Gold Movie Review : ‘लेक्चरबाजी’चा अतिरेक
By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2018 06:50 PM2018-08-14T18:50:11+5:302023-08-08T20:09:54+5:30
उद्या स्वातंत्र्यदिनाच्या मुहूर्तावर ‘गोल्ड’ हा सिनेमा प्रदर्शित होतोय. हॉकी कोचच्या रूपातील अक्षय कुमार आणि त्याच्या टीमची मैदानावरची कामगिरी पाहण्यास प्रत्येकजण आतूर आहे. तेव्हा जाणून घेऊ यात हा चित्रपट कसा आहे तो...
- जान्हवी सामंत
उद्या स्वातंत्र्यदिनाच्या मुहूर्तावर ‘गोल्ड’ हा सिनेमा प्रदर्शित होतोय. हॉकी कोचच्या रूपातील अक्षय कुमार आणि त्याच्या टीमची मैदानावरची कामगिरी पाहण्यास प्रत्येकजण आतूर आहे. तेव्हा जाणून घेऊ यात हा चित्रपट कसा आहे तो...
खरे तर ‘गोल्ड’ हा देशप्रेमाने ओतरप्रोत भरलेला चित्रपट आहे, हे ट्रेलर पाहूनचं समजतं. देशासाठी पहिले सुवर्ण पदक मिळवण्याच्या इर्षेने पेटलेले खेळाडू आणि हॉकीसारखा खेळ असा सगळा मसाला असल्याने आपल्याला ‘लगान’ किंवा ‘चक दे’च्या तोडीचा स्पोर्ट ड्रामा बघायला मिळणार, हा अंदाज बांधूनचं कुठलाही प्रेक्षक चित्रपटगृहाची पायरी चढेल. पण पहिल्या १० मिनिटांतच ‘गोल्ड’ प्रेक्षकांचा हा अंदाज खोटा ठरवतो. ‘गोल्ड’ हा ‘लगान’ इतकाच भव्यदिव्य असला तरी त्याला ‘चक दे’ची सर नाही. ‘लगान’ व ‘चक दे’ या दोन्ही चित्रपटात प्रत्येक खेळाडूच्या भूतकाळातील संदर्भाने फुलत जाणारी कथा दाखवली गेली होती. त्यामुळेचं ही कथा प्रेक्षकांना अधिक भावली होती. पण ‘गोल्ड’मध्ये तसे नाही. त्यामुळेचं ‘गोल्ड’च्या कथेशी प्रेक्षक शेवटपर्यंत एकरूप होऊ शकत नाही. देशाभिमान आणि भारतीय ऐक्यावर हा चित्रपट संदेश देतो, पण हा संदेश हृदयापर्यंत पोहोचत नाही.
१९४८ च्या भारतीय हॉकी टीमचा मॅनेजर तपण दास (अक्षय कुमार) याच्याभोवती फिरणारी ही कथा. १९३६ च्या वर्ल्डकप हॉकी मॅचने चित्रपटाची सुरूवात होते. त्यावेळी भारत स्वतंत्र नव्हता. त्यामुळे ब्रिटीश टीम इंडिया मैदानावर खेळत असते आणि तपणदास या ब्रिटीश टीम इंडियाचा मॅनेजर असतो. भारतीय हॉकी संघ सुवर्णपदक मिळवतो. पण भारतीय खेळाडूंना अव्हेरून या विजयाचे सगळे श्रेय ब्रिटीश इंडियाला दिले जाते. हे श्रेय भारतीय खेळाडूंचे आहे, तमाम भारतीयांचे आहे, हा तपण दासचा होरा असतो. पण ब्रिटीश इंडिया या सुवर्णपदकाचे श्रेय लाटतो. त्याच क्षणी पुढचे सुवर्णपदक स्वतंत्र भारताला मिळवून द्यायचे, असा निर्धार तपण दास करतो. पण दुस-या महायुद्धामुळे सलग दोन आॅलिम्पिक सोहळे रद्द केले जातात. या दहा वर्षाच्या कालखंडात भारतीय क्रीडा क्षेत्रात राजकारणाचा शिरकाव होतो. भारतीय हॉकी संघाला या राजकारणाचा फटका बसतो. याचकाळात तपणदास