Ittefaq Movie Review : ‘नो थ्रील, नो सस्पेन्स’
By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2017 10:35 AM2017-11-03T10:35:04+5:302023-08-08T19:16:16+5:30
सिद्धार्थ मल्होत्रा, सोनाक्षी सिन्हा आणि अक्षय खन्ना यांच्या मुख्य भूमिकेतील ‘इत्तेफाक’ या सस्पेन्स थ्रिलरपटाने प्रेक्षकांची साफ निराशा केली.
सिद्धार्थ मल्होत्रा, सोनाक्षी सिन्हा आणि अक्षय खन्ना यांच्या मुख्य भूमिकेतील ‘इत्तेफाक’ या सस्पेन्स थ्रिलर चित्रपटाच्या प्रदर्शित होण्याची गेल्या कित्येक दिवसांपासून चाहते वाट पाहत होते. अखेर चित्रपट रिलीज झाला. मात्र, या सस्पेन्स थ्रिलरपटाने प्रेक्षकांची साफ निराशा केली. तब्बल तीन तास हा चित्रपट पडद्यावर पाहणं प्रेक्षकांसाठी खूप बोअरिंग काम आहे. हा चित्रपट जेवढा थ्रिलिंग असायला हवा होता, तेवढा तो अधिक कंटाळवाणा झाला आहे.
१९६९ मध्ये रिलीज झालेल्या राजेश खन्ना आणि नंदा यांच्या मुख्य भूमिकेतील ‘इत्तेफाक’ चित्रपटाचा हा रिमेक आहे. राजेश-नंदा यांच्यामधील जी केमिस्ट्री, थ्रिल, सस्पेन्स प्रेक्षकांनी अनुभवली होती, ती कुठेतरी सिद्धार्थ आणि सोनाक्षी यांच्या अभिनयातून हरवताना दिसली. जुन्या ‘इत्तेफाक’ मध्ये पडद्यावर अनुभवायला मिळणारा सस्पेन्स प्रेक्षकांना आवडला. मात्र, सिद्धार्थ-सोनाक्षी हे तो सस्पेन्स टिकवून ठेवण्यात अपयशी ठरले.
सिद्धार्थ-सोनाक्षीच्या ‘इत्तेफाक’चे कथानक खूपच संभ्रमात टाकणारे आहे. कथानक कधी विक्रम सेठी (सिद्धार्थ मल्होत्रा) च्या दृष्टीकोनातून पुढे सरकते, तर कधी माया (सोनाक्षी सिन्हा)च्या आवाजातून सुरू राहते. हे दोघे कमी काय म्हणून देव वर्मा (अक्षय खन्ना) या केसचा छडा लावताना त्याच्या दृष्टीने कथानकाला वेग येतो.
चित्रपटाच्या सुरूवातीला, पत्नी कॅथरिनचा खुन झाला म्हणून पळत सुटलेल्या विक्रम सेठीच्या मागे पोलिस लागतात. पळता पळता तो एका बिल्डींगमध्ये घुसतो आणि पर्यायाने मायाच्या घरात. त्याचबरोबर आणखी एक खून झालेला असतो तो म्हणजे मायाच्या पतीचा. खुनाच्या आरोपाखाली विक्रमला पोलिस पकडतात. इन्स्पेक्टर देव या केसचा छडा लावण्यास सुरूवात करतो.
केसचा छडा लावण्याची पद्धत प्रेक्षकांना संभ्रमात पाडते. त्या रात्री काय झालं हे प्रत्येकाच्या दृष्टीकोनातून प्रेक्षकांना दाखवण्यात येते. कथानक पुढे सरकत असताना चित्रपट अधिकाधिक कंटाळवाणा होत जातो. मध्यांतरानंतर केसच्या बाबतीत काही शक्यता उघडकीस येतात. पण, थोडक्यात काय तर चित्रपट खूप बोअरिंग आहे. कथानक इंटरेस्टिंग नसल्याने अभिनयावर देखील त्याचा परिणाम होतो. सिद्धार्थ आणि सोनाक्षी यांचा अभिनयही फार काही प्रभावी नाही. अक्षय खन्नाने पोलिसाची भूमिका उत्तमरितीने साकारली आहे. पण, तरीही त्याचा अभिनय चित्रपटाला तारणहार ठरू शकत नाही.