अत्यावश्यक विषयावर प्रामाणिक प्रयत्न-‘टॉयलेट : एक प्रेम कथा’
By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2017 01:42 PM2017-08-11T13:42:47+5:302023-08-08T19:16:16+5:30
आगळीवेगळी म्हणण्याचे कारण की शौचालय आणि सॅनिटेशनसारखे गंभीर विषय एवढा मनोरंजक पद्धतीने दाखविले जावू शकतात, हे या चित्रपटातून क्षणोक्षणी जाणवते.
नाव आणि कथानकामुळे तुफान चर्चेत असलेला ‘टॉयलेट : एक प्रेमकथा’ चित्रपटगृहात रिलीज झाला. अक्षयकुमार आणि भूमी पेडणेकर यांची आगळीवेगळी लव्हस्टोरी या चित्रपटातून प्रेक्षकांना बघावयास मिळाली. आगळीवेगळी म्हणण्याचे कारण की शौचालय आणि सॅनिटेशनसारखे गंभीर विषय एवढा मनोरंजक पद्धतीने दाखविले जावू शकतात, हे या चित्रपटातून क्षणोक्षणी जाणवते. त्याचबरोबर सामाजिक आणि राजकीय पैलूंवर एखाद्या चित्रपटातून विचार-विमर्श घडवून आणले जावू शकते व चित्रपट विकासात्मक बदल घडवू शकतात, असा संदेशही ‘टॉयलेट : एक प्रेम कथा’च्या माध्यमातून दिग्दर्शक श्री नारायण सिंग देण्यात यशस्वी होताना दिसतात.
खरंतर शौचालय आणि संडास हा विषय आपल्यासाठी नवा नाही. अनिता नारे या महिलेने घरात शौचालय नसल्याने तिचा संसार सोडून दिला होता. एवढेच नव्हे तर तिने आपल्या घराच्या आजूबाजूच्या महिलांनाही शौचालय उभारण्यासाठी प्रवृत्त केले होते. तिचा नवरा शिवराम याने गावात सॅनिटेशन विभागाच्या मदतीने शौचालय बांधल्यानंतरच ती तिच्या सासरी परत आली. या महिलेमुळेच मध्यप्रदेशात टॉयलेट बांधून घेण्यासाठीची क्रांती घडून आली. ‘शौच’ हा विषय आपल्या लोक-लाज आणि सभ्यतेशी इतका निगडित आहे की, लोकांचे ह्याबद्दल विचार बदलणे खूप कठीण आहे. मात्र, अनिता आणि शिवराम नारे यांच्या आव्हानात्मक प्रेमकथेला मनोरंजन आणि रोमान्सचा टिवस्ट देऊन दिग्दर्शक श्री नारायण सिंग यांनी खूप उत्तम चित्रपटाची निर्मिती केली आहे.
‘टॉयलेट : एक प्रेमकथा’ हा चित्रपट सुरू होतो केशव (अक्षयकुमार) च्या एंट्रीने. रिती-रूढींच्या कट्टर वातावरणात मोठा झालेल्या केशवचे ३६ वर्षांपर्यंत लग्न झालेले नसते. वडिल पंडितजींच्या (सुधीर पांडे) पत्रिका अभ्यासानुसार मांगलिक केशवला २ अंगठे असलेल्या मुलीशीच लग्न क रावे लागणार असते. दरम्यान, केशवला जया (भूमी पेडणेकर) जी एक शिक्षित, फॉरवर्ड युवती असते. अन्यायाविरोधात आवाज उठवणाऱ्या जयावर केशव फिदा होतो. केशव तिचा पिच्छा पुरवतो. अखेर ती त्याच्याशी लग्न करायला तयार होते. पंडितजींच्या अटींवर केशव तोडगा काढतो. जयासाठी एक रबर अंगठा करून घेतो. पण, लग्नानंतरही त्याच्या आयुष्यात तिचे प्रेम नसतेच. सासरी आल्यानंतर जयाला कळते की, घरी शौचालय नाही. रोज सकाळी गावातल्या बायका ‘लोटा पार्टी’साठी गावाबाहेरच्या शेतात शौचासाठी जातात.
शिवाय, घरात शौचालय बांधण्यासाठी सासऱ्यांचा नकार असतो. नवी नवरी असल्याने ती शौचालय बांधून घेण्यासाठी बराच प्रयत्न करते. केशवही तिला कधी कुणाच्या घरी, शेतात, रेल्वेमध्ये शौचासाठी घेऊन जात असतो. मात्र, जयाला कळते की, हा प्रॉब्लेम असा सुटणार नाही. घरी शौचालय होणार नसेल तर तिचे या घरात राहणे मुश्किल आहे, हे कळून ती माहेरी निघून जाते. मग इथून सुरू होते केशवची खटपट. आधी पंचायत, मग सॅनिटेशन डिपार्टमेंट, पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन, स्वत:च टॉयलेट बांधण्याचा प्रयत्न, अखेर घटस्फोटाचे पेटीशन हे सगळे प्रयत्न तो करतो. अखेर जयाला तिचे शौचालय बांधून मिळते.
चित्रपट अखेरपर्यंत कथानक सभ्यता, संस्कृती आणि लाज यावर बरेच संदेश देतो. चित्रपटाचा उद्देश थेट असून आपल्या संदेशाशी चित्रपट एकनिष्ठ पण आहे. चित्रपटाचा उत्तरार्ध हा बळजबरीने संपवल्यासारखा वाटतो. तसेच अक्षयकुमार नेहमीप्रमाणे प्रेक्षकांचे हृदय जिंकतो तर भूमीही सक्षमपणे तिची भूमिका पार पाडते. आपल्या देशाचे खरे चित्र, लोकांचा अशिक्षितपणा आणि धर्म-रिती-रूढीपायी केलेला अविचार हा चित्रपट खुप उत्कृष्टपणे दर्शवतो.