Fukrey Returns Movie Review : बालिश विनोद अन् बालिश कथा!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2017 05:54 AM2017-12-08T05:54:55+5:302023-08-08T19:28:38+5:30
२०१३ च्या हिट सिनेमांच्या यादीत सामील झालेल्या ‘फुकरे’ या चित्रपटाचा ‘फुकरे रिटर्न्स’ हा सीक्वल आहे.
‘फुकरे रिटर्न्स’ हा चित्रपट आज शुक्रवारी रिलीज झाला. २०१३ मध्ये या चित्रपटाचा पहिला भाग ‘फुकरे’आला तेव्हा त्याची फार चर्चा नव्हती. पण लोक चित्रपटगृहांत हा सिनेमा पाहायला पोहोचले आणि लोकांनी ‘फुकरे’ला डोक्यावर घेतले. २०१३ च्या हिट सिनेमांच्या यादीत सामील झालेल्या याच चित्रपटाचा ‘फुकरे रिटर्न्स’ हा सीक्वल आहे. जुनाच दिग्दर्शक आणि जुनीच स्टारकास्टसह प्रेक्षकांना हसवण्याच्या इराद्याने आलेला हा चित्रपट कसा आहे, ते जाणून घेऊ यात...
‘फुकरे’ संपला तिथून ‘फुकरे रिटर्न्स’ची कथा सुरु होते. एका सीक्वलच्या रूपात ‘फुकरे रिटर्न्स’ हा चित्रपट पहिल्या भागाशी मिळताजुळता आहे, हे आधीच सांगितले पाहिले. पहिल्या भागात जे आहे, ते बºयाचअंशी यातही आहे. म्हणजे, तेच ते मूर्खपणाने भरलेले विनोद , तीच पात्र आणि त्याच धाटणीची पटकथा असे सगळे यात आहे. चुचा(वरूण शर्मा), हनी(पुलकीत सम्राट),जफर (अली जफर)व लाली (मनजोत सिंह)यांची गँग आणि भोली पंजाबन(रिचा च्ड्ढा) ही सगळी पात्र या चित्रपटातही मध्यवर्ती भूमिकेत आहेत. आधीसारखेच ‘जुगाडू’ फुकरे आणि त्यांच्या तशाच ‘जुगाडू’ योजना असा ‘फुकरे रिटर्न्स’चा असा याचा प्लॉट आहे. दिग्दर्शक चित्रपटाच्या सुरूवातीलाच अगदी थोडक्यात पहिल्या भागाची कहानी सांगतो. चुचा स्वप्नात जे काही बघतो, ते सगळे खरे होते. चुचाच्या स्वप्नांचा अर्थ काढून हनी एक लॉटरीचा नंबर बनवतो आणि मग पैसे जिंकतो. पण फुकरेंच्या याच जुगाडूपणामुळे भोली पंजाबचे मोठे नुकसान होते आणि तिला तुरुंगात जावे लागते, हे पहिल्या भागात तुम्ही पाहिलेले आहे. भोली पंजाबन तुरुंगात आहे आणि फुकरे आपआपले आयुष्य जगत आहेत. चुचा आजही स्वप्न बघतो आणि हनी त्यावर डाव खेळतो. अर्थात यावेळी चुचाला स्वप्नासोबत त्याला भविष्यात काय होणार, हेही दिसते. यातून त्याला एका खजिन्याचा मार्ग सापडतो. पण भोली पंजाबन तुरुंगातून सुटते आणि चित्रपटाची कथाचं नाही तर फुकºयांचे आयुष्यही बदलते.
बाबुलाल भाटिया या मंत्र्याच्या मदतीने भोली पंजाबन वेळेआधीच तुरुंगातून सुटते आणि फुकरेंच्या आयुष्यात उलथापालथ सुरु होते. भोली पंजाबनचे पैसे परत करण्यासाठी फुकरे गँग पुन्हा एकदा चुचाच्या स्वप्नाची मदत घेते. याहीवेळी त्यांना डाव सरळ पडतो. दिल्लीचे लोक फुकरे टीमच्या लॉटरीत स्वत:जवळचे असले नसले सगळे लावून मोकळे होतात. फुकरेंचा बिझनेस जोर पकडतो. पण यामुळे दिल्ली व सीमाभागात लॉटरी उद्योगाशी जुळलेल्या भाटियाचा धंदा मात्र बंद होण्याच्या मार्गावर येतो. अशात भाटिया शेवटच्याक्षणी लॉटरीचे नंबर बदलण्याची जोरदार चाल खेळतो आणि फुकरे रस्त्यावर येतात. लोकांचे कोट्यवधी रुपए परत करण्यासाठी आता भोलीसकट सगळ्याच फुकºयांना एक नवी योजना हवी असते. पुढे खजिन्याचा शोध आणि त्याअनुषंगाने घडणारे अनेक प्रसंग येतात. या प्रसंगात भोली पंजाबन, भाटिया आणि चारही फुकºयांची काय स्थिती होते, हे पाहण्यासाठी अर्थातच तुम्हाला चित्रपट पाहावा लागेल.
चित्रपटाबद्दल सांगायचे तर ‘फुकरे रिटर्न्स’चा सुरुवात चांगली आहे. पण शेवट तितकाच रटाळ आहे. कहानीत कुठलेही नवेपण नाही. काही गबाळ आणि समलिंगी विनोदांचा तडगा देऊन कथा पूर्ण करण्याचा प्रयत्न दिग्दर्शकाने केला आहे. बाकी कथेचे वास्तवाशी काहीही देणेघेणे नाही. त्यामुळेच ‘फुकरे रिटर्न्स’ची कथा आणि यातील विनोद १२ ते १५ वर्षांच्या मुलांसाठी लिहिल्यासारखे वाटतात. मोठ्यांना यातील विनोद बालिश वाटू शकतात. युवा पिढीला डोळ्यांपुढे ठेवून तयार करण्यात आलेल्या या चित्रपटाची अख्खी कथा चुचाभोवती फिरते. पंडितजीच्या भूमिकेत पंकज त्रिपाठी अतिशय कमी वेळासाठी आपल्या काहीशा कोरड्या विनोदांसह स्क्रिनवर येतो. अन्य कलाकारांचा दमदार अभिनय पाहता येईल, या अपेक्षेने तुम्ही हा चित्रपट पाहायला जाणार असाल तर कदाचित तुम्हाला तिस-या भागाची प्रतीक्षा करावी लागणार.
‘फुकरे’शी तुलना केल्यास ‘फुकरे रिटर्न्स’मध्ये काहीही नवीन नाही. ‘फुकरे’ पाहिला नसेल तर ‘फुकरे रिटर्न्स’ तुम्ही काही प्रमाणात एन्जॉय करू शकता. अन्यथा ‘फुकरे’ यापेक्षा कितीतरी चांगला होता, असेच म्हणावे लागेल.