Kaabil movie review : हृतिक रोशन तारीफ के 'काबिल'
By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2016 03:10 PM2016-11-03T15:10:06+5:302023-08-08T19:16:16+5:30
हृतिक रोशन आणि यामी गौतम यांचा काबिल हा चित्रपट प्रेक्षकांना नक्कीच खिळवून ठेवेल यात काही शंका नाही. हृतिकच्या आजवरच्या परफॉर्मन्सपैकी हा एक चांगला परफॉर्मन्स आहे. राकेश रोशन आणि हतिकची जोडी कहो ना प्यार है, कोई मिल गया, क्रिशनंतर नक्कीच एक हिट चित्रपट देणार आहे.
हृतिक रोशनने कहो ना प्यार है या चित्रपटाद्वारे त्याच्या कारकिर्दीला सुरुवात केली. या चित्रपटाची निर्मिती राकेश रोशनने केली होती. त्यानंतर क्रिश, कोई मिल गया यांसारखे अनेक हिट चित्रपट या जोडीने दिले. हृतिकसाठी राकेश रोशन आणि 'क' या अक्षराने चित्रपटाची सुरुवात होणे या दोन गोष्टी लकी आहेत असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. या दोन लकी चार्मचा समावेश असलेला काबिल हा चित्रपट हृतिकच्या आजवरच्या कारकिर्दीतील एक अतिशय चांगला चित्रपट आहे असे म्हटले तर नक्कीच चुकीचे ठरणार नाही.
आपल्यात असलेल्या वीक पॉईंटला प्लस पॉईंट कसे बनवायचे असा आपण नेहमीच विचार करत असतो, काबिल या चित्रपटातील नायकदेखील आपल्यात असलेल्या कमजोरीला प्लस पॉईंट बनवतो आणि आपल्यावर ज्यांनी अन्याय केला त्यांचा बदला घेतो. बदल्याची कथा आपल्याला आजवर बॉलिवूडच्या अनेक चित्रपटात पाहायला मिळाली आहे. पण काबिलची अतिशय चांगल्या प्रकारे केलेली मांडणी ही या चित्रपटाची जमेची बाजू आहे.
एका अंध जोडप्याची हृदयस्पर्शी प्रेमकथा आपल्याला काबिल या चित्रपटात पाहायला मिळते. रोहित (हृतिक रोशन) आणि सुप्रिया (यामी गौतम) दोघांनाही दिसत नसते. पण तरीही ते दोघेही आपल्या आयुष्याचा आनंद घेत असतात. एका ओळखीच्या व्यक्तीकडून त्यांना एकमेकांचे स्थळ येते. पहिल्याच भेटीत दोघांनाही आपण एकमेकांचे जोडीदार होऊ शकतो याची जाणीव होते आणि ते दोघे लग्न करण्याचा निर्णय घेतात. सगळे काही सुरळीत सुरू असताना पण शेलार (रोनित रॉय) या नगरसेवकाच्या भावाची, अमितची (रोहित रॉय) नजर सुप्रियावर पडते आणि रोहित घरात नसताना तो एका मित्राच्या मदतीने तिच्यावर बलात्कार करतो. पोलीसांच्या मदतीने नगरसेवक हे प्रकरण दाबतो. आपल्याला न्याय मिळणार नाही याची जाणीव रोहित आणि सुप्रियाला होते. त्यामुळे या सगळ्यातून रोहित आणि सुप्रिया स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करत असतात. पण त्याचवेळी सुप्रियावर अमित आपल्या मित्रासोबत परत एकदा बलात्कार करतो. अमित या गोष्टीची आता सतत पुनरावृत्ती करणार या भीतीने सुप्रिया आत्महत्या करते आणि तिथून सुरु होते एका सुडाची कथा. सुप्रियाच्या मृत्युनंतर रोहित अमित, अमितचा मित्र आणि शेलार यांना संपवण्याचे ठरवतो आणि त्यांच्याशी कशाप्रकारे बदला घेतो हे प्रेक्षकांना काबिलमध्ये पाहायला मिळते.
प्र
आपल्या आजूबाजूला अंध व्यक्ती पाहिल्यानंतर आपण अनेकवेळा नकळत त्यांचे निरीक्षण करतो. त्यांना दृष्टी नसूनदेखील ते अनेक गोष्टींमध्ये आपल्यापेक्षा सरस असतात. त्यांची श्रवणशक्ती, त्यांचे सिक्स सेन्स खूप चांगले असते. त्यामुळे काबिल पाहताना रोहित अंध असूनही एखादी गोष्ट कशाप्रकारे करतो याचे आपल्याला अप्रूप वाटत नाही. पावलांच्या आवाजावरून समोरून कोण येतेय हे ओळखणे किंवा समोरच्याचा श्वासावरून त्याला ओळखणे या गोष्टी खऱ्या वाटतात. आपण कमजोर असल्याने शक्तीने बदला घेऊ शकत नाही याची त्याला कल्पना असते त्यामुळे तो युक्तीने बदला घ्यायचे ठरवतो. तो एक व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट असल्याने तो आपल्या या गुणाचा वापर करून एक खेळ रचतो आणि सगळ्यांना आपल्या सापळ्यात अडकवतो. दिग्दर्शक संजय गुप्ताने ही गोष्ट पडद्यावर खूपच चांगल्या रितीने मांडली आहे.
हृतिकचे काम अफलातून आहे. त्याच्या आजवरच्या परफॉर्मन्सपैकी हा एक चांगला परफॉर्न्स आहे. या चित्रपटात हृतिकचे नृत्यकौशल्यदेखील प्रेक्षकांना पाहायला मिळते. तसेच यामी गौतम चित्रपटात अतिशय सुंदर दिसली आहे. यामी आणि हृतिकची केमिस्ट्री छान जुळून आली आहे. यामीचा अभिनेयदेखील चांगला आहे. रोनीत रॉय एक चांगला अभिनेता असल्याचे त्याने उडानसारख्या चित्रपटातून दाखवून दिले आहे. या चित्रपटातही त्याने शेलार हा खलनायक खूपच ताकदीने रंगवला आहे. रोहित रॉयने देखील अमित या भूमिकेला योग्य न्याय दिला आहे. गिरीश कुलकर्णी या चित्रपटात एक सरप्राइज पॅकेज म्हणून समोर येतो. त्याच्या अभिनयाला दाद देणे गरजेचे आहे. तसेच नरेंद्र झानेदेखील चांगले काम केले आहे.
संजय मासूम यांनी चित्रपटाचे संवाद खूपच चांगल्याप्रकारे लिहिले आहेत. "तुम कितने सालो से खाकी खाकी खेल रहे हो, तो में भी कितने सालो से खादी खादी खेल रहा हूँ हा संवाद नक्कीच प्रेक्षकांच्या टाळ्या मिळवून देईल. चित्रपटातील अनेक संवाद मनाला भिडतात. त्यासाठी संवादलेखकाचे कौतुक केलेच पाहिजे.
या चित्रपटातील सगळीच गाणी श्रवणीय आहेत. सारा जमाना या गाण्यावर तुमचे पाय थिरकल्याशिवाय राहणार नाहीत हे तर नक्की. तेरे काबिल हूँ... या काबिल नही यांसारखी सगळीच गाणी ओठावर रुळतात. राजेश रोशन यांच्या संगीताने पुन्हा एकदा कमाल केली आहे.
मोहेंजोदडो हा चित्रपट फ्लॉप झाल्यानंतर हृतिकला हिटची गरज होती आणि आता काबिल त्याला हा हिट मिळवून देणार यात काही शंकाच नाही.