Jolly llb 2 movie review : ‘जॉली एलएलबी2’: एक निराश करणारा ‘खटला’!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2016 12:00 PM2016-12-09T12:00:07+5:302023-08-08T19:47:32+5:30

'जॉली एलएलबी’ या 2013 च्या सुपरहिट सिनेमा ‘जॉली एलएलबी 2’ सिक्वेल आहे.

Jolly LLB 2 movie review: 'Jolly LLB 2': A disappointed 'suit'! | Jolly llb 2 movie review : ‘जॉली एलएलबी2’: एक निराश करणारा ‘खटला’!

Jolly llb 2 movie review : ‘जॉली एलएलबी2’: एक निराश करणारा ‘खटला’!

Release Date: February 10,2017Language: हिंदी
Cast: अक्षय कुमार, हुमा कुरैशी,अनु कपूर,सौरभ शक्ला,अर्शद वारसी , एलि अवराम
Producer: फॉक्स स्टार स्टुडिओDirector: सुभाष कपूर
Duration: 2 तासGenre:
लोकमत रेटिंग्स
ong>जान्हवी सामंत

सन २०१३ मध्ये आलेला  ‘जॉली एलएलबी’ हा सिनेमा प्रचंड गाजला होता. अर्शद वारसी याची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटात न्यायालयीन व्यवस्थेवर प्रखर भाष्य करण्यात आले होते. खºयाचे खोटे आणि खोट्याचे खरे करायला लावणारा वकीली व्यवसाय, या व्यवसायातील डावपेच, प्रतिष्ठेचा खेळ शिवाय यामुळे लांबणारा न्याय असे सगळे वास्तव यात दाखवले होते. अर्शद वारसीने साकारलेला जगदीश त्यागी हा वकील या चित्रपटात चांगलाच भाव खावून गेला होता. याच  चित्रपटाचा सीक्वल ‘जॉली एलएलबी2’ आज चित्रपटगृहांत रिलीज झाला. फरक एवढाच की, यातीज जगदीश त्यागीची जागा जगदीश्वर मिश्रा या वकीलाने घेतली आहे. बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार यात जगदीश्वर मिश्रा या वकीलाच्या भूमिकेत आहे.
 खरे तर, कोटरूम ड्रामा पाहणे नेहमीच इंटरेस्टिंग असते. कदाचित म्हणूनच कोटरूम ड्रामा पाहायला बॉलिवूडप्रेमींना कायम आवडत आले आहे.  ‘जॉली एलएलबी’ हा कोर्ट रूम ड्रामा लोकांना प्रचंड आवडला होता.  वकील पेशात स्वत:चे स्थान निर्माण करण्यासाठी झगडणारा एक ‘जुगाडू’ वकील, सनकी न्यायाधीश, कोर्टरूममधला हसायला भाग पाडणारा युक्तिवाद आणि सर्वसामान्याच्या बुद्धीला पटेल असे कथानक शिवाय खुसखुशीत, हलके-फुलके संवाद  असा सगळा मसाला असलेला ‘जॉली एलएलबी’ प्रेक्षकांना प्रचंड भावला होता. या कसोटीवर मापल्यास ‘जॉली एलएलबी2’  काहीसा उणा ठरतो.
‘जॉली एलएलबी2’ ही कथा आहे जगदीश्वर मिश्रा ऊर्फ जॉली(अक्षय कुमार) या बीए, एलएलबी झालेल्या कानपूरस्थित एका वकीलाची.  एक नामांकित वकील बनण्याच्या महत्त्वाकांक्षेने पछाडलेला जॉली करिअरसाठी झगडत असतो. याचदरम्यान पतीच्या सुटकेसाठी सैरभैर झालेली एका गरिब महिला हिना(सयानी गुप्ता) हिची केस जॉलीकडे चालून येते. आॅफिस खरेदी करायला पैसे हवे असतात म्हणून जॉली खोटे बोलून ही केस घेतो पण ती लढायची त्याची तयारी नसते. अखेर न्याय न मिळाल्याने ती गरिब महिला आत्महत्या करते. या आत्महत्येने जॉली हादरून जातो.   