कान्हा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2016 11:25 AM2016-10-14T11:25:08+5:302023-08-08T19:16:16+5:30
राज चिंचणकर
गोकुळाष्टमीचे औचित्य साधत आलेला ‘कान्हा’ हा चित्रपट अवधूत गुप्ते यांचा आहे म्हटल्यावर जे चित्र डोळ्यांसमोर येईल; त्याला अजिबात तडा जाऊ न देण्याची खबरदारी या चित्रपटाने घेतली आहे. त्यांच्या दिग्दर्शनाची वैशिष्ट्ये यात ठासून भरली आहेतच; पण केवळ दहीहंडीच्या थरथराटापर्यंत विषयाची व्याप्ती मर्यादित न ठेवता, या सणाच्या अनुषंगाने येणारे वास्तव मुद्दे यात मांडल्याने या चित्रपटाचे वेगळेपण नजरेत भरते. मात्र त्याचबरोबर चित्रपटाला मनोरंजनाच्या पातळीवर नेताना यातल्या गोविंदाचे काही थर डळमळीत झाल्याचा अनुभवही येतो.
गोविंदाच्या अगदी वरच्या थरावर असलेला कान्हा हा छोटा गोविंदा उंचावरून खाली पडतो आणि चित्रपटाची गोष्ट आकार घेत जाते. नऊ थरांच्या गोविंदाचा विक्रम नावावर असलेल्या मंडळाचा रघू हा म्होरक्या आहे; तर अंगात गोविंदाची रग असलेल्या पथकाचा मल्हार हा लीडर आहे. या दोन पथकांमध्ये ठसन आहे आणि ते एकमेकांना कायम शह देण्याच्या प्रयत्नात असतात. कान्हाच्या अपघातानंतर वेगळेच चित्र रंगते आणि यात होणारा राजकीय हस्तक्षेप, हमरीतुमरी, स्पर्धा, अपमान, उद्वेग असे अनेक प्रकार समोर येत जातात. गोविंदांचे उंच थर, त्यांच्यावर असलेली नियमांची टांगती तलवार, या सणात घुसलेले राजकारण, दहीहंडीच्या नावाने लोणी मटकावणारे लोक, सच्च्या गोविंदाची परवड असे वास्तव प्रश्न यात कथा व पटकथाकार सचिन दरेकर आणि अवधूत गुप्ते यांनी मांडले आहेत. दिग्दर्शक अवधूत गुप्ते यांनी या प्रश्नांचे थर उभे करण्याचा चित्रपटातून प्रयत्न केला आहे. यातले काही प्रसंग अंगावर नक्कीच येतात आणि त्यातली सत्यताही पटते. मात्र काही प्रसंग साधारण पातळीवर रेंगाळत राहतात. राहुल जाधव यांचे छायांकन ही चित्रपटाची जमेची बाजू आहे. गोविंदांचा थरार आणि इतर प्रसंग त्यांच्या कॅमेºयाने अचूक टिपले आहेत. चित्रपटातली गाणी जमून आली आहेत. गश्मीर महाजनी (रघू) आणि वैभव तत्त्ववादी (मल्हार) या दोघांची ठसन पाहण्याजोगी आहे आणि त्यांनी ती धडाक्यात रंगवली आहे. या दोघांचा डॅशिंग अवतार खिळवून ठेवतो. गौरी नलावडेने यात गोविंदाची टॉमबॉईश भूमिका साकारत तडका दिला आहे. किरण करमरकर यांचा राजकारणी मधुभाई फर्मास वठला आहे. यात छोटीशी भूमिका रंगवणाºया म्हाताºया राऊळ आजी लक्षात राहतात. प्रसाद ओक, सुमेध वाणी आणि इतर कलावंतांची योग्य साथ या मंडळींना लाभली आहे. दहीहंडीच्या निमित्ताने त्यामागचे वेगळे थर अनुभवाचे असल्यास आणि त्यातले वास्तव समजून घेण्याची इच्छा असल्यास मात्र ही हंडी फोडायला हरकत नाही.