Kaamyaab Movie Review : चरित्र कलाकारांचा वंचित प्रवास
By तेजल गावडे | Published: March 5, 2020 10:00 AM2020-03-05T10:00:00+5:302023-08-08T20:09:54+5:30
- तेजल गावडे चित्रपट म्हटलं की डोळ्यासमोर पहिले येतात ते नायक आणि नायिका. पण, नायक किंवा नायिकाचा मित्र असो ...
- तेजल गावडे
चित्रपट म्हटलं की डोळ्यासमोर पहिले येतात ते नायक आणि नायिका. पण, नायक किंवा नायिकाचा मित्र असो किंवा शत्रू, वा डॉक्टर, पोलिस, आई-वडील, भाऊ-बहिण आणि अशा सहाय्यक पण महत्त्वाच्या बऱ्याच भूमिका असतात ज्या चित्रपटात महत्त्वाची भूमिका बजावत असतात. या पात्रांच्या कामाची प्रशंसा तर होते पण त्यांची खरी ओळख ही मागेच राहते. कॅरेक्टर रोल करणारे हे कलाकार वर्षांनुवर्षे प्रेक्षकांचे मनोरंजन करत राहतात. पण हिरो हिरोईन्समुळे त्यांच्याकडे दुर्लक्ष केले जाते. अशाच चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका बजावणाऱ्या चरित्र कलाकारांवर दिग्दर्शक हार्दिक मेहता यांनी 'कामयाब' हा चित्रपट बनविला आहे.
या चित्रपटाची कथा एकेकाळी एकानंतर एक अशा बऱ्याच चित्रपटात काम केलेले चरित्र अभिनेते सुधीर (संजय मिश्रा) यांच्या अवतीभवती फिरते. ते एकटेच मुंबईतील एका जुन्या फ्लॅटमध्ये राहत असतात. एक दिवस एक पत्रकार त्यांची मुलाखत घेण्यासाठी त्यांच्या घरी येते. पत्रकाराच्या प्रश्नात सुधीर यांना अजिबात रस नसतो. तसेच त्यांना त्यांनी केलेल्या भूमिकांमध्येही इंटरेस्ट नसतो. मुलाखतीला सुरूवात तर होते पण ती काही कारणास्तव पूर्ण होत नाही. मात्र मुलाखत घेण्यासाठी आलेली पत्रकार त्यांना त्यांनी आतापर्यंत ४९९ चित्रपटात काम केल्याची जाणीव करून देते. जो खूप मोठा आकडा आहे. त्यानंतर त्यांच्या डोक्यात ४९९ हा आकडा ५०० करण्याची कल्पना तरळू लागते आणि ते पुन्हा एकदा सिनेइंडस्ट्रीत कमबॅक करण्यासाठी उत्सुक होतात. या त्यांच्या प्रवासात त्यांची साथ देतो साइड अॅक्टर ते कास्टिंग डिरेक्टर असा प्रवास करणारा गुलाटी (दीपक डोबरियाल). सुधीर यांचा ५०० व्या चित्रपटाचा प्रवास सोप्पा असतो की कठीण आणि त्यांचे हे स्वप्न पूर्ण होते की नाही, हे पाहण्यासाठी हा चित्रपट पाहावा लागेल.
दिग्दर्शक हार्दिक मेहता यांनी सहाय्यक भूमिका करणाऱ्या कलाकारांचा प्रवास, त्यांची व्यथा आणि त्यांच्याकडे फक्त प्रेक्षकांचाच नाही तर सिनेइंडस्ट्रीचा पाहण्याचा दृष्टीकोनही उत्तमरित्या रुपेरी पडद्यावर साकारला आहे. कॅरेक्टर रोल करणाऱ्या कलाकारांवर सिनेमा बनवण्याचे धाडस दाखवल्याबद्दल हार्दिक मेहता यांचे कौतूक करावे तेवढे कमीच आहे. इतकेच नाही तर त्यांनी लिलिपुट, विजू खोटे, अवतार गिल, मनमौजी, गुड्डी मारूती आणि बिरबल यांसारख्या जुन्या सहाय्यक भूमिका करणाऱ्या कलाकारांचा या चित्रपटात समावेश करून वास्तविकतेची जाणीव करून दिली आहे. चित्रपटातील काही सीन ८०-९०च्या दशकातील चित्रपटांची व पात्रांची आठवणही करून देतात. चित्रपटाचा उत्तरार्ध काही ठिकाणी संथ वाटतो. चित्रपटातील संवाद खूप छान झाले आहेत. जसे की एका सीनमध्ये सुधीर पत्रकाराला सांगतात की, 'साइड रोल करणाऱ्या कलाकारांना बटाटा असं संबोधले जाते. त्याला बच्चन, कपूर, कुमार असे कोणासोबतही मिसळू शकतो. प्रेक्षकांच्या मनावर फक्त हिरोच अधिराज्य गाजवितात, साइड कलाकार नाहीत.' चित्रपटाची सिनेमॅटोग्राफीदेखील चांगली झाली आहे. एडिटिंगमध्ये थोडी फार कमतरता जाणवते. चित्रपटात तीन गाणी आहेत जी कथेला साजेशी अशी आहेत. चित्रपटाचे बॅकग्राउंड स्कोअर मनावर छाप उमटवित नाही.
अभिनयाबद्दल सांगायचं तर संजय मिश्रा यांनी या चित्रपटात दमदार अभिनय केला आहे. त्यांनी चित्रपटात केलेल्या सहाय्यक भूमिकांच्या झलकसोबतच साकारलेले इतर हावभावही मनावर छाप उमटविण्यात यशस्वी ठरत आहेत. संपूर्ण चित्रपट संजय मिश्रा यांच्या भूमिकेवर आधारलेला असताना त्यांनी त्यांच्या अभिनय कौशल्याच्या जोरावर हा चित्रपट उत्तमरित्या पेलला आहे. तर दीपक डोबरियाल, ईशा तलवार, अवतार गिल, लिलिपुट या कलाकारांनी देखील चांगले काम केले आहे.
आतापर्यंत आपण फक्त मुख्य भूमिकेतल्या कलाकारांचा प्रवास आणि त्यांचा संघर्ष पाहिला आहे. सहाय्यक भूमिका करणाऱ्या कलाकारांचे काम आपल्याला बऱ्याचदा भावते. पण, आपण त्यांच्याबद्दल अनभिज्ञ असतो. अशा कलाकारांचा खडतर प्रवास, त्यांची व्यथा जाणून घेण्यासाठी हा चित्रपट एकदा तरी जरूर पहावा.