Truck Bhar Swapna movie review : क्रांती आणि स्मिताने मारली बाजी
By प्राजक्ता चिटणीस | Published: August 24, 2018 04:25 PM2018-08-24T16:25:16+5:302023-08-08T19:28:38+5:30
मकरंद देशपांडे, क्रांती रेडकर, आदिती पोहनकर यांची ट्रकभर स्वप्न या चित्रपटात मुख्य भूमिका आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रमोद पवार यांनी केली आहे.
मुंबईनगरीत आपले देखील घर असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते. पण गगनाला भिडलेल्या घराच्या किमती पाहाता सर्वसामान्यांसाठी हे शक्य नसते. आपले देखील एक मोठे घर असावे असे स्वप्न असणाऱ्या एका कुटुंबाची कथा आपल्याला ट्रकभर स्वप्न या चित्रपटात पाहायला मिळते.
राजा कदम (मकरंद देशपांडे), राणी (क्रांती रेडकर) त्यांची मुलगी काजल (आदिती पोहनकर) झोपडपट्टीतील एका छोट्याशा घरात राहात असतात. तर त्यांचा मुलगा घरात जागा नसल्याने एका दुसऱ्या कुटुंबियांसोबत राहात असतो. ते दोघेही अतिशय प्रामाणिक असतात. कष्ट करून आपले घर चालवत असतात. ते एकदा होळी निमित्त गावी गेले असता त्यांना भाऊ आणि वहिनी त्यांच्या परिस्थितीवरून टोमणे मारतात. त्यामुळे आपले घर आपण मोठे बांधावे असे ते ठरवतात. पण घर बांधण्यासाठी त्यांच्याकडे पैसा नसतो. या झोपडपट्टीतील दादा आर के (मुकेश ऋषी) घर बांधण्यासाठी त्यांच्याकडून पाच लाखांची मागणी करतो. ते हा पैसा कशाप्रकारे जमवतात, त्यांचे हे स्वप्न पूर्ण होते का हे प्रेक्षकांना ट्रकभर स्वप्न या चित्रपटात पाहायला मिळते.
ट्रकभर स्वप्न या चित्रपटाची कथा चांगली असली तरी दिग्दर्शकाला ती तितक्या चांगल्या प्रकारे मांडता आलेली नाही. चित्रपट पाहाताना त्यात अनेक चुका असल्याचे जाणवते. आर के ला राजा आणि त्याच्या कुटुंबियांना पाच लाख रुपये द्यायचे असतात. पण चार लाख रुपये दिल्यानंतर अजून दोन लाख द्यायचे बाकी आहेत असे राणी बोलताना दिसते. इतकी मोठी चूक दिग्दर्शकाच्या लक्षात कशी आली नाही हे चित्रपट पाहाताना नक्कीच जाणवते. तसेच एडिटिंग मध्ये देखील काही त्रुटी आढळतात. मकरंदने रंगवलेला राजा भावत नाही. अनेक दृश्यात तो खूपच लाऊड अभिनय करत असल्याचे जाणवतो. चित्रपट खऱ्या अर्थाने क्रांती रेडकर आणि स्मिता तांबे यांनी तारला आहे. त्या दोघांनी खूपच चांगला अभिनय केला आहे. आदितीची भूमिका छोटी असली तरी तिने त्याला योग्य न्याय दिला आहे. मनोज जोशी सारख्या चांगल्या कलाकाराच्या वाट्याला तितकीशी चांगली भूमिका आलेली नाहीये. या चित्रपटात क्रांती एका अभिनेत्रीकडे घरकाम करते असे दाखवण्यात आले आहे. काही दृश्यांमध्ये या अभिनेत्रीने चांगलेच अंगप्रदर्शन केले आहे. कथानकात ही गोष्ट उगाचच टाकल्यासारखी जाणवते. दिग्दर्शकाने झोपडपट्टी, त्यातील वातावरण खूपच चांगल्याप्रकारे मांडले आहे. चित्रपट पाहाताना ही मुंबईतील एखादी खरी वस्ती असल्यासारखीच वाटते. तसेच चित्रपटातील व्यक्तिरेखांची रंगभूषा, वेशभूषा खूपच चांगल्याप्रकारे जमून आली आहे.