गणेशोत्सव म्हणजे परंपरा आणि जबाबदारीचे भान, कसा आहे 'घरत गणपती' सिनेमा?

By संजय घावरे | Published: July 26, 2024 05:46 PM2024-07-26T17:46:52+5:302024-07-26T21:00:30+5:30

भूषण प्रधान-निकिता दत्ताची प्रमुख भूमिका असलेला 'घरत गणपती' सिनेमा कसा आहे? वाचा Review (gharat ganpati)

gharat ganpati marathi movie review starring bhushan pradhan nikita duttta ashvini bhave ajinkya deo | गणेशोत्सव म्हणजे परंपरा आणि जबाबदारीचे भान, कसा आहे 'घरत गणपती' सिनेमा?

गणेशोत्सव म्हणजे परंपरा आणि जबाबदारीचे भान, कसा आहे 'घरत गणपती' सिनेमा?

Release Date: July 26,2024Language: मराठी
Cast: निकिता दत्ता, भूषण प्रधान, अश्विनी भावे, अजिंक्य देव, संजय मोने, शुभांगी लाटकर, शुभांगी गोखले, डॉ. शरद भुताडिया, सुषमा देशपांडे, परी तेलंग, आशिष पाथोडे, रूपेश बने, राजसी भावे, समीर खांडेकर, दिव्यलक्ष्मी मैस्नाम
Producer: कुमार मंगत पाठक, अभिषेक पाठक, नम्रता बांदिवडेकर, नवज्योत बांदिवडेकर, गौरी कालेलकर-चौधरीDirector: नवज्योत बांदिवडेकर
Duration: २ तास १९ मिनिटेGenre:
लोकमत रेटिंग्स

आज शहरांमध्ये गणेशोत्सव म्हणजे जणू इव्हेन्ट बनला असला तरी कोकणासारख्या ठिकाणी हा उत्सव म्हणजे मोठा सणच असतो. गणेशोत्सव म्हणजे केवळ मौजमजा नसून, आपल्या आराध्य देवतेच्या उपासनेसोबतच परंपरा आणि जबाबदारीचे भान राखणेही आहे. हेच दिग्दर्शक नवज्योत बांदिवडेकरने आपल्या पदार्पणातील चित्रपटात दाखवलं आहे.

कथानक : कोकणातील जयंतराव आणि जानकी घरत म्हणजे अप्पा-माई यांच्या एकत्र कुटुंबाची ही गोष्ट आहे. या दाम्पत्याला भाऊ, शरद आणि कुसूम हि मुले आहेत. भाऊची पत्नी सुनंदा, तर शरदची पत्नी अहिल्या आहे. भाद्रपद महिन्यातील गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी घरतांच्या घरी गणेशाच्या मूर्तीचे आगमन होत असताना अंगणात मूर्ती खाली पडणार इतक्यात शरद-अहिल्याचा मुलगा केतन येऊन आधार देतो. त्याच्यासोबत त्याची दिल्लीतील मैत्रीण क्रितीसुद्धा कोकणातील गौरी-गणपतीच्या सणासाठी येते. गणेशाचं आगमन झाल्यावर घरात बऱ्याच गोष्टी घडतात.

लेखन-दिग्दर्शन : करियरच्या मागे धावणाऱ्या चाकरमान्यांची आजची पिढी गौरी-गणपतीच्या सणासाठी मोठ्या उत्साहात गाड्या घेऊन कोकणात जाते, पण तिथे सात दिवस राहणे त्यांना शक्य होत नाही. त्यामुळे काही ठिकाणी गौरी-गणपतीऐवजी दीड दिवसांच्या गणपतीचा विचार डोके वर काढत असताना आलेला हा चित्रपट डोळ्यांत अंजन घालणारा आहे. एकत्र कुटुंबपद्धती, परंपरा, जबाबदारी, अहंकार, ज्येष्ठांच्या भावना, तरुणाईच्या पाठीशी राहण्याचा विचार अशा विविध मुद्द्यांवर भाष्य करण्यात आलं आहे. सुनेचा तिरस्कार करण्याऐवजी तिला मैत्रीण बनवण्याचा विचार सुरेख आहे. 'कोकण भारी...', 'नवसाची गौराई...' ही गाणी छान आहेत. गणपतीच्या आगमनाचं गाणं आणखी जोरदार हवं होतं. विषय इतका प्रगल्भ असताना 'घरत गणपती' हेच शीर्षक का? ते समजत नाही. कोकणातील निसर्गसौंदर्य सुरेखरीत्या कॅमेऱ्यात कैद केलं आहे. गौरी-गणपतीतील पारंपरीक खेळांचा अभाव जाणवतो.

अभिनय : कलाकारांची अचूक निवड ही सर्वात मोठी जमेची बाजू आहे. भूषण प्रधान-निकिता दत्ता यांची केमिस्ट्री छान आहे. मराठमोळ्या लुकमध्ये निकिताचं सौंदर्य अधिकच खुलून दिसतं. तिने सर्वच बाबतीत सुरेख काम केलं आहे. मुख्य भूमिकेत भूषणने छान अभिनय केला आहे. स्त्रीचं एक वेगळं रूप दाखवणारी व्यक्तिरेखा अश्विनी भावेने साकारली आहे. अजिंक्य देवने साकारलेला शरद असो, किंवा संजय मोनेंच्या रूपातील भाऊ असो दोघेही चांगले झाले आहेत. शुभांगी लाटकर यांनी मोनेंना अचूक साथ दिली आहे. या सर्वांपेक्षा सुषमा देशपांडेंनी साकारलेली माई स्मरणात राहणारी आहे. डॅा. शरद भुताडीयांनी रंगवलेले अप्पाही छान आहेत. शुभांगी गोखलेंनी पुन्हा एकदा छोट्याशा भूमिकेत लक्ष वेधलं आहे. आशिष पाथोडेचं कॅरेक्टरही लक्षात राहणारं आहे.

सकारात्मक बाजू : पटकथा, संवाद, दिग्दर्शन, अभिनय, गीत-संगीत, सिनेमॅटोग्राफी, लोकेशन्स

नकारात्मक बाजू : शीर्षक, वातावरण निर्मिती

थोडक्यात काय तर कोकणातील गौरी-गणपतीचा सण दाखवताना काही त्रुटी राहिल्या असल्या तरी चित्रपटाद्वारे दिलेला विचार आणि एकूणच संपूर्ण टिमच्या उत्तम कामगिरीसाठी एकदा हा चित्रपट अवश्य पाहायला हवा.

Web Title: gharat ganpati marathi movie review starring bhushan pradhan nikita duttta ashvini bhave ajinkya deo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.