Khajoor Pe Atke Movie Review : एक भरकटलेली कथा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2018 09:07 AM2018-05-18T09:07:14+5:302023-08-08T19:16:16+5:30
‘आगीतून निघून फुफाटयात जाणे’ ही म्हण तर आपल्याला माहिती आहेच. या म्हणीला सार्थ ठरवणारा काहीसा हा चित्रपट आहे असे म्हणायला हरकत नाही. बॉलिवूडमध्ये विनोदी चित्रपट बरेच झाले मात्र, चित्रपटातील विनोदाबरोबरच एक रंजकपणा सीन्समध्ये असतो.
‘आगीतून निघून फुफाटयात जाणे’ ही म्हण तर आपल्याला माहिती आहेच. या म्हणीला सार्थ ठरवणारा काहीसा हा चित्रपट आहे असे म्हणायला हरकत नाही. बॉलिवूडमध्ये विनोदी चित्रपट बरेच झाले मात्र, चित्रपटातील विनोदाबरोबरच एक रंजकपणा सीन्समध्ये असतो. पण, ‘खजूर पे अटके’ हा चित्रपट असाच अधांतरी पद्धतीचा आहे. हा बॉलिवूडचा ब्लॉकबस्टर चित्रपट नसला तरीही हलक्याफुलक्या पद्धतीचे विनोद देखील या चित्रपटात नाहीत.
‘खजूर पे अटके’ हा चित्रपट रात्री १२:३० वाजता आलेल्या एका फोनकॉलने सुरू होतो. जितेंद्र (मनोज पाहवा) याला त्याचा पुतण्या आलोकचा फोन येतो की, त्याचा भाऊ देवेंद्र हॉस्पिटलमध्ये कोमामध्ये आहे. जमले तर त्वरित मुंबईला या, अशी विनंती आलोक त्याला करतो. लहान भाऊ गंभीर आहे म्हणून जितेंद्र लगेच बाकीच्या कुटुंबाला फोन करून कळवतो आणि सहकुटुंब मुंबईला जायला निघतो. जितेंद्रचे उतावळेपण सगळयांना काही मंजूर नसते. उगीच काही बातमी आली नाही तरीही मुंबईला जाऊन हॉस्टिपलमध्ये बसायचे हे काही जितेंद्रची बायको (सीमा पाहवा) हिला पटत नाही, तरीही ती मनाविरूद्ध मुलांना घेऊन जितेंद्रसोबत निघते. अर्धवट कामं टाकून लगेचच निघणं हे लहान भाऊ रविंद्र (विनय पाठक) यालाही पसंत नसते पण मोठ्या भावाला काय वाटेल म्हणून तो ही सहकुटुंब येतो. शिवाय देवेंद्रच्या नावाचा एक वडिलोपार्जित फ्लॅट असतो ज्यावर दोन्ही भावांना वडिल वाटा देणार असे ठरलेले असते...त्या प्रॉपर्टीचा सोक्षमोक्ष करायचा ते ठरवतात. दोन्ही भाऊ पोहोचले मग बहिण ललिता (डॉली अहलुवालिया) कशी मागे राहिल? ती पण निघते. चौथा भाऊ आपल्या मुलाला पाठवतो. त्यात देवेंद्रची बायको कादंबरी (अल्का अमिन) आणि मुलगा आलोक ह्यांची धावपळ चालूच असते. थोडक्यात म्हणजे सगळा गोंधळ निर्माण होतो. एका हातावर भावाचं प्रेम आणि दुसऱ्या हातावर हॉस्पिटलचे कडक नियम आणि ट्रीटमेंटचा वाढता खर्च हयामध्ये हे कुटुंब कुठेतरी चक्रावून जाते. त्यात देवेंद्रच्या तब्येतीमध्ये काहीच प्रगती दिसत नसते. ललिता कुठुन तरी एका बाबाला घेऊन येते. जितेंद्रची बायको आपल्या मुलीला दाखवायला एक मुलगा आणते पण मुलगी (सनाह कपूर) आपल्या हिरोईन बनण्याच्या स्वप्नाच्या मागे पळत असते. इतर मुले मुंबईच्या मुलींचा पाठलाग करण्यात मग्न होतात.
कथानक अगदी व्हेंटिलेटर सारखे असल्यामुळे तसं म्हटलं तर मराठी प्रेक्षकांना ‘खजूर पे अटके’ हा चित्रपट फार आवडणार नाही. कारण व्हेंटिलेटरच्या दिग्दर्शनात जी संवेदनशीलता आणि गांभीर्य होते ते हर्ष छाया यांच्या दिग्दर्शनात दिसून आले नाही. भावनेऐवजी विनोदावर जास्त ताण दिल्यामुळे चित्रपटातले विनोद खूपच विचित्र आणि जबरदस्त केल्यासारखे वाटतात. कथानकात काही सीन्स खुपच जबरदस्ती घुसवल्यासारखे वाटतात. मनोज पाहवा, सीमा पाहवा, विनय पाठक आणि अल्का अमीन सोडले तर बाकी कलाकार ओव्हरअॅक्टिंग केल्यासारखेच वाटतात. या चित्रपटात फारसं काही बघण्यासारखं नाही. थोडक्यात काय तर अगदी चित्रपट बघणं टाळलं तरी चालेल.