Ghoomketu Film Review: वेगळ्या अंदाजात दिसला नवाझुद्दीन सिद्दीकी,मात्र मनोरंजनात कमी पडला घूमकेतू
By अजय परचुरे | Published: May 23, 2020 12:58 PM2020-05-23T12:58:48+5:302023-08-08T20:09:54+5:30
बल्डी बाथरूम,सौतेली माँ,दिलवाले दुल्हनिया दे जायेंगे असे सिनेमा लिहीणारा लेखक,आपलं लेखक बनण्याचं स्वप्न घेऊन मुंबईत येतो. आणि त्याच्या स्वप्नांचा चुराडा होतो ह्याची मनोेरंजक कहाणी म्हणजे घूमकेतू
कोरोनाचं संकट गेले २ महिने भारतावरती कोसळलं आहे. या कोरोनामुळे चित्रपटगृहंही बंद आहेत. साहजिकच काही सिनेमे आता थेट ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज व्हायला लागले आहेत. त्यातलाच पहिला सिनेमा म्हणजे घूमकेतू.. नवाजुद्दीन सिद्दीकी सिनेमात असल्याने ,आणि ट्रेलरमध्ये दिसलेली त्याची हटके कॉमेडी पाहून ..ये सिनेमा कुछ अलग है भाऊ असा आपला समज होईल ही ,मात्र १ तास ४५ मिनिटांच्या या सिनेमात नवाझुद्दीन जरी उत्तम बॅटिंग करत असला तरी मॅच काही हा सिनेमा जिंकत नाही. तसंही हा सिनेमा ६ वर्षाआधीच बनलाय. मात्र भाईलोग सिनेमा मन को छूता नही है. आणि सिनेमा संपल्यावर इतना मजा नही आया असं नकळत तोंडातून वाक्य निघतंच..
उत्तर भारतातील मोहना गावचा स्वताला लेखक म्हणवणारा घूमकेतू (नवाझुद्दीन सिद्दीकी) . ज्याला बॉलिवूड सिनेमांचा लेखक व्हायचं आहे. आपलं लेखक व्हायचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी घूमकेतू गावातील गुदगुदी पेपरमध्ये लिहायला मिळावं म्हणून सतत चकरा मारत असतो. जिथे त्याला काम तर मिळत नाही पण त्याचा स्ट्रगल सुरू होतो. फक्त ३० दिवसांत बॉलिवूडचा लेखक कसा बनाल हे पुस्तक घेऊन घूमकेतू मायानगरी मुंबईत येतो. आणि इकडे येऊन बल्डी बाथरूम,सौतेली माँ,दिलवाले दुल्हनिया दे जायेंगे अश्या त्याच्या कहाण्या तो बॉलिवूडच्या निर्मात्यांना ऐकवतो. त्याला या सिनेमात रणवीर सिंग, सोनाक्षी सिन्हा यांनी काम करावे अशी त्याची इच्छा असते. तसंच तो आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी शाहरूख खानच्या ऑफिसच्या चकराही मारत असतो. शेवटी त्याला एक निर्माता पुढच्या ३० दिवसांत एक चांगली कहाणी लिहून आण असं सांगतो. दुसरीकडे पोलिस ऑफिसर बदलानी (अनुराग कश्यप) वर घूमकेतूला शोधण्याची जबाबदारी असते ,कारण घूमकेतू गावातून पळून आलेला असतो. आणि बदलानीलाही ३० दिवसांत त्याला शोधायचे असते. आता घूमकेतू ३० दिवसांत एक मस्त कहाणी लिहीतो का ? आणि दुसरीकडे बदलानी ३० दिवसांत घूमकेतूला शोधतो का ? हे पाहण्यासाठी तुम्हांला सिनेमा पाहण्याची गरज आहे.
हा सिनेमा ६ वर्ष आधीच तयार झाला आहे. पुष्पेंद्र मिश्राचा हा सिनेमा तुमचं मनोरंजन करू शकतो पण सिनेमा म्हणावं तसा पकड घेत नाही. सिनेमाचा अवधी जरी लहान असला तरी कहाणी मध्ये मध्ये भरकटत गेली आहे. तंत्रज्ञानादृष्टीने आणि संगीताच्या दृष्टीनेही सिनेमात सांगावं असं फारसं नाहीये. एक आयटम साँग जरी असलं तरी त्याचा फारसा प्रभाव काही पडत नाही. महत्वाचा मुद्दा म्हणजे गेल्या ५ वर्षात बॉलिवूडमध्ये मजबूत कथेची बांधणी असणारे ,आणि वेगळा आशय असणारे सिनेमे येऊन गेल्याने. कथेत आणि आशयात कमी पडणारा घूमकेतू आपल्या मनात घर करत नाही. सिनेमाची एकच महत्वाची बाजू आहे यातील कलाकार आणि त्यांचा अभिनय. घूमकेतूच्या भूमिकेत नवाझुद्दीन सिद्दीकीने बहार आणली आहे. मात्र संतो बुवांच्या भूमिकेतील इला अरूण त्यांच्या धमाल कॅरेक्टरमुळे जास्त लक्षात राहिल्या आहेत. स्वानंद किरकरे आणि रघुवीर यादव आणि बदलानीच्या भूमिकेतील अनुराग कश्यप यांची उत्तम साथ या सिनेमाला मिळाली आहे. पाहुण्या भूमिकेत अभिताभ बच्चन यांनीही धमाल उडवून दिलीय.मात्र फक्त अभिनयाच्या जोरावर हा सिनेमा तारू शकलेला नाही. तरीही लॉकडाऊनच्या काळात ओटीटी प्लॅटफॉर्मवर एकदा हा सिनेमा पाहायला काहीच हरकत नाही.