एक डाव पतंग उडवण्याचा...! कसा आहे गबरु गँग सिनेमा?
By संजय घावरे | Published: April 26, 2024 07:36 PM2024-04-26T19:36:52+5:302024-04-26T19:37:18+5:30
बॉलिवूडमध्ये रिलीज झालेला गबरु गँग सिनेमा कसा आहे? वाचा Review
आजवर खेळावर आधारलेले बरेच चित्रपट आले आहेत, पण पतंग उडवण्याच्या स्पर्धेवर बनलेला हा पहिलाच चित्रपट आहे. पॅरिसमध्ये दोन वर्षांनी पतंगबाजीचा वर्ल्डकप होतो. या स्पर्धेत २०० पेक्षा अधिक देश सहभागी होतात. दिग्दर्शक समीर खान यांचा हा चित्रपट मात्र भारतातील पतंगबाजीवर प्रकाश टाकणारा आहे. कदाचित पुढची झेप आंतरराष्ट्रीय पातळीवर असेल.
कथानक : पंजाबमधील राजबीर, अरशद आणि उदय या तीन मित्रांच्या 'गबरू गँग' ही कथा आहे. वयाच्या आठव्या वर्षीच तिघे पतंग उडवण्यात तरबेज होतात आणि गबरू गँगचा वेगळा दबदबा निर्माण होतो. दरवर्षी हाय फ्लाय कपवर गबरू गँगचंच नाव कोरलं जातं. तिघेही मोठे होतात. बालपणातील मैत्रीण गिन्नी राजबीरला पावलोपावली साथ देत असते, पण गुरलीन नावाची तरुणी येते आणि राजबीर विचलीत होतो. परिणामी हाय फ्लाय कप हॅरी पटकावतो. इथेच तीन मित्रांमध्ये ठिणगी पडते आणि त्यानंतर काय होतं ते सिनेमात आहे.
लेखन-दिग्दर्शन : पतंग उडवण्यावरील या सिनेमाची वनलाईन चांगली आहे, पण त्यावर तितकीच दमदार पटकथेची गरज होती. सुरुवात खूप छान झाली असून, क्लायमॅक्स अप्रतिम आणि खिळवून ठेवणारा आहे, पण मध्यंतराच्या भागात थोडा गोंधळ झाल्यासाखा वाटतो. हाय फ्लायकप स्पर्धेची रचना चांगली आहे. २९ संघांचा सहभाग, त्यातून आठ संघांची निवड, त्यांच्यात सेमी फायनल आणि अखेरीस दोन सघांमध्ये रंगतदार फायनल होते. प्रेम प्रकरण आणखी प्रभावीपणे यायला हवं होतं. पतंगबाजीच्या स्पर्धेतील विविध राऊंड्स, टाय, डिस्क्लोजर कटचे नियम या चित्रपटात तपशीलवार दाखवण्यात आले आहेत. 'पंजाब के पुत्तर आए हैं, दिल शेरोंवाला लाए हैं, तू बन जा गबरु...' हे शीर्षकगीत चांगलं झालं आहे.
अभिनय : मुख्य भूमिकेतील कलाकारांचे चेहरे परिचयाचे नसले तरी प्रत्येकाने बेस्ट देण्याचा प्रयत्न केला आहे. अभिषेक दुहानने राजबीरच्या भूमिकेला न्याय दिला आहे. सृष्टी रोडेने साकारलेली बालमैत्रीणही चांगली झाली आहे. कंवलप्रीत सिंग आणि ब्रजेश तिवारी यांनी मित्रांच्या भूमिकेत चोख कामगिरी केली आहे. अवतार गिल बऱ्याच दिवसांनी पडद्यावर दिसतात. त्यांची भूमिका महत्त्वाची आहे. बाल कलाकारांनीही उत्तम काम केलं आहे. हॅरीच्या खलनायकी भूमिकेत अभिलाष कुमारने आपला ठसा उमटवला आहे.
सकारात्मक बाजू : वनलाईन, अभिनय, दिग्दर्शन, शीर्षक गीत, पतंगबाजीची स्पर्धा, क्लायमॅक्स
नकारात्मक बाजू : पटकथा, संकलन, इतर गाणी
थोडक्यात काय तर या चित्रपटाचा विषय वेगळा असून, पतंगबाजीसारखी स्पर्धा प्रथमच रुपेरी पडद्यावर आली असल्याने एकदा पाहायला हवा.