GIRLZ MOVIE REVIEW: गर्ल्सचा राॅकिंग स्वॅग
By अजय परचुरे | Published: November 29, 2019 12:32 PM2019-11-29T12:32:03+5:302023-08-08T20:38:18+5:30
मुलींच्या भावविश्वावर थेट भाष्य करणारा सिनेमा ही गर्ल्सची खासियत.
वयात आलेल्या मुलांवर मराठी असो किंवा इतर भाषिक सिनेमे असो अनेक विषय यापूर्वी आले आहेत. मात्र मुलींच्या भावविश्वावर प्रकाश टाकणारा, त्यांचं म्हणणं नुसतंच समजून न घेता ते मोठ्या पडद्यावर आणणे आजपर्यंत फार कमी मराठी सिनेमांमध्ये झालं आहे. २० वर्षांपूर्वी बिनधास्त हा पूर्णपणे मुलींच्या भावविश्वावर आधारित असणारा सिनेमा मराठीत आला होता. मात्र त्यानंतर हे प्रयोग फारसे मराठीत आपल्याला पाहायला मिळाले नाही. पण बिनधास्तच्या वेळचा काळ वेगळा होता. अब जमाना बहोत ही बदल गया है. घर का चिराग आणि कुलदिपक याची जागा आता आजच्या जगात दिया आणि लक्ष्मीने घेतली आहे. मात्र ही परिस्थिती अजूनही समाजात पाहिजे तशी मुरलेली नाही. सोशल मिडियाच्या जगातही पालक मुलींना सोशल मिडियावर सोसेल इतकंच आणि तेवढंच व्यक्त करायला भाग पाडतात. यावर थेट भाष्य करणारा सिनेमा म्हणजे गर्ल्स ..
गर्ल्स सिनेमाची कथा हृषिकेश कोळी या लेखकाच्या आयडियाच्या कल्पनेतून बाहेर आलेली. मात्र ही कल्पना नसून सध्याच्या काळातील मुलींचं वास्तव आहे. मती (अंकिता लांडे) ही सर्वसामान्य मध्यमवर्गीय घरातील मुलगी. मतीचे बाबा ( अमोल देशमुख) फॉरेस्ट आॅफिसर असल्याने त्यांची सतत बदली होत असते. ह्या शहरातून त्या शहरात होत असणाऱ्या बदलीने मती आधीच वैतागलेली आहे. त्यातच मतीची आई (देविका दफ्तरदार) ही टीपीकल आईप्रमाणे हे कपडे घालायचे नाही, अशी फॅशन करायची नाही अश्याप्रकारे कडक शिस्तीची.. कोल्हापूरासारख्या शहरात येऊनही.. आपलं कॉलेजविश्व मनाप्रमाणे जगू न शकणाऱ्या मतीला सोलो ट्रीप करण्याची भारी हौस आहे मात्र ही हौस या जन्मात तरी शक्य नाही त्यामुळे ती आधीच हिरमुसलेली आहे. मात्र कोल्हापूरात मतीचा नव्याने मित्र झालेला एस.डी.पी (पार्थ भालेराव) हयामध्ये मतीची मदत करतो. आणि महत्प्रयासाने मती घरच्यांच्या परवानगीने गोव्याला सोलो ट्रीपला जाते. आणि गोव्यात तिला तिच्यापेक्ष्या अतिशय भिन्न स्वभावाच्या मॅगी ( केतकी नारायण) आणि रूमी (अन्विता फलटणकर) या दोन जिवाभावाच्या मैत्रिणी भेटतात. आणि मतीला आपलं गमावलेलं भावविश्व पुन्हा सापडतं. या दरम्यान अनेक अडथळे आणि खाचखळगे येतात मात्र त्यावर मती मात करते का ? तिचं हे बदलेलं भावविश्व तिचे आई-वडिल स्वीकारतील का ? मती ,मॅगी, रूमी यांच्या बिनधास्त वागण्याने त्या अडचणीत येतात का ? नेमकं त्याचं काय होतं. हे समजण्यासाठी तुम्हांला हा सिनेमा पाहायला हवा.
मुळात असा विषय निवडल्याबद्दल या सिनेमाचा दिग्दर्शक विशाल देवरूखकर आणि लेखक हृषिकेश कोळी यांचं खरंच अभिनंदन .. या सिनेमात खरंच क्रेडिट द्यायला हवं ते हृषिकेश कोळीच्या संवांदांना अतिशय खुमासदार पध्दतीने त्याने हा विषय निवडताना प्रत्येक पात्राच्या तोंडी अप्रतिम संवाद दिले आहेत. बॉयज आणि बॉयज २ चा दिग्दर्शक विशाल देवरूखकर ह्याने गर्ल्समध्ये हॅटट्रीक साधली आहे. मुळात मुलींच्या भावविश्वावरील सिनेमा निवडताना किंवा सादर करणे तसे शिवधनुष्य असते मात्र विशालने हे शिवधनुष्य लिलया पेलले आहे. या सिनेमातील प्रमुख गर्ल्स अंकिता लांडे ,केतकी नारायण आणि अन्विता फलटणकर या तिघी समर्थ अभिनेत्री आहेत. मती, रूमी आणि मॅगी या तिन व्यक्तिरेखा या तीन अभिनेत्रींनी अक्षरक्ष जगल्या आहेत. मराठी सिनेसृष्टीला या तीन नव्या आणि ताज्या दमाच्या अभिनेत्री या सिनेमामुळे मिळतायत हे विशेष, पार्थ भालेरावचा रोल जरी लहान असला तरी त्यात तो भाव खाऊन गेला आहे. देविका दफ्तरदार, अमोल देशमुख ,अतुल काळे, सुलभा आर्य , विशेष भूमिकेत स्वानंद किरकिरे यांनी उत्तम साथ दिली आहे. या सिनेमाचं संगीत मूळातच खास आहे. प्रफुल्ल- स्वप्निल या संगीतकारांनी या सिनेमाचं संगीत या सिनेमाला साजेसं असं दिलं आहे. स्वॅग माझ्या फाट्यावर,आईच्या गावात ही गाणी आधीच लोकप्रिय झाली आहेत. तेव्हा अतिशय फ्रेश मूड ठेवणारा, कुठेही कंटाळवाणा न वाटणारा,डोक्याला ताप नसणारा आणि मुलींच्या भावविश्वाला योग्य मांडणारा हा सिनेमा एकदा पाहायला काहीच हरकत नाही