मद्याच्या पूर्णपणे आहारी जातो. पण १९४६ मध्ये पुढची आॅल्मिपिक स्पर्धा लंडनमध्ये होणार,असे जाहिर होते आणि तपण दास पुन्हा पेटून उठतो. स्वतंत्र भारताची पहिली हॉकी टीम तयार करण्याच्या जिद्दीने पछाडलेला तपण दास स्वत:हून हॉकी फेडरेशनला भेटतो. हॉकी फेडरेशनचे प्रमुख त्याच्यावर विश्वास दाखवतात आणि तपणदास कामाला लागतो. स्वतंत्र भारताची हॉकी टीम बनवण्यासाठी तो अख्खा भारत पिंजून काढत एकापेक्षा एक सरस खेळाडू निवडतो. पण हे खेळाडू निवडताना भारत-पाक फाळणीच्या घडामोडींकडे त्याचे दुर्लक्ष होते. तपणदासची हॉकी टीम तयार होते. भारतही स्वतंत्र होतो. पण फाळणीने सगळे संदर्भ बदलतात. तपणच्या टीममधील अनेक मुस्लिम खेळाडू टीम सोडून पाकिस्तानात निघून जातात. ही पोकळी भरून काढण्याची आणि वर्षभरावर येऊन ठेपलेल्या आॅलिम्पिकसाठी टीमला सज्ज करण्याचे दुहेरी आव्हान तपणदासपुढे येते. शिवाय भारतीय हॉकी टीमचा सिनीअर मॅनेजर मेहता हा तपणदासच्या मार्गात अनंत अडचणी उभ्या करतो. या अनंत अडचणींवर चरणदास कसा मात करतो आणि स्वतंत्र भारतात हॉकीच पहिले सुर्वणपदक कसे मिळवून देतो, ही या चित्रपटाची कथा आहे.
स्वत:ला भारतीय म्हणवून घेण्यासाठी आपण काय केले पाहिजे? एकसंघ भारत म्हणजे काय? भारतीय असण्याची एक भावना आपल्याला जोडून ठेवू शकते की नाही? या प्रश्नांवर हा सिनेमा भाष्य करतो. क्लायमॅक्सपर्यंत तपण दासच्या हॉकी टीमचा प्रत्येक स्पर्धक देशासाठी नाही तर स्वत:साठी खेळत असतो. पण शेवटी हा संघ भारतीय असल्याच्या भावनेने एकसंघ होतो आणि इतिहास घडवतो. वेगवेगळ्या प्रदेशाचा, भाषेचा, जातीधर्माचा, संस्कृतीचा दाखला देऊल लोक एकमेकांविरोधात लढतात आणि त्यामुळे देशाचे कसे नुकसान होते, हा मुख्य संदेश हा चित्रपट देतो. पण हा संदेश देण्याच्या नादात ‘गोल्ड’ पडद्यावर फार प्रभाव पाडू शकत नाही. आधी म्हटल्याप्रमाणे ‘लगान’ व ‘चक दे’प्रमाणे ‘गोल्ड’च्या टीममधील प्रत्येकाशी कनेक्ट होता येत नाही. त्यामुळेच एक तपण दास सोडला तर टीममधील कुठल्याही खेळाडूबद्दल सहानुभूती वाटत नाही. शिवाय ‘लगान’ व ‘चक दे’मधील अंतिम सामन्यातील उत्कर्षबिंदू ‘गोल्ड’च्या टीमला साधता येत नाही. याचे कारण म्हणजे, ‘गोल्ड’ खेळापेक्षा देशभक्ती आणि खेळातील राजकारणावर अधिक फोकस करतो. त्यामुळे दुस-या भागापर्यंत चित्रपट काहीसा कंटाळवाणा वाटतो. अक्षयचा अभिनय उत्कृष्ट आह. पण त्याच्या टीमचे अनेक खेळाडू ‘ओव्हरअॅक्टिंग’करतात. विशेषत: अमित साध, मौनी रॉय आणि मेहता नावाच्या सिनीअर मॅनेजर रंगवलेल्या कलाकाराचा अभिनय भडक वाटतो. संगीतही मनाचा ठाव घेत नाही. एकंदर काय ‘गोल्ड’ मनोरंजन कमी आणि ‘लेक्चरबाजी’ अधिक देतो.