gulabjaam review : मस्त पाकात मुरलेला गुलाबजाम
By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2018 12:07 PM2018-02-15T12:07:12+5:302023-08-08T20:27:58+5:30
गुलाबजाम हे नुस्त नाव जरी घेतले तरी तोंडाला पाणी सुटते. पण हाच गुलाबजाम बनवताना किती कष्ट घ्यावे लागतात. गुलाबजाम बनवताना सगळे काही व्यवस्थितपणे जमून आले नाही तर त्याची चव बिघडते आणि तो बेचव होते. पण तेच जर सगळे काही योग्य प्रकारे जमून आले तर गुलाबजाम सारखा चविष्ट पदार्थ नसतो... तसाच सगळे काही मस्त जमून आलेला हा गुलाबजाम चित्रपट आहे.
गुलाबजाम हे नुस्त नाव जरी घेतले तरी तोंडाला पाणी सुटते. पण हाच गुलाबजाम बनवताना किती कष्ट घ्यावे लागतात. गुलाबजाम बनवताना सगळे काही व्यवस्थितपणे जमून आले नाही तर त्याची चव बिघडते आणि तो बेचव होते. पण तेच जर सगळे काही योग्य प्रकारे जमून आले तर गुलाबजाम सारखा चविष्ट पदार्थ नसतो... तसाच सगळे काही मस्त जमून आलेला हा गुलाबजाम चित्रपट आहे. दोन वेगवेगळ्या स्वभावाची व्यक्ती, त्यांच्यात असलेल्या एका समान धाग्यामुळे कशा जोडल्या जातात हा सांगणारा हा चित्रपट आहे. पाककला हा समान धागा असलेल्या दोघांची कथा आपल्याला गुलाबजाम या चित्रपटात पाहायला मिळते.
आदित्यला (सिद्धार्थ चांदेकर) लंडनमध्ये लठ्ठ पगाराची नोकरी असते. पण त्याचे मन नोकरीत कधीच रमत नसते. लंडनमध्ये महाराष्ट्रीयन खाद्यपदार्थाचे एक हॉटेल सुरू करायचे असे त्याचे स्वप्न असते. पण त्याने कायम नोकरी करावी असे त्याच्या पालकांचे आणि प्रेयसीचे म्हणणे असते. पण काहीही करून हॉटेल सुरू करायचे असे आदित्यने मनाशी ठरवलेले असते आणि त्यामुळे तो मराठमोळे जेवण शिकण्यासाठी पुण्यात येतो. पुण्यात आल्यावर काही मित्रांसोबत तो राहू लागतो. एकदा एका मित्राचा चविष्ट डबा चाखल्यानंतर तो डबा बनवणाऱ्या राधा (सोनाली कुलकर्णी) कडे पोहोचतो. राधा ही अतिशय अबोल, आपल्यात रमणारी असते. बाहेरच्या जगाशी तिचा संपर्क खूपच कमी असतो. राधाने आपल्याला जेवण बनवायला शिकवावे अशी आदित्यची इच्छा असते. पण राधा या गोष्टीसाठी तयारच नसते. पण अनेक प्रयत्नाने आदित्य राधाला तयार करतो. राधाकडून जेवण शिकत असताना राधा आणि आदित्य अधिकाधिक वेळ एकमेकांसोबत घालवायला लागतात आणि त्यांच्यात खूप छान मैत्री होते. त्या दोघांचाही एक भूतकाळ असतो. हा भूतकाळ ते सगळ्यांपासून लपवून ठेवत असतात. पण काही काळाने ते दोघेही आपल्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट एकमेकांसमोर मांडतात. आदित्य आणि राधाचे हे नाते कसे उलगडत जाते हे खूपच छान पद्धतीने दिग्दर्शक सचिन कुंडलकर यांनी दाखवले आहे.
गुलाबजाम या चित्रपटाची कथा आणि संवाद खूपच छान आहेत. मी माझ्या मनातले सगळे पदार्थांना सांगते... ते समजूनही घेतात आपल्याला आणि मग छान चव येते त्यांना यासारखे अनेक संवाद आपल्या मनाला स्पर्शून जातात. राधाच्या भूतकाळात घडलेल्या गोष्टी आपल्या मनाला नक्कीच स्पर्शून जातात. राधा आणि आदित्य यांना दोघांनाही जेवण बनवण्यात रस असल्याचे दाखवण्यात आले आहे. त्यामुळे त्यांच्या संवादात देखील तीच भाषा वापरण्यात आली आहे. चित्रपटातील एका दृश्यात राधा आणि आदित्यच्या भांडणांमध्ये पाककृतीतील शब्दांचा वापर केला आहे. तसेच कोणताही पदार्थ बनवण्यापूर्वी आदित्य त्या पदार्थाशी गप्पा मारतो असे दाखवण्यात आले आहे. या सगळ्या गोष्टी चित्रपटात मस्त जमून आल्या आहेत. चित्रपटाची सिनेमॅटोग्राफी आणि बँकराऊंड म्युझिक खूपच छान आहे. चित्रपटात दाखवलेले पदार्थ पाहून तुमच्या तोंडाला नक्कीच पाणी सुटते. सोनाली कुलकर्णी आणि सिद्धार्थ चांदेकरने आपल्या अभिनयाने चित्रपटाला चार चाँद लावले आहेत. त्यांची केमिस्ट्री देखील खूपच चांगली जमून आली आहे. चिन्मय उद्गीरकर खूपच कमी वेळासाठी असला तरी तो देखील लक्षात राहतो. गुलाबजाम खालल्यानंतर जशी त्याची चव अनेक वेळ आपल्या जिभेवर रेंगाळते तसाच हा चित्रपट पाहिल्यानंतर हा चित्रपट देखील आपल्या मनात रेंगाळत राहातो.