Hrudayat Something Something Marathi Movie Review: हृदयाला भिडत नाही
By प्राजक्ता चिटणीस | Published: October 5, 2018 04:47 PM2018-10-05T16:47:09+5:302023-08-08T19:28:38+5:30
हृदयात समथिंग समथिंग या चित्रपटात अनिकेत विश्वासराव, स्नेहा चव्हाण, प्रियंका जाधव, अशोक सराफ व भूषण कडू हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत.
- प्राजक्ता चिटणीस
प्रेमात आणि युद्धात सगळे काही माफ असते असे म्हटले जाते. एखादी मुलगी आवडल्यानंतर तिला पटवण्यासाठी काहीही करायला तयार असणाऱ्या मुलाची कथा हृदयात समथिंग समथिंग या चित्रपटात पाहायला मिळते. गोलमाल या जुन्या चित्रपटातील जुळ्या भावाचा फॉर्म्युला देखील या चित्रपटात वापरला आहे. पण त्यात एक वेगळाच ट्विस्ट प्रेक्षकांना या चित्रपटात पाहायला मिळतो.
समीर (अनिकेत विश्वासराव) प्रिया (स्नेहा चव्हाण) ला पाहताच क्षणी तिच्या प्रेमात पडतो. पण तिच्या समोर आपले प्रेम कसे व्यक्त करायचे हे त्याला कळत नसते. यात त्याला त्याचा बॉस (अशोक सराफ) मदत करतो. बॉस त्याला अनेक आयडिया देतो. त्यामुळे प्रिया देखील समीरच्या प्रेमात पडते. पण या दोघांचे प्रेम प्रकरण सुरू झाल्यावर समीरला कळते की प्रिया त्याच्या बॉसचीच मुलगी आहे. हे कळल्यावर प्रिया आणि समीर दोघांना पण आश्चर्याचा धक्का बसतो. वडिलांशी ते दोघे खोटे बोलायचे ठरवतात आणि त्यांना लग्नासाठी तयार करण्यासाठी एक बेत आखतात. प्रियाचे वडील लग्नासाठी तयार होतात का, या सगळ्यात काय धमाल मस्ती होते हे प्रेक्षकांना हृदयात समथिंग समथिंग हा चित्रपट पाहिल्यावरच कळेल.
या चित्रपटाच्या कथेत काहीही नावीन्य नसल्याने हा चित्रपट प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यात अपयशी ठरतो. चित्रपटात पुढे काय होणार याची आधीच कल्पना येत असल्याने पुढे काय होणार याची उत्सुकता लागत नाही. चित्रपटातील काही दृश्य चांगली जमून आली आहेत. आपली आजी वारली आहे ही थाप समीर त्याच्या बॉसला मारतो, त्यावेळेचे दृश्य नक्कीच खळखळून हसवते. अशोक सराफ यांनी नेहमी प्रमाणेच या चित्रपटात देखील अफलातून काम केले आहे. अनिकेत विश्वासरावने चांगले काम केले असले तरी काही दृश्यात तो अभिनय ओढून ताणून करत असल्याचे जाणवते. भूषण कडू, स्नेहा चव्हाण, प्रियांका जाधव यांनी आपल्या भूमिकांना योग्य न्याय दिला आहे. चित्रपटात अनेक गाणी असली तरी एकही गाणे ओठावर रुळत नाही. तसेच चित्रपटाची लांबी जास्त असल्याचे जाणवते. मध्यंतरानंतर चित्रपट उगाचच ताणला आहे. चित्रपटाचा शेवट तर ओढूनताणून करण्यात आला आहे. शेवटी हास्य निर्मिती करण्यासाठी अनेक पात्रांना एकत्र आणत चांगलाच गोंधळ घालण्यात आला आहे. पण या गोंधळामुळे देखील विनोद निर्मिती होत नाही.