जाऊंद्याना बाळासाहेब
By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2016 05:55 PM2016-10-08T17:55:08+5:302023-08-08T19:16:16+5:30
जाऊंद्याना बाळासाहेब
राज चिंचणकर
चित्रपटाच्या शीर्षकातच काहीतरी वेगळेपण असल्याचा आभास निर्माण केला की त्याचे आकर्षण वाढते हा मुद्दा अचूक असला; तरी हे वेगळेपण चित्रपटात नेमकेपणाने परावर्तित झाले आहे की नाही हे पाहण्याची जबाबदारीही त्यासोबत येते. 'जाऊंद्याना बाळासाहेब' या शीर्षकावरून कसलाच अर्थबोध होत नसल्याने वास्तविक त्यातली उत्सुकता चाळवते. साहजिकच, चित्रपटात नक्की काय आहे हे पाहण्याची इच्छाही बळावते. अशी इच्छा निर्माण करण्याचा प्रयन्त या चित्रपटाने केला असला; तरी एकंदर चित्रपट अनुभवताना मात्र यात चित्रपट कमी आणि 'नाटकं'च जास्त केल्याचे स्पष्ट होते.
माजी आमदार अण्णासाहेब मारणे यांचा मुलगा बाळासाहेब याला राजकारणात रस नसतो. तो त्याच्या मित्रांमध्येच अधिक रमलेला असतो. छोटे छोटे उद्योगधंदे करणारा विकास, इलेक्ट्रिशियन असलेला झटक्या आणि लेखक असलेला जीवन हे त्याचे मित्र असतात. माजी आमदाराचा मुलगा आपला मित्र असल्याचा फायदा ते उठवत असतात. जीवनला अभिनयाची आवड असल्याने बाळासाहेबाकडून पैसे घेऊन तो एका कार्यशाळेत दाखल होतो. त्याच्यापाठोपाठ विकास आणि बाळासाहेबही तिथे पोहोचतात. तिथे त्यांना उर्मी ही युवती भेटते आणि तिच्या बोलण्याने बाळासाहेब प्रभावित होतात. एकाक्षणी उर्मी त्यांची कानउघाडणी करते आणि तिथून बाळासाहेबांच्या आयुष्याला कलाटणी मिळते. पुढे हे तिघे मित्र गावातल्या मित्रमंडळींना घेऊन एक नाटक बसवतात आणि हा चित्रपट नाटकाचे बेअरिंग घेत पुढे सरकतो.
चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद, दिग्दर्शन आणि प्रमुख भूमिका अशी सगळी सूत्रे गिरीश कुलकर्णी यांनी एकट्याच्या हातात ठेवली आहेत; परंतु बहुधा त्याचमुळे हा भार त्यांना जड झाला असावा. कथेतून नक्की काय सांगायचे आहे, तिथेच बराच गोंधळ आहे आणि हा गोंधळ चित्रपटाच्या शेवटापर्यंत कायम राहिला आहे. बाळासाहेबांना एकीकडे राजकारणात वेगळी मांडणी करायची असते, मध्येच ते नाचगाणे करणाऱ्या बाईच्या नादी लागलेले दिसतात, कार्यशाळेत ते उर्मीच्या प्रेमात पडतात. तर दुसरीकडे, करिष्मा ही युवती त्यांच्या प्रेमात पडलेली दिसते. एवढेच नव्हे; तर काही संबंध नसताना ते व त्यांची मित्रमंडळी थेट नाटक बसवायला घेतात. नाटक म्हणजे काय याचा गंधही नसताना विकास थेट नाटकाचा दिग्दर्शक वगैरे होतो, तर इतर मित्र चक्क या नाटकात अभिनय वगैरे करायला लागतात; अशा बऱ्याच पचनी न पडणाऱ्या गोष्टी चित्रपटात ठासून भरल्या आहेत. परिणामी, एकाचवेळी अनेक ठिकाणी पाय ठेवल्यावर जे काही होईल, ती गत या कथेची झाली आहे. एका ना धड भाराभार चिंध्या असा हा एकंदर मामला आहे. चित्रपटात बाळासाहेब या व्यक्तिरेखेला नक्की काय म्हणायचे आहे; ते शेवटपर्यंत समजत नसल्याने हा सावळागोंधळ अधिकच वाढतो. कुठल्याही निष्कर्षावर ही कथा येत नाही. संगीतकार अजय-अतुल यांनी चित्रपटातली गाणी दमदार वाजवली असली; तरी त्यांचे प्रयोजन काय ते नक्की समजत नाही. फक्त चित्रपटाने पेललेला विनोदी ढंग हीच काय ती जमेची बाजू म्हणायला लागेल. विनोदाचा हा तडका जरा हटके आहे आणि त्यामुळे चित्रपट थोडाबहुत सुसह्य होतो.
अभिनयाच्या पातळीवर मात्र हा चित्रपट वरची पातळी गाठतो. यात बाळासाहेबांची प्रमुख भूमिका गिरीश कुलकर्णी यांनी अफलातून साकारली आहे आणि केवळ त्यांच्या या अदाकारीवर चित्रटपटाचा जीव तगला आहे. श्रीकांत यादव (विकास), भाऊ कदम (झटक्या) व किशोर चौघुले (जीवन) या तिघांची चांगली कामगिरी चित्रपटात दिसते. तर, सई ताम्हणकर (करिष्मा) व मनवा नाईक (उर्मी) या दोघी भाव खाऊन जातात. मोहन जोशी (अण्णासाहेब), रीमा (आई) आदींच्या भूमिका ठीक आहेत. एकंदरीत, चित्रपटाने ठोस असे काही मांडले असते, तर या बाळासाहेबांना कुठे जाऊ देण्याऐवजी येण्याचे निमंत्रण आनंदाने देता आले असते.