Judgementall Hai Kya Review : कंगना-राजकुमारचा उत्कंठावर्धक थरार
By गीतांजली | Published: July 26, 2019 02:40 PM2019-07-26T14:40:48+5:302023-08-08T19:47:32+5:30
. ट्रेलर सुरुवातीपासून अखेरपर्यंत कन्फ्युजन आणि कन्फ्युजनने भरलेला असल्याने ही उत्सुकता आणखी ताणली गेली होती, ती आज संपली.
गीतांजली आंब्रे
कंगना राणौतचा 'जजमेंटल है क्या’ची घोषणा झाल्यापासूनच हा सिनेमा चर्चेत होता. कधी सिनेमाच्या शीर्षकावरुन तर कधी कंगनाच्या वादग्रस्त वागण्यावरुन वादात अडकला. दोघांचे फॅन्स या सिनेमाची वाट मोठ्या आतुरतेने पाहात होते आणि ट्रेलरने ती आणखी वाढवली. ट्रेलर सुरुवातीपासून अखेरपर्यंत कन्फ्युजन आणि कन्फ्युजनने भरलेला असल्याने ही उत्सुकता आणखी ताणली गेली होती, ती आज संपली.
ही गोष्ट आहे एक्यूट सायकोसिसची शिकार असलेल्या बॉबी (कंगना राणौत) ची. जिच्या लहानपणी घडलेल्या काही घटनांचा तिच्या मनावर परिणाम होत जातो. बॉबी एक डबिंग आर्टिस्ट असते ती साउथच्या हॉरर सिनेमासाठी डबिंग करत असते. बॉबी ज्या भूमिकेला आवाज देते ती त्या भूमिकेत वावरू लागते. तिच्या याच सवयीमुळे तिला 3 महिने मनोरुग्णालयात देखील जावं लागते. यानंतर बॉबीच्या बंगल्यात केशव (राजकुमार राव) आणि त्याची पत्नी रीमा (अमायरा दस्तुर) हे भाड्याने राहायला येतात. बॉबी केशवकडे आकर्षित होत असतानाच तिला त्याच्या काही संशयास्पद हालचाली दिसू लागतात. एके दिवशी अचानक रीमाचा मृत्यू होतो. बॉबी पोलिसांना सांगण्याचा प्रयत्न करते हा खून केशवनेच केला आहे. तर तिकडे केशव पोलिसांना बॉबी मनोरुग्ण असल्याचे सांगतो आणि तिच्यावर आरोप लावतो. पोलिस ही केस अपघाती मृत्यूची नोंद करत बंद करतात. हा खून कोण आहे की अपघाती मृत्यू? जर हा खून आहे तर तो कोणी केला? बॉबी की केशवने ? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण शोधत असतानाच सिनेमात आणखी एक नवा ट्विस्ट येतो ज्यासाठी केशव आणि बॉबी दोघेही तयार नसतात. तो कोणता हे तुम्हाला सिनेमा पाहिल्यावरच कळेल.
तनू वेड्स मनू, क्वीन, आणि मणिकर्णिका सिनेमांप्रमाणे या सिनेमातही कंगनाचा अभिनय लाजवाब आहे. कंगनाने उभा केलेल्या बॉबीच्या भूमिकेला तोड नाही. एक्यूट सायकोसिसने आजारी असलेल्या बॉबीची भूमिका कंगनाने अतिशय सशक्तपणे पडद्यावर साकारली आहे. ती या भूमिकेत अतिशय सहजपणे वावरली आहे. या सगळ्यात सरप्राईज पॅकेज ठरला तो राजकुमार राव. राजकुमारने साकारलेल्या केशवच्या भूमिकेला तोड नाही. अनेक सीन्समध्ये तो भाव खाऊन जातो. केशवच्या भूमिकेतील विविध शेड्स राज कुमारने यशस्वीरित्या उतरवल्या आहेत. सिनेमाचा पुर्वाध सस्पेन्स आणि थ्रिलरने भरलेला आहे. सिनेमाचा उत्तरार्ध थोडासा लांब होतोय असा वाटत असताना सिनेमा पुन्हा आपली पकड घेतो. सिनेमात रामायणाचा प्रतिकात्मकरित्या केलेल्या वापर करुन हा सिनेमा आणखी भक्कम झाला आहे. जिमी शेरगील आणि हुसैन दलाल याच्या वाटेला जरी लहान भूमिका आली असल्या तरी त्यांनी त्या चोख बजावल्या आहेत. प्रकाश कोवेलामुडी यांनी दिग्दर्शनाची जबाबदारी उत्तमरित्या पार पडली आहे. सिनेमा सुरुवातीपासून शेवटपर्यंत तुम्हाला खिळवून ठेवण्यात यशस्वी होतो. तुमचं लक्ष सिनेमातून विचलित होणार नाही याची जबाबदारी लेखिकेने चोख बजावली आहे. सिनेमाचे संवाद अतिशय दमदार लिहिले आहेत. तनिष्क बाग यांचे संगीत सिनेमाला चारचांद लावणारे ठरले आहे. सिनेमा खूपच कलरफुल आहे त्यामुळे सिनेमेटोग्राफरचे कौतूक करावेच लागेल. कंगना रानौत व राजकुमार राव यांच्या अभिनयाची जुगलबंदी पाहण्यासाठी हा सिनेमा एकदा नक्की पहा.