Gaabh movie review: रेडा अन् म्हशीमुळे जुळलेली रांगडी प्रेमकथा

By संजय घावरे | Published: June 21, 2024 02:43 PM2024-06-21T14:43:57+5:302024-06-21T15:04:17+5:30

Gaabh movie review: या सिनेमातून पशूप्रेमाचा संदेश देत समाजातील विविध पैलूंना स्पर्श करण्याचा प्रयत्न केला आहे.

gaabh-marathi-movie-review-kailash-waghamare-sayali-bandkar-anup-jatratkar | Gaabh movie review: रेडा अन् म्हशीमुळे जुळलेली रांगडी प्रेमकथा

Gaabh movie review: रेडा अन् म्हशीमुळे जुळलेली रांगडी प्रेमकथा

Release Date: June 21,2024Language: मराठी
Cast: कैलास वाघमारे, सायली बांदकर, विकास पाटील, उमेश बोळके, वसुंधरा पोखरणकर, श्रद्धा पवार, चंद्रशेखर जनवाडे
Producer: सुमन नारायण गोटुरे, मंगेश नारायण गोटुरेDirector: अनुप जत्राटकर
Duration: 2 तास 05 मिनिटेGenre:
लोकमत रेटिंग्स

देश-विदेशांतील चित्रपट महोत्सवांमध्ये पुरस्काराचा मानकरी ठरलेला हा चित्रपट गावाकडच्या अस्सल मातीत रंगलेली खऱ्या प्रेमाची अजब कहाणी सांगणारा आहे. दिग्दर्शक अनुप जत्राटकर यांनी पशूप्रेमाचा संदेश देत समाजातील विविध पैलूंना स्पर्श करण्याचा प्रयत्न केला आहे. मराठीसह हिंदीमध्येही अभिनयाचा ठसा उमटवणारा कैलास वाघमारे आणि 'सवाई'ची विजेती सायली बांदकरने अप्रतिम अभिनय केला आहे.

कथानक : बी. कॉमपर्यंत शिकूनही शेती करणारा दादू आपल्या आजीच्या पेन्शनच्या पैशांतून एक म्हैस विकत घेतो. आजी म्हैशीचं नाव फुलवा ठेवते. खरं तर 'फुलवा' ही या चित्रपटाची नायिकाही आहे. तिच्याकडे राजा नावाचा रेडा आहे. म्हैशीला गाभण करण्यासाठी रेडा दाखवण्याचे काम फुलवा करत असते. त्यामुळे तिचं लग्न होत नसतं. इकडे वय होऊनही दादू लग्न करत नसतो. चित्रपट सुरू झाल्यापासून दोघांचं काही तरी नातं असून, भूतकाळात काहीतरी घडलं असल्याचं सारखे जाणवत असतं, आणि ते चित्रपटाच्या शेवटच्या भागात पाहायला मिळतं.

लेखन-दिग्दर्शन : चित्रपटाची वनलाईन चांगली आहे. पशूंवर प्रेम करण्याचा संदेश देताना स्त्रीभ्रूण हत्या आणि रेडा जन्मला म्हणून कसायाला विकणाऱ्या वृत्तीची अचूक सांगड घालण्यात आली आहे. चित्रपट सुरू झाल्यानंतर संथ गतीने कथा पुढे सरकते, पण पटकथेतील काही पैलू अखेरपर्यंत उलगडू न देता रहस्य कायम राहतं. त्यामुळे शेवटपर्यंत चित्रपट पाहण्याची उत्सुकता राहाते. मध्यंतरानंतर खऱ्या अर्थानं चित्रपट पकड घेतो आणि खिळवून ठेवतो. विनोदी प्रसंग चांगल्या प्रकारे कॅश करता आले नसले, तरी इमोशनल सीन्स हृदयाला भिडतात. वातावरण निर्मिती चांगली आहे. सिनेमॅटोग्राफी सामान्य दर्जाची आहे. दोन्ही गाणी चांगली झाली आहेत.

अभिनय : सर्वच कलाकारांनी अफलातून अभिनय केला आहे. कैलास वाघमारेचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. मुख्य भूमिकेत त्याने साकारलेल्या दादूशी काही प्रेक्षक रिलेट होतील. सायली बांदकरने बोलीभाषेचा अचूक लहेजा पकडून रंगवलेली फुलवा जितकी खमकी आहे, तितकीच प्रेमळही आहे. गुंड्याप्पाच्या भूमिकेत उमेश बोळकेने जीव ओतला आहे. विकास पाटीलने साकारलेला मित्र लक्षात राहण्याजोगा आहे. यांना वसुंधरा पोखरणकर, श्रद्धा पवार, चंद्रशेखर जनवाडे यांनीही उत्तम साथ दिली आहे.

सकारात्मक बाजू: पटकथा, अभिनय, बोलीभाषा, दिग्दर्शन, वातावरण निर्मिती, गीत-संगीत

नकारात्मक बाजू : चित्रपटाची गती, संकलन, सिनेमॅटोग्राफी, पार्श्वसंगीत

थोडक्यात काय तर ही प्रेमकहाणी इतर चित्रपटांपेक्षा खूप वेगळी आहे. काही उणिवा राहिल्या असल्या तरी कलाकारांचा अफलातून अभिनय आणि खिळवून ठेवणाऱ्या पटकथेसाठी एकदा पाहायलाच हवा.

Web Title: gaabh-marathi-movie-review-kailash-waghamare-sayali-bandkar-anup-jatratkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.