Haseena Parkar Movie Review:श्रद्धाशिवाय दुसरे काहीच नाही!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2017 08:43 AM2017-09-22T08:43:49+5:302023-08-08T19:47:32+5:30
हसीनाच्या या कथेला ‘सत्या’ , ‘शूट आऊट इन लोखंडवाला’ किंवा ‘डी कंपनी’ सारख्या ‘माफिया फिल्म्स’ची सर येत नाही.कोर्ट रूम ड्रामाच्या माध्यमातून हसीना पारकर व तिचे अंडरवर्ल्डशी असलेले कथित संबंध या चित्रपटात दाखवण्याचा प्रयत्न केला गेला आहे. हसीना मुंबईत आपल्या भावाचा क्राईम सिंडिकेट व बिझनेस चालवते, असा आरोप तिच्यावर ठेवल्या जातो आणि या आरोपाच्या अनुषंगाने हसीनाच्या भूतकाळाच्या रूपात या चित्रपटाची कथा पुढे सरकते.
‘शूट आऊट अॅट लोखंडवाला’, ‘एक अजनबी’,‘जंजीर’ असे चित्रपट दिग्दर्शित करणारे डायरेक्टर अपूर्व लाखिया यांचा ‘हसीना पारकर’ हा चित्रपट आज रिलीज झाला. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची बहीण हसीना पारकर हिच्या आयुष्यावर बेतलेल्या या चित्रपटात श्रद्धा कपूर मुख्य भूमिकेत आहे. हसीनाच्या भूमिकेत श्रद्धा किती फिट बसली आणि मुळात हसीनाचे संपूर्ण आयुष्य पडद्यावर चितारण्यात दिग्दर्शकाला किती यश आले, ते जाणून घेऊ या...
केवळ चित्रपटाच्या मुख्य पात्रामुळे एका बाजूने ‘इमोशनल मेलोड्रामा’ आणि दुस-या बाजूने पूर्णपणे ‘गँगस्टर मुव्ही’ अशा दोन वेगवेगळ्या शैलीत विभागले जाणारे काही चित्रपट असतात. ‘हसीना पारकर’ हा चित्रपट याच पठडीतला चित्रपट म्हणता येईल. कदाचित याचमुळे भारताचा ‘मोस्ट वॉन्टेड’ अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याची बहीण हसीना पारकर हिची कथा पडद्यावर चितारतांना दिग्दर्शक गोंधळलेला दिसतो. याच गोंधळामुळे
हसीनाच्या या कथेला ‘सत्या’ , ‘शूट आऊट इन लोखंडवाला’ किंवा ‘डी कंपनी’ सारख्या ‘माफिया फिल्म्स’ची सर येत नाही.कोर्ट रूम ड्रामाच्या माध्यमातून हसीना पारकर व तिचे अंडरवर्ल्डशी असलेले कथित संबंध या चित्रपटात दाखवण्याचा प्रयत्न केला गेला आहे. हसीना मुंबईत आपल्या भावाचा क्राईम सिंडिकेट व बिझनेस चालवते, असा आरोप तिच्यावर ठेवल्या जातो आणि या आरोपाच्या अनुषंगाने हसीनाच्या भूतकाळाच्या रूपात या चित्रपटाची कथा पुढे सरकते. सरकारी वकील साटम आणि हसीनाचा विश्वासू वकील केसवानी यांच्या कोर्टरूममधील युक्तिवादाने कथा सुरु होते. भावाच्या बेकायदेशीर कामात हसीनाचा सहभाग सिद्ध करण्यासाठी नव्हे तर जणू हसीनाच्या आयुष्यचा ‘फ्लॅशबॅक’ दाखवण्यासाठी चित्रपटातील सरकारी वकील हसीनाला प्रश्न विचारत जातो आणि या प्रश्नांच्या उत्तरादाखल हसीना आपल्या आयुष्यातील एक एक घटनाक्रम ऐकवत जाते. एका कॉन्स्टेबलीची सुंदर मुलगी या नात्याने हसीनाचे आयुष्य, तिच्या भावाचा गुन्हेगारी प्रवास आणि पुढे अंडरवर्ल्ड डॉन म्हणून त्याचा मुंबईतील त्याची दहशत असा सगळा एका चित्रपटासाठी लागणारा मसाला हसीनाच्या आयुष्यात आहे. या अर्थाने दाऊदची भूमिका पडद्यावर साकारणाºया सिद्धांत कपूरने उठावदार काम केले आहे. मात्र एकूणच चित्रपटाबद्दल म्हणाल तर, हसीना पारकरच्या पात्राला कलाकृतीच्या अंगाने न्याय देण्याच्या बाबतीत हा चित्रपट उणा ठरला आहे. हसीना तिच्या भावाच्या गुन्हेगारी विश्वाची बळी आहे की ती सुद्धा या गुन्हेविश्वाचा भाग आहे, याचे उत्तर या कथेतून शेवटपर्यंत मिळत नाही. एकीकडे हसीना भावाच्या ‘डॉन’पणाचा अगदी सहज वापर करताना दिसते तर दुसरीकडे बॉम्बस्फोट व अन्य गुन्हेगारी कारवायांतील भावाच्या सहभाग तिला खटकतो. पती व मुलाच्या हत्येनंतरही हसीनाची नेमकी भूमिका काय, ती कुणाच्या बाजूने आहे,हे कळत नाही. याचमुळे हा चित्रपट संभ्रम वाढवतो. हा संभ्रम शेवटपर्यंत कायम राहत असल्याने हसीना दोषी आहे वा नाही, हे ठरवण्यात प्रेक्षक अपयशी ठरतो.
हसीनाच्या भूमिकेत श्रद्धाचा अभिनय लक्षवेधी आहे. सगळ्या चित्रपटांचा भार तिने एकटीने आपल्या खांद्यावर घेतला आहे. खरे तर हा चित्रपट श्रद्धासाठी सोपा नव्हताच. पण या भूमिकेला न्याय देण्याचा पुरेपूर प्रयत्न श्रद्धाने केला आहे. केवळ वाईट प्रोस्टेटिक्स मेकअपमुळे काही महत्त्वाच्या प्रसंगात संवादफेक करताना ती काहीशी कमजोर ठरते. प्रोस्टेटिक्समधील त्रूटी टाळल्या गेल्या असत्या तर श्रद्धाचा अभिनय सवार्थाने अधिक दर्जेदार ठरला असता.
एकंदर काय तर या चित्रपटाला बायोपिकसारखे ट्रिट करण्याच्या नादात दिग्दर्शकाची गफलत झाली, हे चित्रपट पाहिल्यानंतर लगेच लक्षात येते. सरतेशेवटी श्रद्धाचा दर्जेदार अभिनय पाहायचा असेल तर तुम्ही हा चित्रपट नक्कीच पाहू शकता.