फोर्स2 :‘अॅक्शन’चा ‘ओव्हर डोज’
By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2016 05:28 PM2016-10-17T17:28:51+5:302023-08-08T19:28:38+5:30
रॉ एंजटची भूमिका साकारत असून त्यावरच सिनेमाची कथा आधारित आहे.
अभिनय देव दिग्दर्शित ‘फोर्स2’ अॅक्शनपट आज शुक्रवारी चित्रपटगृहात झळकला. जॉन अब्राहमच्या खांद्यात एक खिळा रूतून बसतो आणि त्यातून रक्त वाहू लागते, या एका दृश्याने चित्रपटाला सुरुवात होते. तासाभरानंतरही एका शर्टलेस सीनमध्ये त्याच्या या जखमेतून रक्त भळभळतांना दिसते. एवढा एक संदर्भ सोडला तर या चित्रपटाचा तथ्यांशी कुठलाही संबंध नाही. याच अंगाने ताळमेळ नसणारी ही कथा पुढे सरकरते.
‘फोर्स2’ म्हणजे एक सटकलेला पोलिस अधिकारी यशोवर्धन(जॉन अब्राहम) याची कथा. यशोवर्धन म्हणजे ‘टोटल गॉन केस’. तो काहीही करू शकतो. गाड्या उचलू शकतो, इमारतींवरून क्षणाक्षणाला उड्या मारू शकतो, गुंडांना आदळून भिंत तोडू शकतो.
दु:खी असला की यशोवर्धन जगात नसलेल्या त्याच्या मृत पत्नीशी(जेनेलिया देशमुख. या अॅक्शनपटातील एकमेव सौंदर्य) बोलत असतो. याचदरम्यान चीनमध्ये शांघाय शहरात ‘रॉ’ या भारताच्या गुप्तचर एजन्सीच्या तीन एजन्टची हत्या होते. यात यशचा अतिशय जवळचा मित्र हरिश याचाही समावेश असतो. येथून चित्रपट सुरु होतो. रूमीच्या कवितांच्या एका पुस्तकावरून यशला हरिशच्या हत्येबाबत काही धागेदोरे गवसतात. ‘रॉ’मधीलच कुण्या एका एजंटने विश्वासघात केल्याचे यशला कळते.
यश कायम मृत्यूशी लपंडाव खेळत असतो. त्यामुळे यश आधी आपणच मरणार, अशी त्याला खात्री असते. पण प्रत्यक्षात हरिश आधी जातो. त्याच्या हत्येमागे मोठा कट असल्याचे लक्षात आल्यानंतर यश रॉच्या कार्यालयात पोहोचतो. ‘रॉ’मधील कुणी एक अधिकारी देशाला फसवून चीनला गोपनीय माहिती पुरवत असल्याचा दावा तो करतो. यानंतर मुंबई पोलिसमधील इन्सपेक्टर यशोवर्धन आणि रॉ एजंट केके(सोनाक्षी सिन्हा)दोघेही रॉमधील घरभेदी अधिकाऱ्याला पकडण्याच्या मिशनवर बुडापेस्टमध्ये पोहोचतात.
बॉलिवूडपटांमध्ये नेहमी दिसते तसेच या चित्रपटातही केके आणि यश या दोघांच्या कामांची पद्धत वेगवेगळी असते. दोघांचाही परस्परांवर फारसा विश्वास नसतो. याचदरम्यान त्यांना शिव शर्मा(ताहिर राज भसीन) नामक रॉ एजंटवर संशय होतो. विशेष म्हणजे, जाळ्यात अडकण्यास उत्सूक असल्याप्रमाणे शिव शर्मा अगदी अलगद केके व यशच्या हाती लागतोही. शिवला अटक होते. पण तो पुन्हा पळून जाण्यास यशस्वी होतो आणि इथूनच चित्रपटात टिष्ट्वस्ट येतो.
चित्रपटात नॉन स्टॉप अॅक्शनची भरमार आहे. जॉनच्या ‘अशक्यप्राय’ सिक्स पॅक चवथ्यांदा दिसेपर्यंत या चित्रपटात कुठलीही कथा वा कथेमागे कुठलेही तर्कशास्त्र नसल्याचे कळुन चुकते. जॉन नेहमीच्या पठडीतील मुंबईकर पोलिस अधिकाऱ्याच्या थाटात तर सोनाक्षी टीपिकल हॉलिवूड महिला पोलिस अधिकाऱ्याप्रमाणे अॅक्शन करताना दिसते. पण कितीही अॅक्शन केली तरी केस, मेकअप आणि मस्करा अगदी जसाच्या तसा ठेवण्यात ती कुशल असते.
खरे तर अॅक्शपपलीकडे जॉन आणि सोनाची रोमॅन्टिक केमिस्ट्री चित्रपटात वेगळे रंग भरू शकली असती. पण काही दृश्य वगळता चित्रपटात रोमान्सला काहीही जागा नाही. त्यातच गाणी नसल्याने मारधाडीशिवाय यात काहीही दिसत नाही.
ताहिर यात एका ‘व्हाईट कॉलर विलेन’च्या भूमिकेत आहे. खरेदी करणारा,पाश्चात्य शास्त्रीय संगीत ऐकणारा, माऊथ आॅरर्गन वाजवणारा (अगदी ‘वन्स अ टाईम इन द वेस्ट’च्या स्टाईलमध्ये)एक वेगळा विलेन त्याने साकारला आहे. शीघ्रकोपी आणि तेवढ्याच चाणाक्ष यशला तो अगदी शेवटपर्यंत चकवतो. पटकथेवर मेहनत घेतली असतील तर ताहिरची भूमिका अधिक उठावदार दिसली असतील, हेच त्याला पाहताना सतत जाणवतं.
दिग्दर्शनाच्या पातळीवर म्हणाल तर अॅक्शन आणि थ्रीलरचा ‘ओव्हर डोज’ असेच या चित्रपटाचे वर्णन करता येईल. अॅक्शन आणि सुमार कथा या चित्रपटाचे कच्चे दुवे आहेत. अभिनय देव यांचे दिग्दर्शक कुठेही प्रभावी वाटत नाही. त्यांची सगळी मेहनत कथेपेक्षा अॅक्शन दृश्य रंगवण्यातच वाया गेल्याचे चित्रपट पाहिल्यानंतर स्पष्ट जाणवते. अॅक्शनने चित्रपट सुरु होतो आणि अॅक्शनसह साधारण क्लायमॅक्सनंतर संपतो.
एकंदर काय तर डोके रिकामे ठेवून पाहता येईल असा एक सुमार अॅक्शनपट यापलीकडे या चित्रपटात काहीही नाही. कुणी ‘फोर्स’ केला तरच ‘फोर्स 2’ पाहा.