद्दा या चित्रपटात रेटत ही कथा साकारत जाते.
हा संदेश खोलवर रुजावा यासाठी चित्रपटासारखे उत्तम माध्यम नाही, याची जाण ठेवल्याचेही स्पष्ट होते. पण हे करताना या कथेतले नायक जो मार्ग निवडतात तो भाग सहज पचनी पडत नाही. यासाठी काही वेगळी शक्कल लढवली असती, तर कथेचा गाभा अधिक घट्ट झाला असता. निव्वळ विनोदाच्या दृष्टिकोनातून पाहिले तरच तो या गोष्टीचा भाग असल्याचे पटवून घ्यावे लागते. चित्रपटातून संदेश देताना तो कंटाळवाणा होऊ नये म्हणून यात थोडीशी गंमत, थोडासा विनोद यांचे तोंडीलावणे वापरत हा विषय हलकाफुलका करण्याचा प्रयत्न केल्याचेही जाणवते.
मिलिंद जोग यांचा गडकोटांवरून फिरलेला अफलातून कॅमेरा नजरबंदी करणारा आहे. लंडन शहराचे दर्शनही सुखावह आहे. प्रशांत बिडकर यांचे कला-दिग्दर्शन जमून आले आहे. क्षितिज पटवर्धन यांची गीते आणि अमितराज यांचा संगीताचा तडका दमदार आहे. जितेंद्र जोशी याने यातला नानासाहेब हा अस्सल मऱ्हाठी मर्द सणसणीत रंगवला आहे. हटके स्टाईल वापरत अनिकेत विश्वासराव याने साकारलेला पांडा सुद्धा भाव खाऊन जातो.
शिवाच्या भूमिकेत अक्षय टंकसाळे याने नेहमीच्या पद्धतीने फूल टू बॅटिंग केली आहे. हेमंत ढोमे याने पाटलांच्या भूमिकेत योग्य ते रंग भरले आहेत. पर्ण पेठे (हिरा), नेहा जोशी (मंगल), रसिका सुनील (वैशाली), अश्विनी काळसेकर (वंदनाताई), विक्रम गोखले (बापूसाहेब), अनंत जोग (डॉ. केळकर) यांच्या चपखल भूमिका या चित्रपटात पाहायला मिळतात. मराठी पडद्यावर सध्या चित्रपटांचा एकूणच दुष्काळ पडला असताना, मनोरंजन करत काहीएक मनात उतरवू पाहणारा हा चित्रपट वेगळ्या वाटेवरचा ठरतो.