राजपाल यादवने मांडली जीवघेण्या खड्ड्यांची खरीखुरी गोष्ट! वाचा 'काम चालू है' सिनेमाचा रिव्ह्यू
By संजय घावरे | Published: April 20, 2024 06:27 PM2024-04-20T18:27:16+5:302024-04-20T18:28:12+5:30
Kaam Chalu Hai Review : कसा आहे राजपाल यादवचा 'काम चालू है' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
आज संपूर्ण देशात कुठे ना कुठे रस्त्यांचं काही ना काही काम सुरू आहे. शेकडो किलोमीटर लांबीचे महामार्ग बनत आहेत, पण त्यावर पडणाऱ्या खड्ड्यांकडे कोणाचंच लक्ष नाही. रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे वर्षाकाठी हजारो बळी जात आहेत, पण प्रशासन कुंभकर्णाच्या झोपेतून जागं व्हायला तयार नाही. अशावेळी स्वत: खड्डे बुजवण्यासाठी कंबर कसणाऱ्या सर्वसामान्य व्यक्तीची ही कथा आहे.
कथानक : हि कथा सांगलीमध्ये पत्नी आणि मुलीसोबत आनंदाने राहणाऱ्या मनोज पाटीलची आहे. शाळेत शिकणारी मनोजची मुलगी गुडीया अभ्यासात हुषार असतेच, पण कमालीची क्रिकेटही खेळत असते. एकीकडे शाळेतील मुख्याध्यापिका तिचं भविष्य उज्ज्वल असल्याचं सांगतात, तर दुसरीकडे क्रिकेट प्रशिक्षकांच्या मते ती लवकरच राज्यस्तरीय क्रिकेट खेळू शकणार असते. सारं काही सुरळीत सुरू असतं. एक दिवस शाळेतून घरी जाताना मनोजची स्कूटर रस्त्यावरील खड्ड्यात अडखळते आणि अपघात होतो. त्यानंतर काय घडतं ते सिनेमात आहे.
लेखन-दिग्दर्शन : कथा मन सुन्न करणारी आहे. या चित्रपटात केवळ एका मनोजची कथा आहे. देशात असे असंख्य मनोज आहेत, ज्यांचं दु:ख कधीच समोर येणार नाही की त्यांची हानीही भरून निघणार नाही. प्रशासनाला मात्र त्याच्याशी काहीच देणं-घेणं नाही. खऱ्याखुऱ्या कथेवर उत्कंठावर्धक पटकथा लिहिण्याची गरज होती. महाराष्ट्रातील गोष्ट असल्याने मुख्य भूमिकेत एखादा मराठी कलाकार असता तर खऱ्या अर्थाने मनाला भिडली असती. गुडीयाच्या क्रिकेटचा सराव फार त्रोटक दाखवला आहे. काही लांबलचक दृश्यांमध्ये कॅमेरा स्तब्ध राहतो. मराठमोळ्या वातावरणनिर्मितीचा अभाव जाणवतो. 'लय भारी...' गाणं चांगलं आहे.
अभिनय :राजपाल यादवने आपल्या परीने मनोजच्या व्यक्तिरेखेत जीव ओतण्याचा आटोकाट प्रयत्न केला आहे, पण त्याला पार्श्वसंगीत, कॅमेरा आणि दिग्दर्शनाची साथ लाभली नाही. त्याच्या देहबोलीत वारंवार दिसणारी विनोदी इमेजही ब्रेक होऊ शकलेली नाही. या तुलनेत जिया मानेकने आपली भूमिका छान मराठमोळा टच देत साकारली आहे. कुरांगी नागराजने चांगलं काम केलं असलं तरी क्रिकेट प्रशिक्षणावर आणखी मेहनत घेण्याची गरज होती.
सकारात्मक बाजू : वास्तवदर्शी कथा, अभिनय
नकारात्मक बाजू : पटकथा, दिग्दर्शन, सिनेमॅटोग्राफी, संकलन, वातावरणनिर्मिती, पार्श्वसंगीत
थोडक्यात काय तर कितीही प्रगती झाली तरी रस्त्यांवरील खड्डे बुजणारे नाहीत. जीवघेण्या खड्ड्यांची जबाबदारी घेणारं कोणी नसल्याने सर्वसामान्यांना कोणी वाली नाही. हे जाणण्यासाठी हा चित्रपट पाहायला हवा.