Gulabo Sitabo review : अमिताभ बच्चन यांच्या कारकिर्दीतील आणखी एक मास्टर स्ट्रोक
By प्राजक्ता चिटणीस | Published: June 11, 2020 08:23 PM2020-06-11T20:23:07+5:302023-08-08T19:47:32+5:30
अमिताभ बच्चन आणि आयुष्मान खुराणा यांचा गुलाबो सिताबो अॅमेझॉन प्राईमवर आज प्रदर्शित झाला आहे. अमिताभ यांचा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होण्याची ही पहिलीच वेळ आहे.
टॉम अँड जेरी ही अनेकांची आवडती कार्टून्स आहेत. त्यांच्यासारखे सतत भांडणं करणारे लोक आपण अनेकवेळा चित्रपटांमध्ये पाहिले आहेत. गुलाबो सिताबोमधील ही जोडी देखील टॉम अँड जेरीच आहे असेच आपल्याला म्हणावे लागेल. या चित्रपटातील दोन मुख्य व्यक्तिरेखांमध्ये होणारे भांडण आपल्याला गुलाबो सिताबो या चित्रपटात पाहायला मिळतं.
मिर्झा (अमिताभ बच्चन) यांच्या पत्नीची एक भलीमोठी हवेली असते. या हवेलीत काही भाडेकरू राहात असतात. ते अतिशय कमी भाडं देत असले तरी ते तिथे अनेक वर्षांपासून राहात असतात. त्यामुळे त्यांना त्या हवेलीतून बाहेर काढणे मिर्झासाठी शक्य नसते. बाके (आयुष्मान खुराणा) हा भाडेकरू तर कित्येक वर्षांपासून काहीही केल्या भाडे देत नसतो आणि हवेली देखील सोडायला तयार नसतो. या सगळ्यामुळे मिर्झा कंटाळलेले असतात. मिर्झा यांच्याकडे घर चालवायला पैसे नसल्याने ते घरातील एक-एक वस्तू विकत असतात. त्यांची ही गोष्ट त्यांच्या पत्नीला अजिबात आवडत नसते तर दुसरीकडे ही हवेली विकायची यासाठी मिर्झा यांचे प्रयत्न सुरू असतात. पण हवेली ही त्यांच्या पत्नीच्या नावावर असते. त्यामुळे हवेली विकणे हे त्यांच्यासाठी डोकेदुखी झालेली असते. बाके आणि इतर भाडेकरू आपल्याला कायमस्वरूपी चांगले घर मिळावे यासाठी ही हवेली खूप जुनी असल्याचे पुरातत्व विभागाला पटवण्याचा प्रयत्न करत असतात. ही हवेली विकण्यासाठी मिर्झा पत्नीला कशाप्रकारे तयार करतात, ही हवेली विकली जाते का, या भाडेकरूंचे पुढे काय होते, ही हवेली पुरातत्व विभागाकडे जाते का यांसारख्या अनेक प्रश्नांची उत्तरं तुम्हाला गुलाबो सिताबो हा चित्रपट पाहिल्यावरच मिळतील.
सुजित सरकार आणि जुही चर्तुवेदी या दिग्दर्शक-लेखिका या जोडीने पिकू, विकी डोनर यांसारखे हिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत. गुलाबो सिताबोची कथा देखील जुहीने लिहिली असून या चित्रपटाचे दिग्दर्शन सुजित यांनी केले आहे. या चित्रपटाची कथा ही आजवरच्या चित्रपटांपासून खूप वेगळी असून दिग्दर्शकाने ती खूप चांगल्याप्रकारे मांडली आहे. केवळ चित्रपट पाहाताना काही वेळा कथा खूपच संथ गतीने पुढे जात असल्याचे जाणवते. तसेच मिर्झा आणि बाके यांच्या भांडणात तोचतोचपणा जाणवतो. पण चित्रपटात खरी बाजी मारली आहे ती अमिताभ बच्चन यांनी. या चित्रपटात अमिताभ यांच्यावर करण्यात आलेल्या प्रोस्थेटिक मेकअपमुळे मिर्झा या व्यक्तिरेखेत कुठेच अमिताभ बच्चन डोकावत नाहीत. तसेच अमिताभ बच्चन यांनी आवाज देखील खूप वेगळा काढला आहे. संवादफेक वेगळ्या पद्धतीने केली आहे. तसेच त्यांची देहबोली देखील खूपच वेगळी असल्याने खरंच मिर्झा ही व्यक्तिरेखा साकारणारा कलाकार बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन आहेत का हा नक्कीच प्रश्न पडतो. त्यांना आयुष्मान खुराणाने चांगली साथ दिली आहे. तसेच विजय राज, बिजेंद्र काला यांच्या भूमिका छोट्या असल्या तरी त्या लक्षात राहातात. या चित्रपटाची गाणी देखील कथेला साजीशी अशीच आहेत.
गुलाबो सिताबो या चित्रपटाची कथा ही लखनऊमधील असल्याने चित्रपटाच्या संवादात आपल्याला लखनऊ भाषेचा प्रभाव दिसून येतो. चित्रपटाचे संवाद देखील चांगले जमून आले आहेत. चित्रपटाचा शेवट तर खूपच रंजक असून सगळ्यांना एक झटका देऊन जाणारा आहे यात काहीच शंका नाही. केवळ चित्रपटात आयुषमानची प्रेमकथा, त्याच्या बहिणीची कथा अशा उपकथा का टाकण्यात आल्या आहेत हा प्रश्न नक्कीच पडतो. कारण या कथांचा मूळ कथेशी काहीच संबंध जोडण्यात आलेला नाहीये. एकंदरीत एक निखळ मनोरंजन अनुभवण्यासाठी गुलाबो सिताबो हा चित्रपट पाहायला हरकत नाही.