Good Newwz Review : कॉमेडी पण संवेदनशील, असा आहे अक्षय-करिनाचा 'गुडन्यूज'
By गीतांजली | Published: December 27, 2019 03:43 PM2019-12-27T15:43:05+5:302023-08-08T20:38:18+5:30
वर्षाचा शेवट आणि सुरुवात या गुडन्यूजने नक्कीच दमदार होऊ शकते.
गीतांजली आंब्रे
अक्षय कुमार, करिना कपूर, दिलजीत दोसांझ आणि कियारा अडवाणी यांचा गुड न्यूज सिनेमा तुमच्या नव्या वर्षाची सुरुवात आनंद करायला आला आहे. हसता हसता तुमच्या डोळ्यात टचकन पाणी आणणार असा हा सिनेमा आहे. आयव्हीएफ ट्रिटमेंटवर आधारित असलेल्या सिनेमाची कथा दोन जोडप्यांभोवती फिरते. ज्यांना आई-वडील व्हायचे असते. लग्न झालेल्या प्रत्येक जोडप्याच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा विषय अत्यंत हलक्या फुलक्या पद्धतीने दिग्दर्शकांने मांडण्याचा उत्कृष्ट प्रयत्न केला आहे.
मुंबईत राहणाऱ्या वरुण (अक्षय कुमार) आणि दिप्ती बत्रा (करीना कपूर खान ) या हाय-प्रोफेइल जोडप्याची ही गोष्ट आहे. वरुण आणि दिप्तीच्या लग्नाला सात वर्षे झालेली असतात. मात्र या सात वर्षांत त्याच्या घरी पाळणा हललेला नसतो. परिणामी दोघांचे कुटुंबीय मुलं होण्यासाठी त्यांच्यावर दबाव टाकत असतात. दिल्लीत एका फॅमिली फंक्शनसाठी ते जातात त्यावेळी वरुणची बहीण अंजना सुखानी त्यांना आयव्हीएफच्या मदतीने आई-वडील होण्याचा सल्ला देतात. दप्ती यासाठी वरुणला तयार करते. मात्र या ट्रिटमेंट घेत असताना एक वादळ येते ते वरुणचे स्पर्म हनी बत्रा (दिलजीत दोसांझ) यांचे स्पर्म अदला-बदली होतात. त्यानंतर सगळाच गोंधळ उडतो. दिप्तीच्या गर्भात हनीचे स्पर्म आणि हनीची पत्नी मोनिकाच्या (कियारा अडवाणी) गर्भात वरुणचे स्पर्म. आयव्हीएफचे सॅप्मल बदल्यानंतर हनी आणि मोनिका चंडीगडवरून मुंबईत शिफ्ट होतात. यानंतर दोन्ही कपल्सच्या आयुष्यात काय ट्विस्ट येतो?,हे पाहण्यासाठी तुम्हाला हा सिनेमा पाहायला लागेल.
अक्षय कुमारने नेहमी प्रमाणे जबरदस्त अभिनय करत. वरुणच्या भूमिकेवर आपली वेगळी छाप उमटवली आहे. अक्षय तुम्हाला अनेक ठिकाणी हसून-हसून वेड लावतो. वरुणच्या भूमिकेची नस त्याने अचूक ओळखली आहे. तर पत्रकार आणि पत्नीच्या भूमिकेला करिना कपूरने आपल्या अभिनयाने चारचाँद लावले आहेत. दिप्तीच्या भूमिकेत ती खूपच भाव खाऊन गेली आहे. सिनेमातील अनेक इमोशनल सीन्सना तिने आपल्या अभिनयाच्या जोरावर जिंकले आहे. अक्षय आणि करीना केमिस्ट्री चांगली जुळून आली आहे. दिलजीत दोसांझ पंजाबी मुलाच्या भूमिकेशी पूर्णपणे एकरुप झाला आहे. तर कियाराच्या वाटेला आलेल्या भूमिकेला तिने योग्य न्याय दिला आहे. आदिल हुसैन आणि टिस्का चोप्राने देखील डॉक्टर जोडप्याची भूमिका चोख बजावली आहे. गुड न्यूजमधून दिग्दर्शनात पदार्पण करणाऱ्या राज मेहता कौतुकास पात्र ठरले आहेत. आयव्हीएफ आणि त्यानंतर स्मर्प एक्सेंज सारख्या विषयावर सिनेमा तयार करताना तो कुठेच अश्लिलते कडे झुकणार नाही याची काळजी त्यांनी घेतली आहे. बऱ्याचदा कॉमेडी सिनेमा तुम्हाला कंटाळवाणा वाटू लागतो मात्र हा सिनेमा पाहताना तुम्हाला कुठेच कंटाळा येणार नाही. सिनेमातील गाणी आधीच हिट झाली आहे. त्यामुळे संगीताची मेजवानी या सिनेमात आहे. सिनेमाचे एडिटिंग, संवाद, आणि स्क्रीनप्ले सगळेच दमदार आहे. एकूणच गुडन्यूज हा हलका -फुलका दमदार कॉमेडी सिनेमा आहे. वर्षाचा शेवट आणि सुरुवात या गुडन्यूजने नक्कीच दमदार होऊ शकते.