यानंतर या केसमध्ये इक्बाल कासिम(मानव कौल), इन्स्पेक्टर सिंह (कुमुद मिश्रा) या पात्रांची एन्ट्री होते.   ही केस जॉलीचे अख्खे आयुष्य बदलून टाकते.  या केसच्या निमित्ताने काही भ्रष्ट पण प्रभावशाली लोकांशी जॉलीचा सामना होतो.
हा सामना पाहताना वारंवार अर्शद आठवतो. याचे मुख्य कारण म्हणजे, अक्षय कुमार ‘जुगाडू’ जॉलीच्या भूमिकेत फारसा फिट होताना दिसत नाही. एका लहान शहरातला सामान्य वकील न दिसता यातला जॉली जरा जास्तच ग्लॅमरस आणि जास्तच नीटनेटका दिसतो. चित्रपटाचा प्लॉट अक्षयच्या स्टार स्टेटसशी मॅच करण्याचा दिग्दर्शकाचा खटाटोपही लपून राहत नाही. यातील डिस्को होली साँगसह काही रोमॅन्टिक गाणी अनावश्यक आणि कथेशी विसंगत वाटतात.
चित्रपटाची सुरुवात बरीच आश्वासक वाटते. पण  कथा जशी पुढे सरकते, तसे चित्रपटात फारसा दम नसल्याचे कळून चुकते. न्यायाधीश सुंदर लाल त्रिपाठी(सौरभ शुक्ला) याचा ‘शानदार’मधील ‘गुलाबो’वर डान्स, वकील माथूर(अन्नू कपूर)याच्या तोंडचे आलिया भट्टबद्दलचे प्रशंसोद्गार (आलिया भट्ट ही महेश भट्टचे भारतीय सिनेमातील एकमेव योगदान आहे) शिवाय ‘दामिनी’ या चित्रपटातील सनी देओल वरचे काही विनोदी संवाद यापलीकडे या चित्रपटाच्या पटकथेत फार काही विशेष जाणवत नाही.
अक्षय कुमारने यात नेहमीप्रमाणे एक भावनाप्रधान हिरो साकारला आहे. मात्र घरी भाजी-पोळी बनवणारा, पत्नीसाठी विस्कीचा पेग बनवणारा आणि तिच्या डिझाईनर ड्रेसेच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी धडपडणारा अक्षय ‘जॉली’ म्हणून  या रिअ‍ॅलिस्टिक चित्रपटात पूर्णपणे बनावटी वाटतो. हुमा कुरेशी या चित्रपटात का आहे, हाही प्रश्न पडतो. अगदी परखडपणे सांगायचे तर,  हुमा कुरेशीने या भूमिकेसाठी आपला वेळ आणि ऊर्जा वाया घालवली, असेच वाटते. ग्लॅमरस दिसण्यापलीकडे, ड्रिंक करण्यापलीकडे आणि डिझाईनर ड्रेसची मागणी करण्यापलीकडे हुमाच्या वाट्याला या लहानशा कथेत काहीच आलेले नाही. महिलांना पडद्यावर ड्रिंक करताना किंवा फॅन्सी कपडे घालून मिरवताना दाखवणे म्हणजेच स्वातंत्र्य, हेच भारतातील आधुनिक दिग्दर्शकांना अभिप्रेत आहे का? असा विचार हुमाला पाहून हटकून मनात येतो. प्रत्यक्षात हुमाचे हे पात्र या कथेत का घुसवले, हेच कळत नाही. थोडक्यात साांगयचे तर, एका वास्तव कथेत अनावश्यक पात्र व प्रसंगांची भरती आणि आवश्यक त्या ऊर्जेची कमतरता यामुळे हा चित्रपट बराच निराशा करतो.

 

Web Title: Jolly LLB 2 movie review: 'Jolly LLB 2': A disappointed 'suit'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.