hindi medium review : इरफान खानने मारला पुन्हा सिक्सर
By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2017 10:18 AM2017-05-19T10:18:58+5:302023-08-08T20:09:54+5:30
एखादे मुल हिंदी मीडियममध्ये शिकलेय आणि त्याला इंग्रजी येत नसेल तर केवळ त्यावरून त्याला जज करणे हेही योग्य नाही. इरफान खानचा आगामी ‘हिंदी मीडियम’ हा सिनेमा याच विषयावर आधारित आहे.
अंग्रेजी जबान नही क्लास है हा हिंदी मीडियम मधला संवाद आजच्या आपल्या समाजासाठी अगदी योग्य आहे. समोरची व्यक्ती किती हुशार आहे याचे मोजमाप अनेकवेळा त्याच्या इंग्रजी बोलण्यावरून केले जाते. इंग्रजी ज्याला बोलता येत नाही त्याची बौद्धिक क्षमता ही अतिशय कमी असते असेच आपल्याकडे मानले जाते आणि त्याला दुय़्यम वागणूक दिली जाते. यामुळे त्या माणसाच्या मनात आपोआप न्यूनगंड निर्माण होतो. नोकरीच्या ठिकाणी, चारचौघांत अस्खलित इंग्रजी बोलता येणाऱ्या व्यक्तीलाच जास्त मान असतो. त्यामुळे आपल्याला देखील इंग्रजी बोलता यावे असे प्रत्येकाला वाटत असते. पण आपल्या आर्थिक परिस्थितीमुळे
अनेकांना चांगल्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकणे शक्य झालेले नसते. त्यामुळे आपल्या मुलांनी तरी फाडफाड इंग्रजी बोलावे अशी अनेकांची इच्छा असते. पण त्यासाठी चांगल्या शाळेत टाकणे गरजेचे आहे असे त्यांना वाटत असते. सरकारी शाळेत अथवा एखाद्या साध्या प्राइव्हेट शाळेत चांगले शिक्षण मिळणार नाही असा त्यांचा समज असतो. त्यामुळे कितीही तास अॅडमिशनच्या रांगेत उभे राहायला, डोनेशन द्यायला, प्रवेश मिळवण्यासाठी काहीही करायची या पालकांची तयारी असते. शाळेच्या प्रवेशासाठी काहीही करायला तयार असणाऱ्या पालकांच्या परिस्थितीवर तंतोतंत भाष्य करणारा हिंदी मीडियम हा चित्रपट आहे.
हिंदी मीडियममध्ये आपल्याला राज (इरफान खान) आणि मिता (सबा कमार) यांची कथा पाहायला मिळते. राजचे दिल्लीत एक मोठे दुकान असते. त्यामुळे त्याच्याकडे पैशाची काहीही कमरतता नसते. राज, मिता आणि त्यांची मुलगी पिया (दिशिता सेहगल) यांचे एक सुखी कुटुंब असते. पियाला चांगल्या शाळेत टाकायचे असे मिताचे म्हणणे असते. त्यामुळे दिल्लीतील सगळ्या प्रसिद्ध शाळांमध्ये तिच्या प्रवेशासाठी मिता आणि राज प्रयत्न करतात. चांगल्या शाळेत प्रवेश मिळावा यासाठी ते दिल्लीतील चांदनी चौकमधील आपले घर विकून दिल्लीतील वसंत विहार परिसरात राहायला येतात. श्रीमंत लोकांच्या परिसरात राहायला आल्यानंतर ते आपल्या राहाणीमानात देखील बदल करतात. पण पियाला इंग्रजी येत नसल्याने त्या परिसरातील मुले पियाशी खेळायला तयार होत नाहीत. त्यामुळे दिल्लीतील सगळ्यात प्रसिद्ध शाळेत पियाचे अॅडमिशन करायचे असे ते ठरवात आणि प्रवेशासाठी एका कन्स्लटंट (तिल्लोतमा शोमे)ची मदत घेतात. शाळेत मुलाखत कशी द्यायची याचे धडे ती राज आणि मिताला देते. पण ते दोघेही मुलाखतीत नापास होतात आणि त्यांच्या मुलीला शाळेत प्रवेश मिळत नाही. त्यामुळे शेवटचा उपाय म्हणून ते गरिबांच्या कोट्यातून प्रवेश मिळवायचे ठरवतात आणि त्यासाठी राजचे संपूर्ण कुटुंब आपला बंगला सोडून एका झोपडपट्टीत राहायला जाते. कोणालाही त्यांच्यावर संशय येऊ नये यासाठी राज एका कंपनीत मजुर म्हणून काम देखील करायला लागतो. मिता तेथील नळावर पाणी भरते, रेशनच्या दुकानावर रांग लावते. एखाद्या गरीब कुटुंबाला ज्या, ज्या गोष्टी कराव्या लागतात. त्या सगळ्या गोष्टी ते दोघे करतात. झोपडपट्टीत राहात असताना त्यांची ओळख श्याम प्रकाशशी (दीपक डोबरियाल) होते. श्याम प्रकाश हा मनाने अतिशय साधा असतो. तो अतिशय गरीब असला तरी आपल्या ताटातील दोन घास इतरांना द्यायला तो कधीही तयार असतो. दिल्लीतील त्याच शाळेत त्याच्या मुलाचा देखील तो गरिबांच्या कोट्यातून प्रवेशासाठी प्रयत्न करत असतो. पिया आणि श्याम प्रकाश याच्या मुलापैकी कोणाला प्रवेश मिळतो. त्यानंतर काय होते हे खूपच चांगल्यारितीने दिग्दर्शक साकेत चौधरीने चित्रपटात मांडले आहे. पण चित्रपट पाहाताना संजय सुरीची व्यक्तिरेखा नक्कीच खटकते. त्याच्या व्यक्तिरेखेतून दिग्दर्शकाला काय दाखवायचे आहे हेच शेवटपर्यंत कळत नाही. मिता त्याला आधीपासून ओळखते असे सुरुवातीला दाखवण्यात येते. पण चित्रपटात त्याच्या पात्राचा नंतर काहीही उल्लेख होत नाही.
हिंदी माडियम आजच्या आपल्या शिक्षण पद्धतीवर योग्य पद्धतीने भाष्य करतो. चित्रपटाचा विषय हा गंभीर असला तरी तो हलक्याफुलक्या पद्धतीने मांडण्यात आला आहे. या चित्रपटातील संवादासाठी अमितोष नागपाल या संवाद लेखकाचे कौतुक करण्याची नक्कीच गरज आहे. या चित्रपटातील अनेक संवाद मनाला भिडतात. इरफान खानने नेहमीप्रमाणेच या चित्रपटातदेखील सिक्सर मारला आहे. राज ही भूमिका साकारताना तो अभिनय करतोय असे कुठेच वाटत नाही. सबा कमारचा हा पहिला चित्रपट असला तरी तिने मिता या व्यक्तिरेखेला योग्य न्याय दिला आहे. या चित्रपटातही दीपक डोबरियारचे अचूक कॉमिक टायमिंग आपल्याला पाहायला मिळते. दिक्षिता या बालकलाकारानेदेखील चित्रपटात चांगले काम केले आहे. तैनू सूट करदा हे गाणे चांगलेच ओठावर रुळते.
चित्रपट मध्यांतरांनंतर थोडासा ताणलेला वाटतो. पण एकंदर करमणूक म्हणून हिंदी मीडियम हा एक चांगला चित्रपट आहे.